विडंबनाचे निमित्त: परवा, एका बॅचलर मित्राकडे कामानिमित्त जाणं झालं. कामाचं बघता बघता रात्री उशीर झाल्यावर त्याला म्हटलं, आता घरी जातो, उद्या बघू. तर, पठ्ठ्या आपला, "झालं रे! किती वेळ लागतोय! पाचच मिनिटे अजून." असं म्हणून दुसऱ्याच नवीन कामाला सुरूवात करीत होता. मलाही मग डुलु डुलु डुलक्या सुरू झाल्या. झोप अनावर झाल्यावर मी तिथेच झोपायचं हे दोघानुमतें ठरलं.
आता, बॅचलरची रूम म्हणजे, जास्त काही सांगायलाच नको. पांघरायला दिलं त्याने पण त्याचा असा काही सुगंध येत होता की, मी कुडकुडून मरायचं मरण निधड्या छातीने अंगाशी कवटाळलं! रूमची अवस्था, गॅलरीतून येणारे मित्राचे गुणगुणणारे मित्र यातून झोपेचा बोऱ्या वाजलाच पण त्यानिमित्ताने हे विडंबन सुचवून गेला. बऱ्याच दिवसांनी लिहिणं झालं म्हणून त्या वटवाघूळ मित्राला हे विडंबन समर्पित!
जीव झोपला (विडंबन)
('जीव रंगला'च्या चालीवर)
जीव झिंगला, पेंगला, निजला असा, दुलईची आरजू
जीव गुंगला, झोपला गाढ ह्यो माझा, आता मला उठवू नको तू
डुलकीनंतर नेशील, उशी मला देशील, मैतर माझा तू
श्वास हळुवार चालं, अंग ढील्ल ढील्ल झालं, थोडी जागा मला दे तू
काय नशिबात आलं, कशी ही रात जाईल,
सारी खोली तुझी, ढेकणांची वस्ती, बघ बघ तू
खुळं कुडतं ढगळ, लई अघळपघळ
माझ्या खास मितरा, तेच मला आता पांघर रे तू
खुलं दार गॅलरीचं,नाही झालं तुला लावण
तुझ्या टकुऱ्यात, डास आल्यावर, असा असा हाणीन
जीव झिंगला, पेंगला, निजला असा, दुलईची आरजू
जीव गुंगला, झोपला गाढ ह्यो माझा, आता मला उचल तू
- संदीप चांदणे (०८/१२/१८)
प्रतिक्रिया
8 Dec 2018 - 6:08 pm | तुषार काळभोर
लै दिवस झाले काही वर्जिनल नाही केलं. पण हे पण झक्कास आहे.
8 Dec 2018 - 9:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =)) झकास !
8 Dec 2018 - 9:51 pm | ज्ञानोबाचे पैजार
लै भारी हो चांदणे पैलवान,
पैजारबुवा
12 Dec 2018 - 7:11 am | दुर्गविहारी
हा हा हा ! भारी लिवलयं. बर्याच मित्रांच्या खोल्या डोळ्यासमोर तरळून गेल्या.
12 Dec 2018 - 8:34 am | प्रचेतस
एकच नंबर..
12 Dec 2018 - 1:34 pm | चौथा कोनाडा
संदीप चांदणेसाहेब, लै फर्मास विडंबन ! मझा आया !