माणूस निघतो समाधानाच्या शोधात
सगळीकडे फिरतो, खूप खूप शोधतो
पण समाधान काही सापडत नाही
वाटेत त्याला अनेक माणसं भेटतात
त्याच्यासारखीच, पण वाट चुकलेली
सगळे एकमेकांना विचारत राहतात
पण समाधान कोणाकडेच असत नाही
समोर असतात असंख्य वाटा
कोणती वाट पकडायची कळत नाही
पकडलीही एखादी वाट तरी
पार कशी करायची उमगत नाही
त्या वाटेवरसुद्धा असतात अनेक वाटाडे
वाट दाखवण्याचं आश्वासन देत
आधी पोहचवलेल्या माणसांच्या
कहाण्या सांगत आणि फुशारक्या मारत
माणसे त्यांच्यावर विश्वास ठेवतात
पण माणसांचा शिधा हडप करुन
वाटाडे गडप होतात आणि
माणसे मात्र फिरत राहतात
पुन्हा त्याच अनोळखी वाटांवर
चकवा लागल्यासारखी घुमत राहतात
त्याच जागी गोल गोल
तहान भुकेने व्याकूळ झालेली माणसं
पडत जातात एकामागून एक
त्याचीच वाट पाहत असलेली गिधाडे
तूटुन पडतात त्यांच्यावर
लांडग्या कोल्ह्यांनाही वास लागतोच
तेही तोडतात मग माणसांच्या काळजाचे लचके
शेवटी एखादा माणूस ती वाट पार करुन
पोहचतो आपल्या इप्सित स्थळी आणि
तिथं भेटलेलं समाधान
कवटाळतो आपल्या उराशी
पण तेव्हा त्याच्या लक्षात येतं की
हिच ती जागा जिथून आपण निघालो होतो
आणि हेच ते निरुपयोगी म्हणून फेकलेलं समाधान
ज्यासाठी त्याने एवढे कष्ट घेतले
ते तर त्याच्यापाशी आधीपासूनच होते
त्याबरोबर तो हसत धावत सुटला
बाकीच्यांना सांगायला की समाधान इथेच आहे
पण माणसांना कळतच नाही त्याचं
बेंबीच्या देठापासून ओरडणं कारण
ते निघाले असतात त्यांच्या वाटेने
त्यांच समाधान शोधायला...
प्रतिक्रिया
15 May 2014 - 6:59 pm | निवेदिता-ताई
सुंदर
15 May 2014 - 7:17 pm | सूड
मस्त!!
15 May 2014 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा
अतीशय सुंदर!!!
15 May 2014 - 11:39 pm | आत्मशून्य
अतृप्ती-एक जीवन संघर्ष.
19 May 2014 - 12:55 am | चैतू
सगळ्यांना धन्यवाद!