शब्दाबाहेर
बोलवू का पावसाला? का थांबू जरा?
तू म्हणशील तसं
आजकाल माझ्या शब्दाबाहेर नाही आभाळ!
.
.
.
तिला वाटतं मी खोटंच बोलतो
किंवा पावसाचा अंदाज वगैरे वाचून असं काहीबाही बोलतो
आणि नसतीलच पावसाचे दिवस तर मग
उसासा सोडते ती नुसताच
पण मला खरच येतं अहो पावसाला बोलावता
हल्ली-हल्लीच जमायला लागलंय.
खरं तर अचानक आलेला पाऊस तिला आवडत नाही
म्हणून मग मी विचारत असतो तिला
तिला वेडेपणा वाटतो हा माझा
पण पाऊस येतोच दरवेळी...हो येतोच
अगदी चिंब भिजवणारा पाऊस येतो
ती भिजते कधीकधी...अगदीच नाही असं नाही