कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 2)
22 तारीख. सकाळी 10.30 ची भरती होऊन ओहोटी सुरू झाली. समुद्राच्या जवळ आणि खाडी असल्याने भरती ओहोटी च्या वेळी वाशिष्ठी मध्ये पण पाण्याचे चढ उतार नेहमी होत असतात. पाणी आता थोडं कमी होईल अशी आशा वाटत होती. पण डोळयांसमोर पावसाने भरलेले ढग दिसत होते. पाणी 2 फूट कमी झाल्याचे मेसेज आले. थोडं हायस वाटलं पण पाणी ज्या वेगात भरलं त्या वेगात कमी होत नव्हतं. खर तर ओहोटीच्या वेळी पाणी वेगाने उतारावरून धावत जावं तसं जात असत पण यावेळी बाहेर गेलेल्या पाण्याला आत घ्यायला नदी तयार नव्हती. त्यामुळे हे 2 फूट कमी झालेल पाणी फक्त एक खेळ होता हे लवकरच जाणवलं.