शोक कुणाला? खंत कुणाला?
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी
धडधड धडधड रान पेटते......
शोक कुणाला? खंत कुणाला?
चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती
लपलप लपलप ज्वाला उठती......
शोक कुणाला?खंत कुणाला?
पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे
भडभड भडभड पाने रडती....
शोक कुणाला? खंत कुणाला?
पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे
चरचर चरचर डोळे झरती......
शोक कुणाला? खंत कुणाला?
कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते
करकर करकर शाप जीवांचे,
थरथर.... इथवर ऐकू येते.....
-शिवकन्या