मी मिपावर सुमारे ९ वर्षे आहे .या दरम्यान काही कट्टे झाले त्यात मी सामील होतो. मी मुळातच व्यक्तिपूजक वा मूर्तिपूजक नसल्याने मी मिपावर तसे खरडवही ,खरडफळा असे वापरून माझा दरबार तयार करण्याचा प्रयत्न केला नाही. सबब कट्टा असल्यावर " आहे कसा आननी ? " अशी मला काही उत्सुकता कुणाबद्दल नसे. तसेच माझ्या प्रोफाईल मध्ये माझे नावासकट आवडी व नावडी सुद्धा स्पष्टपणे लिहिले होते .माझ्या लेखनातून माझे व्यक्तित्व लोकांना पुसटपणे कळले असेल इतकाच तो काय स्वार्थ मी साधलेला आहे. मिपावर प्रथमपुरुषी एकवचनी काही लिहिलेले लोकांना फारसे आवडत नाही असा माझा अभ्यास आहे ! " मी बोटीवर होतो तेंव्हा ! " या प्रकारचे लिखाणाची मला ऍलर्जी नाही कारण एकादा आगळा वेगळा अनुभव कथन करताना " मी" हे सर्वनाम अपरिहार्यपणे येणारच याची मला जाणीव आहे .
आता हे "मी पुराण" बाजूला ठेवून मग कट्ट्यात काय साधते असे मला विचाराल तर फारसे काही नाही असे माझे उत्तर आहे. मग कट्टे च नसावेत का ? याला माझे तर असावेत असे आहे ! याचे कारण अलिकडे आपल्याला व्हॉटस ऐप ,फेसबुक ई साधनानी प्रकट होता येत असले तरी प्रत्यक्ष सातमजली हसण्याची बरोबरी स्मायली करून शकत नाही असते माझे मत आहे.( असं हास्य अनुभवायचे असेल तर अतृप्त आत्मा यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधावा ) आपण आपल्या सारखा माणूस शोधायचा प्रयत्न आयुष्यभर करीत असतो व तो सापडणे सोपे नाही कारण एखादा माणूस विद्वान असतो पण अहंकारी असतो . एखादा नम्र असतो पण त्याचा कशावरच अभ्यास नसतो ,एखादा एका ठराविक विषयापलीकडे आयुष्याला काही अर्थ आहे हे याची जाणीव नसलेला असतो उदा वर्कोहोलिक महत्वाकांक्षी माणसे. काहींना कलासक्त पणाची ऍलर्जी असते पण ते तंत्रकुशल असू शकतात. यातून काहीतरी सबस्टन्स वाला आहे पण निरागस नम्र आहे असा माणूस क्वचितच सापडतो ( उदा
चित्रगुप्त ) ."गाना मत गाओ ऊस मैफिलमे जो मैफिल ही नही " असे गाणे शिकणाऱ्या माणसाला सांगितले जाते त्याच्या मागे उस्तादांचा काही अनुभव असतो हे नक्की ! जेष्ठ नागरिकांच्या कट्ट्याला जाउन बसले तर "मोदी कुठे चुकले ते कसे महान आहेत ,आमचा मुलगा ना पहिला गधा आहे दुसऱ्यांना काय नावे ठेवायची?" असे संवाद ऐकू येतात ".शतेषू जायते शूर: सहस्त्रेषु च पंडित: वक्ता दशसहस्त्रेषू दाता भवती वा न वा " किंवा इतर ताप शतानि यदृच्छया वितरतानि सहे चतुरनन अरसिकेषू कवित्व निवेदनं शिरसि मा लिख मा लिख " हे आपल्याला बरेच काही शिकवून जातात.
सबब कट्टे करायचे ते विषय निवडून करावे .त्या विषयात ज्यांना काही समजते आहे अशाना व ज्यांना काही येते आहे अशाना सामील केल्यास मजा येईल .उदा फोटोशॉप मध्ये मला बरेच काही समजते पणा " अभ्या " स्पा " यांना काही जास्त येते अशा लोकांची मस्त मैफल रंगू शकते. असा प्रयोग मी व्हॉटसऐप वर " अभ्या " शी करीत असतो .त्यातून त्याच्या सूचना व कौतुक मला उपयुक्त ठरते. मला १८५७ पेक्षा जुन्या इतिहासात आजिबात रस नाही त्यामागे माझी ठाम भूमिका अशी आहे की आपण आज जे जीवन जगतो त्याचा सर्व पाया फ्रेंच राज्यक्रान्ती व औद्योगिक क्रान्तीने रचला आहे . अशा वेळी अशोकाला बौद्ध धर्म का स्वीकारावासा वाटला या विषयात मला रस नसल्याने मी त्या जागी येणारच नाही पण अशोक कालीन वास्तुरचनेचे तंत्र असा विषय असला तर मी नक्की तो कट्टा स्वीकारेन . कारण मला वास्तू रचनेशी जे नाते असावेसे वाटते ते पार स्टोन हेंज काळापर्यंत जाते .ते कालनिरपेक्षा सत्ता निरपेक्ष असे आहे. हंपीत मूर्ती आहेत म्हणून मला हंपीत रस आहे व ओरछा मध्ये त्या नाहीत म्हणून मला रस नाही असे माझे होत नाही . भारतीय मूर्तिकला ही अनोटॅमी शी शत्रूत्व राखून आहे तरी त्यातील कलाकुसर मला भावते पण युरोपमधील संगमरवरी मूर्तिकलेबद्दल चा माझा आदर भारतीय मूर्तिकलेपेक्षा अजिबात कमी नाही.
याने काय होईल ? कमितकमी वेळात अधिकात अधिक देवाण घेवाण व तीत जाणते व निष्णात यांचा संगम झाल्याने गुणवत्ता वाढीस लागेल.
प्रतिक्रिया
23 May 2021 - 11:27 am | कंजूस
कट्टे कसे असावेत ? -
उंच असावेत. पाय सोडून बसता यावे. बाकी चौराकाकांशी सहमत. माझ्या आवडत्या विषयांची आवड असणाऱ्यांशी गप्पा मारायला आणि भेटायला मला आवडते. जमेल तसे करतोच. पण माहिती नसलेले विषयही जाणून घ्यायला आवडते. आणि कट्टा यासाठी उत्तम माध्यम आहे.
23 May 2021 - 11:29 am | कुमार१
>>>
वेगळा विचार.
.....
प्रत्यक्ष कट्टा या संबंधी एक जुना लेख
23 May 2021 - 11:35 am | गॉडजिला
और क्या...
23 May 2021 - 1:29 pm | चौथा कोनाडा
चौरासाहेब, मनोगत आवडले. आपल्या मताचा आदर आहे.
याच्याशी तर सहमत आहेच ...
..... पण आमच्यासारख्या लोकांना इतरही विषय खुणावत असतात. अरविंद कोल्हटकर यांचा विषय क्लिष्ट वाटला (उपस्थितांनी हे खेळीमेळीत सांगितले) तरी त्याविषयी उत्सुकता चाळवली. योग आले तर नक्की वाचेन या बद्दल.
बा़की चित्रकलाचा सेपरेट कट्टा होईलच, उत्सुकता आहे ती मनो यांच्या पानिपत ग्रंथलेखनावर तपशिलवार ऐकण्याची संधी देणारा कट्टा !
23 May 2021 - 2:47 pm | चित्रगुप्त
कालचा कट्टा ही एक सुरुवात होती, ती माझ्यामते छानच झाली. आता यापुढे विषयवार कट्टे करुया. यात अर्थातच आधी मिपावर धागा टाकून सर्वांना आवाहन करुन मधे किमान एक आठवडा दिला जावा. म्हणजे त्या त्या विषयातील तज्ज्ञ जाणकार याबरोबरच कुतूहल आणि नवीन काही जाणून घ्यायला उत्सुक असणारे सदस्य सुद्धा भाग घेऊ शकतील.
एकाद्या विषयाचे ज्ञान, गोडी आणि अनुभव असणे आणि ते सगळे योग्य रीतीने लोकांसमोर मांडता येणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ती क्षमता विकसित करण्यासाठी असे कट्टे खूपच उपयोगी आहेत, असे कालच्या अनुभवावरुन माझे मत झाले आहे.
आधी मी फक्त बोलण्याचे ध्वनिमुद्रण करुन बघितले. ते दहा मिनिटांचे झाले. पुन्हा ऐकताना मला त्यात पुनरावृत्ती, फापटपसारा, बोलताना नेमके शब्द ऐनवेळी न सुचणे हे दोष आढळले. मग सात आणि पाच मिनिटात बोलणे आटोपणे जमल्यावर जरा हायसे वाटले. प्रत्यक्ष जागी येऊन खिडकीतून येणार्या प्रकाशामुळे चष्म्यावर चमक येणार नाही अशा अँगलने बसून मग कॅमेरापासून किती अंतरावर बसावे, मागे कोणती चित्रे दिसावीत, छताचा किती भाग दिसावा वगैरे निश्चित केले. मग प्रत्यक्ष व्हिडिओ घेत बोलून बघितले. त्यात होणार्या चुका लक्षात घेऊन आणखी दोनदा प्रयत्न केला. मी प्रचंड विसरभोळा असल्याने बोलण्याचे मुख्य मुद्दे लिहून समोर ठेवले. एवढी सगळी पूर्वतयारी करुनही आपण चुका करणार याची खात्री होती आणि झालेही तसेच.
पण हे सगळे करताना खूप मजा आली आणि तरुणपणी नाटकाच्या तालिमी करतानाची गंमत पुन्हा एकदा अनुभवली.
तर कट्टयाचे असेही फायदे आहेत पंत.
वास्तुकलेबद्दल तुम्ही आणि प्रचेतस मिळून कट्टा ठरवावा असे सुचवतो. तुमच्या या उत्तम धाग्याबद्दल अनेक आभार.
23 May 2021 - 3:59 pm | चौकटराजा
मला अपेक्षित असलेले खाद्य मला फेसबुकवर काही जागी मिळते जिथे प्रतिसाद ही संकल्पनाच नाही तर माहिती हीच संकल्पना आहे. उदा .ट्रीपअडवायझर ,ट्रॅव्हल हेल्पलाईन ,आय लव्ह इटाली हे ग्रुप .त्यात मी माहिती देत असतो व घेतही असतो. त्यात कदाचित असाही स्वार्थ साधला जाऊ शकतो की वारंवार माहिती दिल्याने समजा तुमचे नाव एखाद्या इटालियन प्रवासाप्रेमी पर्यंत पोहोचले तर तो तुम्हाला कोच सर्फिंग साठी परवानगी देऊन तुमचा होस्ट विनामूल्य होऊ शकतो. अशी संधी माझी तब्बेत उत्तम राहिली तर मी सोडणार नाही ! मागे मला मिलान येथील युवकाने मेलवर त्याची माझी कोणतीही ओळख नसताना केवळ एका ग्रुपचा सभासद या नात्याने मला पूर्ण इटालीत निसर्ग ,वास्तू,कला ,पेहेराव ,मैदाने, बर्फ हे पॅकेज कसे बसते हे लेख लिहून कळवले कळवले होते .
23 May 2021 - 4:43 pm | सिरुसेरि
आंब्याचा सीझन असल्याने कट्टे हे आमराईत असावेत असे वाटले .
23 May 2021 - 5:00 pm | सतिश गावडे
ऑनलाईन कट्ट्याबद्द्ल काही कल्पना नाही. मात्र प्रत्यक्ष भेटीतील कट्ट्याबद्दल हे तुमचं मत असेल तर तुमच्या मताबद्दल पूर्ण आदर ठेऊन म्हणावेसे वाटते की खरा कट्टा तुम्ही अनुभवलेलाच नाही. अधिक माहिती मी तुम्हाला कधीतरी फोन केल्यावर सांगेन किंवा तुमच्या लाडक्या वल्लीला विचारा :)
23 May 2021 - 5:03 pm | चौकटराजा
हा प्रतिसाद खास करून ऑन लाईन साठी आहे ! बाकी आपण जे सहलीला गेलो होतो आमच्या घराजवळ चुकात वात्रट पणा करतो याला कट्टा म्हणायचे का ?
23 May 2021 - 5:15 pm | सतिश गावडे
हो आपण भुलेश्वरला गेलो होतो त्या सहलीला कट्टा म्हणता येईल असे वाटते. तुमच्या कट्टयाच्या व्याख्येत बसते का ते?
माझ्या मते भरपूर मिपाकरांसोबत जेव्हा प्रत्यक्ष भेट होते तेव्हा तो काहीसा ओळख देणे घेणे असा प्रकार असतो. आपली जुजबी वैयक्तिक , व्यावसायिक आणि छंद आवडी निवडी यांची माहिती देणं, मग कुठेतरी चहा पिणं, ज्यांना वेळ असतो त्यांनी एकत्र जेवणं आणि नंतर निरोप घेणं अशी साधारण कट्ट्याची समाप्ती होते.
मात्र याच जुजबी ओळखीतून पुढे खरडी खरडी खेळले जाणे, खरडफळ्यावर आपले अनुभव मांडणं यातून ही ओळख मैत्रीत बदलू लागते. फोन नंबरांची देवाणघेवाण होते आणि मग ते मोजकेच मिपाकर जेव्हा पुन्हा भेटतात, तेव्हा खरा कट्टा होतो. मात्र त्यासाठी खरडवही ,खरडफळा असे वापरून दरबार तयार नाही केला तरी सवंगडी नक्कीच तयार करावे लागतात.
23 May 2021 - 5:24 pm | चौथा कोनाडा
म्हण्जे कट्ट्याचे ३ टप्पे / प्रकार समजायचे !
१) ओळख कट्टा
२) खरा कट्टा
३) सराईत कट्टा
23 May 2021 - 5:46 pm | गॉडजिला
माझी (किमान माझ्यापुर्ती) कट्याची व्याख्या एकदम साधी सोपी सामान्य आहे... जिथे आपण वेळ बसुन घालवतो तोच कट्टा... बाकी सगळे **बट्टा.
23 May 2021 - 9:42 pm | चौकटराजा
टी व्ही चानेल वर माझा कट्टा नावाचा कार्यक्रम असतो त्यात चेतन सशीतल यान्चा व्हॉईस ओव्हर व व्हॉईस कल्चर या विषयावर झालेला कट्टा. समोर बसलेले सर्व आवाजाच्या क्षेत्रात काम करणारे व उत्सव मूर्ती एक उसन्या आवाजाचा जादूगार ! किंवा शब्दप्रधान गायकी यावर संवादरूपी कट्ट्टा यशवन्त देव करीत असत . आपल्याकडे "एस" ही व्यक्ती फोटोग्राफी या विषयावर असा कट्टा करू शकेल !
सवंगडी करायच्या बाबतीत म्हणाल तर एक दोन ओळी लिहितो
जिन्हे है प्यार वो सनम बिन बुलाये आते है
वहापे फूल नही दिल बिछाये जाते है
आपण जेंव्हा पुरेसे प्रौढ होतो त्यावेळी आपला स्वभाव ,आपल्या आवडी फारशा बदलत नाहीत. मी रिटायर्ड झाल्यावर गाण्याची आवड लावून घेणार आहे वा जोपासणार
आहे असे होत नसते. मी विसाव्या वर्षापासून प्रवास ,फोटोग्राफी ( पहिला कॅमेरा आग्फा चा क्लिक थ्री ) ,संगीत यान्चे छन्द जोपासले आहेत. पण या अशा छन्दान्चे एकूण लोकामधील प्रमाण फार कमी असते. आमच्या सोसायटीत अनेक मॅनेजर पदावर असलेले लोक आहेत पण १८० कुट्ंबात डी एस एल आर ग्रेडचे फक्त तीन कॅमेरे आहेत. गेट टुगेदर वा ध्वजारोहण यावेळी यातील एकालाही दहा मिनिटे व्यासपीठावर बोलता येत नाही . एकेमेकाबद्द्ल आदर असेल व त्याबरोबर एकतरी छन्द दोघात सामायिक असेल तरच स्नेह वाढीला लागतो. असा अनुभव आहे.
23 May 2021 - 5:30 pm | कुमार१
अजून सहा ते आठ महिने प्रत्यक्ष कट्टा होणे जरा अवघड दिसते.
त्यामुळे वर चौको यांनी वर्गीकरण केल्याप्रमाणे दोन स्वतंत्र जालकट्टे ठेवता येतील :
१. निव्वळ ओळख कट्टा : याला जास्तीत जास्त लोकांनी यावे.
२. निवडक कट्टा : यात आधी ठरवलेल्या विषयावर भाषण/ मुलाखत/ चर्चा इत्यादी असेल. याला या विषयात रस असणार्यानी यावे.
हाकानाका
23 May 2021 - 8:21 pm | चौथा कोनाडा
+१
अतिशय उत्तम सुचवणी. नावे पण छान आवडली. ओळख कट्टा आणि निवडक कट्टा.
निवडक कट्टामध्ये फकस्त व्याख्याते बोलणार.
आपल्या सारखे उपस्थित "हाताची घडी अन तोंडावर बोट" वेळ दिलाच तर प्रश्न विचारायसाठी तोंड उघडायचं !
23 May 2021 - 10:15 pm | चौकटराजा
आपले लेखन व आपले प्रतिसाद यामुळे आपले एक व्यक्तीत्व सभासदाना अगोदरच माहीत असते. उदा. फोटूवाला हे मदत करणारे फोट्ग्राफी जाणणारे असे आय डी आहेत हे मला ठाउक आहे तेंव्हा मी जर कट्टा आयोजित केला व विषय फोतोग्राफी असेल तरे मी त्याना प्राधान्याने व्यनि करणार. जे वाचनमात्र असे सभासद वर्शोनुवर्ष आहेत त्याना इतक्या वर्षात व्यक्त का व्हावेसे वाटू नये ...... ?
23 May 2021 - 10:15 pm | चौकटराजा
आपले लेखन व आपले प्रतिसाद यामुळे आपले एक व्यक्तीत्व सभासदाना अगोदरच माहीत असते. उदा. फोटूवाला हे मदत करणारे फोट्ग्राफी जाणणारे असे आय डी आहेत हे मला ठाउक आहे तेंव्हा मी जर कट्टा आयोजित केला व विषय फोतोग्राफी असेल तरे मी त्याना प्राधान्याने व्यनि करणार. जे वाचनमात्र असे सभासद वर्शोनुवर्ष आहेत त्याना इतक्या वर्षात व्यक्त का व्हावेसे वाटू नये ...... ?
23 May 2021 - 5:51 pm | कॉमी
कायम चालू राहाणारे लाईव्ह सेशन बनवता येत नाही काय ? कधीही बघा, जो असेल त्याचाशी बोला.
23 May 2021 - 7:32 pm | गॉडजिला
प्रॅक्टिकल एफर्ट्स कोण घेणार हा खरा प्रश्न
23 May 2021 - 6:33 pm | मुक्त विहारि
ह्यावर एक वेगळा पैलू मिळाला ....
वैयक्तिक सांगायचे तर, प्रत्यक्ष भेट घेणे, हे मला जास्त आवडते
अर्थात एका हातात ग्लास, (द्रव पदार्थ महत्वाचा नाही) आणि एका हातात, खाद्य पदार्थ, (सामिष असो की निरामिष), हे असले की, अजून काही लागत नाही ....
23 May 2021 - 7:11 pm | कंजूस
फक्त ऐकण्याची तयारी पाहिजे.
माझे बरेचसे प्रवास रेल्वे सेकंड स्लीपर क्लासात झाले. एकूण आठ जण असतात एका आडव्या भागात आणि आठ तास जागेपणी एकमेकांच्या समोर बसतो. मग कधी गप्पिष्ट प्रवासी असले की कट्टा होतो. म्हणजे मी तरी त्यास कट्टा समजतो.
फक्त एक सल्ला मित्राने दिलाय त्याबद्दल सावध असतो. तो म्हणजे एकट्याचा प्रवास असेल तर कुणाशी बोलायचेच नाही. विशेषकरून कोकण रेल्वेत. कारण की सामान चोरीला जाऊ शकते.
23 May 2021 - 7:33 pm | गॉडजिला
न बोलल्याने सामान चोरीला जाणे कसे टळू शकते ?
24 May 2021 - 6:12 am | कंजूस
पण या घटना घडल्या आहेत. गप्पा मारतात आणि कुठेतरी तो मनुष्य तुमची पिशवी घेऊन उतरून जातो तुम्ही उठून दारात वगैरे उभे राहिल्यावर. नंतर समोरचे म्हणतात आम्हाला वाटलं की तो तुमच्या बरोबरच आहे.
23 May 2021 - 9:22 pm | चौकटराजा
मी खोटे नाव व खोटे डेस्टीनेशन सांगत असतो विचारले तर ! सहसा समोरचा माणूस रिझर्वेशन तक्क्ता डब्यावर चिकटवलेला पहात नाही.
24 May 2021 - 12:23 pm | खेडूत
हा हा..
संजीव कुमारचा अंगुर सिनेमाची आठवण आली या ठिकाणी!
:)
24 May 2021 - 7:56 am | गणेशा
कट्ट्याला आणि भेटण्याला कुठलीही चाकोरी नसावी...ना कसली जास्त अपेक्षा..
कट्टे आनंद देणारे असावेत, बस.
निखळ.. सरळ.. साधे कट्टे मनाला आनंद देतात..
त्यात हास्य असावे.. त्यात प्रेमळ टोमणे असावे.. त्यात मज्जा असावी...त्यात शेअरिंग असावे.. त्यात ज्ञान असावे.. त्यात काहीही असावे.. प्रत्येक पान उलगडले कि ते वेगळेच भासावे...
वेगवेगळे लोक त्यांचे अनुभव सांगतात ते ऐकणे पण भारी असते.. पण ते लोक आपले कायम मित्र होणार आहेत असे कट्टे असावेत...
विषय घेऊन पुस्तक वाचण्याला मला अर्थ वाटत नाही..
कट्टे सर्व समावेशक असावेत..
कट्ट्याचा मुळ गाभा हा 'विषय' किंवा 'आवड' नसून एकमेकांच्यात मिसळणे हा असला पाहिजे..
नाही तर कट्ट्याला अर्थच उरत नाही...
24 May 2021 - 8:53 am | चित्रगुप्त
नुस्त्या ओळखी, गप्पा वगैरेंसाठी तर कट्टे असावेतच, शिवाय विशिष्ट विषयांना वाहिलेले पण असावेत जेणेकरून त्या त्या क्षेत्रातील अनुभवी आणि हौशी, कुतुहल आणि आवड असलेल्या सर्वांची चर्चा, अनुभवांची देवाणघेवाण वगैरे सुसूत्रपणे घडून येईल.
एक धागा असाही काढता येईल ज्यात कट्ट्यांसाठी असे कोणकोणते विषय असू शकतात, यावर सर्व वाचक आपापले मत मांडू शकतील. मग त्यातून सवडीनुसार कट्टे करता येतील.
24 May 2021 - 12:18 pm | गॉडजिला
गणेशजी आपण फार नेमकं बोलता, आपण प्राध्यापक आहात असे वाटते.
24 May 2021 - 6:23 pm | चौथा कोनाडा
गणेशा,
✅
एकदम समर्पक !!!
24 May 2021 - 10:38 pm | प्रसाद गोडबोले
मग "समाधान" ला भेटु डायरेक्ट !
24 May 2021 - 10:55 am | Bhakti
ज्याला जमत त्याने तो online/Offline कट्टा करा.हसत खेळत रहा.कट्टयाने नवीन समजत असेल तर टिपकागदासारख व्हा.अर्थात मैत्रीही समान लोकांमध्येच होती, अट्टाहासाने नाही.
तेव्हा जास्त विचार नका करू.काय माहित कल हो ना हो.
25 May 2021 - 8:19 am | चित्रगुप्त
अगदी खरे आहे. गेल्या वर्षभरात आमच्या नात्यातले आणि परिचित मिळून पंधरा लोक निवर्तले आहेत. पूर्वी असे कधीही झाले नव्हते. रात्र वैर्याची आहे जे करावेसे वाटत आले पण केले नाही गेले ते सगळे करुन घ्यावे. मी चित्रकलेत हेच करतो आहे.
25 May 2021 - 9:16 am | Bhakti
:)
20 Nov 2021 - 6:00 pm | चित्रगुप्त
आताच चौकटराजा यांचा हा लेख वाचायला घेतला आणि वरील प्रतिसाद दिसला. तुम्ही लिहीलेले 'कल हो न हो' त्यांच्या बाबतीत एवाढ्यात खरे ठरेल अशी कुणी कल्पनाही केली नसेल.
20 Nov 2021 - 6:08 pm | अत्रुप्त आत्मा
+++111
अलिकडे आपल्याला व्हॉटस ऐप ,फेसबुक ई साधनानी प्रकट होता येत असले तरी प्रत्यक्ष सातमजली हसण्याची बरोबरी स्मायली करून शकत नाही असते माझे मत आहे.( असं हास्य अनुभवायचे असेल तर अतृप्त आत्मा यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधावा ) --- आता फक्त रडू येतय हो काका , कुठून हसणार मी आता? ?? :(
20 Nov 2021 - 7:29 pm | Bhakti
@चित्रगुप्त काका,खरच हे खुप लवकर घडले.
चालत रहावं,माणसांना जपत जावं!
देव त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.
24 May 2021 - 3:21 pm | प्रसाद गोडबोले
कट्ट्या मध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे बॅरल. बॅरल साठी उच्च दर्जाचे स्टील वापरावे , साधी पाण्याची पाईप वापरल्यास ती फुटते आणि आपलाच हात भाजण्याचा संभव असतो. सिलेंडर चा साईझ ठरवताना आपण कोण्त्या बुलेट वापरणार आहोत , ७.६२ कि ५.५६ की ९मिमि त्यावरुन योग्य त्या दर्जाचे मटेरियल वापरावे . ग्रिप आणि फ्रेम चांगली असणे तेवढेच आवश्यक आहे नाहीतर नेम चुकु शकतो. ट्रिगर गार्ड , फ्रंट साईट , रीअर साईट ह्या तशा अनावश्यक गोष्टी आहेत , त्यांचा जास्त उपयोग होत नाही.
बाकी देशी कट्ट्याला सेफ्टीपिन/ लॅच नसते त्यामुळे त्यामुळे कमरेला किंव्वा पॅन्ट मध्ये कट्टा खोचुन ठेवण्याचा वेडेपणा कधीही करु नये नाहीतर , चुकुन कधीतरी गोळी चालली तर त्या नादात आपली महत्वाची १२ मीमी गॉज शॉटगन कायमस्वरुपी नादुरुस्त होऊ शकते.
बाकी सविस्तर चर्चा भेटीअंती !
24 May 2021 - 3:41 pm | गॉडजिला
मिपा कट्टा कसा असावा यावरून मिपाकरांचा कट्टा कसा असावा इकडे चर्चा वळत आहे असे नम्रपणे नमूद करतो ;)
24 May 2021 - 5:51 pm | टवाळ कार्टा
कहर =))