नाते
ना ओढ असे देहांची
वा स्पर्शाची मर्यादा
सहवासाने उजळावे
वाटे तरीही कितीदा
ना प्रीती - ना ही मैत्री
हे तुजला मजला ठावे
जे मिळते यातुन, पुरते
का द्यावी खोटी नावे
हे देण्या अन् घेण्याचे
फुललेले मोहक अंगण
का बहराला मारावे
नसलेले घालुन कुंपण
याआधी कैसे होते
यापुढती कैसे जाऊ
सध्या ठरवू इतके की
सध्याला बिलगुन राहू
क्षण अपार श्रीमंतीचे
ये जपून हृदयीं ठेवू
नाजुकसे नाते अपुले
वळणाशी अलगद नेऊ
-- अमेय