शोक कुणाला? खंत कुणाला?

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
25 Aug 2019 - 9:11 pm

हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी
धडधड धडधड रान पेटते......
शोक कुणाला? खंत कुणाला?

चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती
लपलप लपलप ज्वाला उठती......
शोक कुणाला?खंत कुणाला?

पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे
भडभड भडभड पाने रडती....
शोक कुणाला? खंत कुणाला?

पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे
चरचर चरचर डोळे झरती......
शोक कुणाला? खंत कुणाला?

कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते
करकर करकर शाप जीवांचे,
थरथर.... इथवर ऐकू येते.....

-शिवकन्या

आता मला वाटते भितीइशाराकविता माझीकालगंगामाझी कविताभयानकमांडणीवावरकवितासाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलराहती जागा

प्रतिक्रिया

माहितगार's picture

25 Aug 2019 - 9:36 pm | माहितगार

पु. शि. रेग्यांच्या सावित्री मध्ये घरट्यांचा उल्लेख दोनदा येतो. पहिला संघर्षाचा मन विषण्ण करणारा दुसर्‍यांदा येतो तेव्हा निसर्गचक्र त्याच्या क्रमाने हळुवारपणे पुर्वव्रत झालेले असते जे वाचकाला आश्वस्त करते.

नि३सोलपुरकर's picture

28 Aug 2019 - 2:47 pm | नि३सोलपुरकर

सध्या अमेझॉन जंगलात लागलेल्या आ़गीच्या ( वणवा) पार्श्वभुमीवर कवितेची दाहकता अधिकच जाणवते आहे .

__/\__.