१. पुस्तकं हाताशी असलेली बरं असतं..
कधी एखादा लांबलचक मोकळा स्पॅन मिळाला तर तो
अंगावर येऊ नये म्हणून..
किंवा येता जाता चाळायला म्हणून..
किंवा फावल्या वेळात सोशल मीडियावर एकमेकांची उणीदुणी काढून, ऐकून डोकं खराब करून घेण्यापेक्षा तेच पुस्तकात घातलेलं बरं असतं, म्हणून..
किंवा कधी कधी बिनझोपेच्या जालीम रात्री येतात, मग त्यांच्यावर खात्रीशीर उतारा म्हणून पडल्या पडल्या जरावेळ वाचू म्हणत म्हणत 'अजून थोडा वेळ,अजून थोडा वेळ, आता हे शेवटचंच पान', अशी लाडीगोडी करत करत अर्धी-पाऊण रात्र सरेपर्यंत विनातक्रार सोबतीला थांबतात पुस्तकं, म्हणूनही..!!
२. पुस्तकांची निवड करायची म्हटली तर..
पेपरमध्ये किंवा नेटवर पुस्तकांचे जे रिव्ह्यू वाचलेले असतात, त्यातलं एखादं पुस्तक इंटरेस्टिंग वाटलं की त्याचा स्क्रीनशॉट ठेवलेला असतो मोबाईलमध्ये...
किंवा एखाद्या वाचणाऱ्या पंटरने चार पेग डाऊन झाल्यानंतरच्या बैठकीत, 'हे अमुकअमुक वाचून बघ जरा.. बाकी सगळा शेणसडा है ह्याच्यापुढं..!' असा एक भुंगा सोडून दिलेला असतो डोक्यात..
किंवा कधी कधी असाही काळ येतो की तिथून पुढे एखाद्या विशिष्ट लेखकावरच झपाटल्यासारखा फोकस केंद्रीत झालेला असतो, तर मग त्याच्या वाचायच्या राहिलेल्या पुस्तकांची शोधाशोध...
तर हे असं सगळं डोक्यात असतं.. मग दुकानांमध्ये किंवा लायब्रऱ्यांमध्ये जाणं झालं की ही वरची पुस्तकं जरा प्राधान्यानं शोधली जातात..
तसा मी पुस्तकांसाठी बराचसा लायब्रऱ्यांवर अवलंबून असलो तरी, काही पुस्तकांची धुंदी एवढी घनदाट असते की ती ताबडतोब खरेदी करून टाकली जातात..
खरेदीसाठी पुण्यात अक्षरधारा बुक गॅलरी, औंधमधलं क्रॉसवर्ड किंवा डेक्कनच्या इंटरनॅशनल बुक स्टोअरमध्ये राऊंड होतात, महिन्याभरातून...
(आणि शिवाय एखाद्या सुस्त संध्याकाळी झेड ब्रीजवर हवा खाऊन झाल्यावर चालत चालत समजा लकडीपुलावर गेलो, तर तिथं प्रभाकर शेठ, जुनी पुस्तकं मांडून बसलेले असतात नेहमीप्रमाणे.. तिथंही चवड्यावर बसून थोडीफार उलथापालथ केली की कधी कधी लॉटरी लागून जाते..!
बाजीराव रोडवरच्या फूटपाथवरही हेच घडू शकतं..!)
दुकानांमध्ये साधारण पद्धत अशी की सगळ्या
सेक्शन्समधून हळूहळू रेंगाळत रेंगाळत,
मध्येच एखाद्या शेल्फपुढं थांबून मान तिरकी करून,
गुढघ्यावर हात ठेवून मधल्या कप्प्यातली पुस्तकांची रांग.. नंतर कंबरेतून वाकत वाकत अजून खालची रांग..
आणि शेवटी चवड्यावर बसून तळकप्प्यातली रांग, अशा पद्धतीनं सगळी नावं वाचून.. एखाद्या लेखकाचं नवीन काही दिसलं किंवा पुस्तकाचं टायटल एकदम हटके वाटलं की ते हातात घेऊन, त्याच्या ब्लर्बमधला मजकूर पूर्ण वाचून बघतो..
तो कंटेंट आवडला की मग सुरूवातीला लेखकानं
अर्पणपत्रिकेसारखं काही म्हटलं असेल ते.. आणि मग नंतर असंच अधल्यामधल्या कुठल्याही एक-दोन पानांवर नजर टाकून काही गुंतवणारं दिसतंय का ते पाहतो..
ह्या सगळ्या चाळणीतून आवडलं की मग ते हातात घेऊन पुढच्या शेल्फकडे.. तिथंही शरीराच्या ह्याच वेगवेगळ्या पोजेस.. असं करत करत मग शेवटी दीड-दोन तासांनी सगळा गठ्ठा घेऊन बिलींग काऊंटरवर..!
पण लेखक जर जिव्हाळ्याचा असेल तर त्याची पुस्तकं जिथं कुठं दिसतील त्यावर झडप घालतो... तिथं चाळणी वगैरे काही प्रकार नाही..!
शिवाय माझ्या दृष्टीने जे लेखक आउटडेटेड झालेले आहेत, किंवा त्यापुढे जाऊन एक कबूलीजबाब द्यायचा झाला तर जे लेखक मूळातच सामान्य होते, पण ते माझ्या फार उशीरा लक्षात आलं, त्यांच्या पुस्तकांवर चुकून जरी नजर पडली, तरी मी थोड्यावेळापुरता का होईना, चपापतो आणि मग घाईघाईने स्वतःला कोसत तिथून नजर काढून घेतो.. !
{{तीन पिढ्यांपासून मराठी कुटुंबांमध्ये ज्या अनेक पुस्तकांचा/ लेखकांचा उगाचच उदोउदो चालत आलेला आहे, आणि खरंतर ती पुस्तकं एकाच पिढीत खलास होऊन गेली असती, तर आमची त्यांच्यापासून आपोआपच सुटका झाली असती, असा विचार एका बाजूला...
आणि म्हणूनच त्या लेखकांना आता लोकांनी कायमचं टाटाबायबाय करून टाकायला पाहिजे, असा विचार करत असतानाच...
पण ते लेखक/पुस्तकं अजूनही सर्व दुकानांत, स्टॉल्सवर, लायब्रऱ्यांमध्ये दर्शनी भागात लावून ठेवलेले दिसत असल्यामुळे, त्या पुस्तकांचा वाचकवर्ग अजूनही मोठ्या संख्येनं अस्तित्वात आहे, हे लक्षात आल्यावर.. कुणाला काय आवडून घ्यावे हे ठरवण्याचे ज्याचे त्याला स्वातंत्र्य असतेच.. शेवटी, लेखक आणि वाचक ह्यांच्यामधला वैयक्तिक व्यवहार आहे हा सगळा, आणि आपण त्यात पडण्याचे काहीच कारण नाही, हा विचार दुसऱ्या बाजूला...
आणि शिवाय शेकडा पन्नास लोकांचे रोजच्या जगण्यातलेच प्रश्न एवढे पिळून काढणारे आहेत की मग हे वाचण्याचे वगैरे 'रिकामे धंदे' त्यांना कोठून सुचणार, असा एक माफक कम्युनिस्ट वगैरे विचार तिसऱ्या बाजूला चाललेला असतो.. तर असो. }}
३. शिवाय ह्याबद्दल अजून सांगायचं म्हणजे मी वेगवेगळ्या शहरांतल्या ज्या ज्या लायब्रऱ्यांचा मेंबर राहिलेलो आहे, तिथे दिवसातल्या कोणत्याही वेळी आळसावून सुस्त बसलेल्या लोकांचा पिच्छा पुरवायलाही मला बऱ्यापैकी जमायला लागलंय...
त्याचा एक पॅटर्न असतो..!
सुरूवातीला त्यांना संशय यायला लागतो की माझा एक आटा ढिला वगैरे झालेला आहे की काय, पण नंतर नंतर हळूहळू ते परिस्थितीला शरण जातात...
एकदा हे झालं की मग काहीच अडचण राहत नाही...!!
मग आपण दणादण क्लेम वर क्लेम टाकत रहायचे, जरा हे शोधून द्या, ते जागेवर सापडत नाहीये बघता का जरा.. मला हे पण हवंय आणि ते पण हवंय आणि हे चौथं मिळालं तर पाहिजेच आहे... ही स्टार केलेली पुस्तकं जरा आधी बघा आणि नंतर ह्या वरच्या पुस्तकांपैकी एखादं बघा... अरेच्चा हे तर वेगळंच आणलं तुम्ही.. अहो खानोलकर वेगळे.. ह्या कुणीतरी खानविलकर आहेत.. त्यांचं काय करू मी..! मीच आत जाऊन बघून आलं तर चालेल काय...?
तीन महिन्यांपूर्वी हे पुस्तक वाचायला गेलंय बाहेर.. अजून रिटर्न आलं नाहीये.. बघा जरा विचारून, वाचतायत की पाठांतर वगैरे करत बसलेयत तिकडे..!
हे असले संवाद... !
पण एक बरं असतं की दुर्मिळातली दुर्मिळ आणि आऊट ऑफ प्रिंट पुस्तकंही गोडीगुलाबीनं पदरात पाडून घेता येतात..
४. आणि आता पाल्हाळच लावायचं म्हटलं तर..
धार्मिक रूढी परंपरांना वाहून घेतलेली पुस्तकं..
तसेच 'हे पुस्तक वाचून तुमचं जीवन आमूलाग्र बदलेल' वगैरे सरळ सरळ गल्लाभरू पुस्तकं...
तसेच आरोग्यविषयक समस्यांवर रामबाण सल्ले देणारी पुस्तकं...
शिवाय असाध्य रोगांना कुणी कशी फाईट दिली वगैरे आणि जीवन हे किती अनमोल आहे वगैरे हमखास निष्कर्ष काढणारी पुस्तकं..
तसेच सामाजिक चळवळखोर पुस्तकं..
तसेच रिटायर झाल्यावरच ज्यांना कंठ फुटतो आणि सगळ्या भ्रष्ट वातावरणात मीच तेवढा भांगेत उगवलेल्या तुळशीसारखा निरागस होतो, असे दावे करत करत, उसासे टाकत टाकत, आयुष्यात कधीकाळी केलेल्या संघर्षाच्या आठवणी काढत, मधूनच फोडलेल्या हंबरड्यांनी भरगच्च अशी अधिकाऱ्यांची/समाजसेवकांची/नेत्यांची वगैरे आत्मचरित्रं...
तसेच महाभारतातील एखादं पात्र घेऊन त्यावर फुलं
उधळायला लिहिलेली पुस्तकं..
एखाद्या जातीला-धर्माला ठरवून टार्गेट करणारी किंवा ठरवून उदोउदो करणारी पुस्तकं..
शिवाय जगभरच्या अन्यायग्रस्त लोकांच्या कहाण्यांना कच्च्या मालासारखं वापरून लिहिलेली पुस्तकं..
शिवाय एखाद्या हळव्या कवयित्रीने 'कोवळ्या मनाचे धुमारे' किंवा 'आयुष्याचं चांदणं' वगैरे शीर्षक देऊन नवरा, दीर, जाऊबाई, सासूबाई, प्रिय आई-बाबा, नणंदा, भावजया, अशा सगळ्या गोतावळ्याला अर्पणपत्रिकेत स्थान देऊन, छापून घेतलेले कवितासंग्रह...
माझ्या देशभक्तीला कळकळीची,आर्त आवाहनं करणारी पुस्तकं..
तसेच वाचणाऱ्याचा फक्त टाईमपासच व्हावा, या एकाच उद्देशानं छापलेल्या, आणि ज्या वाचून हाती काहीच लागत नाही, अशा प्रकारच्या काही अनुवादित कादंबऱ्या...
आणि शिवाय आर्थिक गुंतवणूकीचे सल्ले देणारी पुस्तकं..
तसेच थुलथुलीत, गुबगुबीत कार्पोरेट गुरूंनी ठोकलेल्या चमकदार भाषणबाजीची पुस्तकं..
ह्या प्रकारच्या पुस्तकांमध्ये मला काहीही इंटरेस्ट वाटत नाही... आणि त्यामुळेच त्यांच्याकडे सरळसरळ दुर्लक्ष
करायला मला अजिबात वाईट वाटत नाही..
५. बाय द वे, हे तुम्ही अजूनही वाचत आहात का??
इंटरेस्ट वगैरे यायला लागलाय की काय? नाही ना??
मग ठीक आहे..
तर बऱ्याचदा होतं असं की एखाद्या आवडलेल्या पुस्तकात आणखी काही पुस्तकांचे एवढ्या भरजरी शब्दांमध्ये गोडवे गायलेले असतात की त्यामुळे विश लिस्टमध्ये भर पडते..
किंवा एखाद्या लेखकाचं एखादं गचांडी पकडणारं पुस्तक वाचता वाचता डोळे खवळतात.. भेळ खातेवेळी तोंड खवळतं आणि अजूनच खा खा सुटते ह्याची तुम्हाला थोडीफार कल्पना असेलच, तसंच हे ही..!
आता ह्यावर लगेच 'पुस्तकांना भेळेच्या मापात कसं काय तोलू शकतोस तू ? ह्याला काय अर्थ है !' वगैरे म्हणत कपाळावर आठ्या उत्पन्न व्हायच्या आधीच हे स्पष्ट करतो की मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल ना? मग ठीक आहे की..
तर असाच आतल्या आत खवळलेला, डहुळलेला असताना, शुक्रवारी संध्याकाळी काही पुस्तकांच्या शोधमोहीमेवर निघालो...
'अक्षरधारा'त काही मिळाली...उरलेल्यांसाठी डेक्कनच्या 'इंटरनॅशनल'ला.. तिथंही काही मिळाली.
पण इंटरनॅशनल वाले बोलले की 'लाईफ ॲंड टाईम्स ऑफ मायकेल के' ची एकच कॉपी दिसतेय आणि ती ही दुसरीकडे स्टॉकमध्ये आहे, जाऊन आणायला थोडा वेळ लागेल..
मग एफ सी रोडवर जरा निरूद्देश रेंगाळत राहिलो...
आता हे काही अगदीच निरूद्देश वगैरे म्हणता येणार नाही..!
उद्देश असतातच..!
त्यापैकी एक म्हणजे एफसी रोडवर संध्याकाळी बऱ्यापैकी हिरवळ असते.. ओह.. माफ करा, पण हिरवळ ह्या शब्दानं तुमचा माफक अधिक्षेप होण्याची शक्यता निर्माण झालीय का? तसं असेल तर माझा त्याबाबतीत अगदीच नाईलाज आहे...
म्हणजे सहज जाता जाता जरा चांगलं सुंदर काही नजरेच्या टप्प्यात येत असेल... तर मग एखादा निरूपद्रवी कटाक्ष गुपचूप टाकून आतल्या आत थोडंसं घायाळ होण्याची आपसूक मिळणारी संधी का बरे सोडावी?
आणि ह्यातून आपल्या सौंदर्यविषयक जाणीवांचा थोडासा विस्तार झाल्यासारखं वाटत असलं तरीही, हे सगळं आता आपल्या 'वयाच्या' कक्षेबाहेर निघून गेल्याची थोडीशी हुरहूर म्हणा किंवा अचूक शब्द वापरायचा झाला तर हळहळ म्हणा, ती व्यक्त करत करत आत्ममग्न असा मी पुन्हा त्या दुकानात पोहचलो तर ते बोलले की तुम्ही सोमवारी या, आणून ठेवतो, कारण शनिवार रविवार सगळं बंद आहे..
एकच कॉपी राहिलीय आणि आपण फुटक्या नशीबाचे आहोत, हे आधीच बॅकमाइंडमध्ये असल्यामुळे,
ते हाती लागतेय की नाही ह्या विचारात वीकेंड गेला आणि शेवटी सोमवारी दुपारी ते सॅकमध्ये टाकून चेन लावल्यावरच जरा बरं वाटलं.
तर हे असं होतं..!
आता तुम्ही म्हणाल की एवढं करण्यापेक्षा ऑनलाईन का मागवत नाहीस..
तर त्याला खास असं काही कारण नाहीये...
पण एखादं पुस्तक हातात घेऊन पारखून बघितल्याशिवाय, त्याची ओळख पटल्याशिवाय, त्याला माझ्यासोबत घरी घेऊन जाणं, हे मला फारच संकोचाचं वाटतं..
आणि ऑनलाईनमध्ये ह्या सगळ्या 'मधल्या' भानगडी खलासच होऊन जातात.. अर्थात त्याचेही काही फायदे आहेतच, ह्याविषयी दुमत नाही..
तर इतक्यात वाचलेल्या पुस्तकांपैकी.. मराठीतले काही फ्रेश, ताज्या दमाचे लेखक आहेत की ज्यांच्या शब्दकळेतून डोळ्यांना ताजं रक्त लागलेलं आहे..
अचूक डंख मारणारं, जखडणारं काही आहे त्यात..
मराठी भाषेला खळाळतं टवटवीत ठेवणारं काही..
आणि जीवाला घोर लावणारंही काही..
तर आता ह्यांना काही सोडत नसतो मी...
उदाहरणार्थ...
क्षुधाशांती भुवन-किरण गुरव
अतीत कोन? मीच-- प्रसाद कुमठेकर
फिनिक्सच्या राखेतून उठला मोर- जयंत पवार
वरणभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा- जयंत पवार
व्हाया सावरगाव खुर्द- दिनकर दाभाडे
दीडदमडीना, पेरूगन मुरूगन-- वर्जेश सोळंकी
हुसेनभाय और गणपतभाय व्हाया अमेरिका- वर्जेश सोळंकी
विवादे विषादे प्रमादे प्रवासे - प्रशांत बागड
नवल- प्रशांत बागड
आटपाट देशातल्या गोष्टी- संग्राम गायकवाड
संप्रति, उद्या - नंदा खरे
बाकी शून्य- कमलेश वालावलकर
निकटवर्तीय सूत्र, रिबोट- जी के ऐनापुरे
दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी- बालाजी सुतार
कोबाल्ट ब्ल्यू- सचिन कुंडलकर
दंशकाल- ह्रषिकेश गुप्ते
डॉ. मयांक अर्णव- आनंद विनायक जातेगावकर
अस्वस्थ वर्तमान- आनंद विनायक जातेगावकर
गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी- मकरंद साठे
निकटवर्तीय सूत्र, रिबोट- जी के ऐनापुरे
अच्युत आठवले आणि आठवण- मकरंद साठे
मी गोष्टीत मावत नाही- डॉ. सुधीर देवरे
जग दर्शन का मेला - रमणाश्रित
पान, पाणी आणि प्रवाह- अवधूत डोंगरे
एका लेखकाचे तीन संदर्भ— अवधूत डोंगरे
आणि अलीकडचे काही कवितासंग्रह... उदाहरणार्थ..
काळ्या जादूचे अवशेष- सत्यपालसिंग राजपूत
धांदलमोक्ष- स्वप्नील शेळके
बाउल- सौमित्र
तसेच एस्टॅब्लिश्ड लेखकांच्या पुस्तकांपैकी 'अलीकडची' काही.. उदाहरणार्थ..
तीव्रकोमल दु:खाचे प्रकरण -- रंगनाथ पठारे
सातपाटील कुलवृत्तांत- रंगनाथ पठारे
हिंदू- भालचंद्र नेमाडे
गवत्या- मिलिंद बोकील
चारीमेरा, बारोमास- सदानंद देशमुख
एन्कीच्या राज्यात- विलास सारंग
प्रेम आणि खूप खूप नंतर- शाम मनोहर
विनाशवेळा- महेश एलकुंचवार
मौनराग- महेश एलकुंचवार
रीटा वेलिणकर- शांता गोखले
प्रतिक्रिया
14 Jul 2021 - 6:29 pm | गॉडजिला
कडक लिखाण...
14 Jul 2021 - 6:54 pm | गुल्लू दादा
खूप छान. आवडले. धन्यवाद.
14 Jul 2021 - 6:55 pm | पाटिल
अभिप्रायाबद्दल धन्यवाद गॉडजिला
:-)
14 Jul 2021 - 6:57 pm | कंजूस
तुमची वाचनाची आवड दांडगीच आहे.
-----
आमच्याकडे फ्रेंडस लायब्ररीच्या मालकांनी ( पांडुरंग पै) प्रायोजक आणि सहकारी घेऊन 'पुस्तके अदलाबदल कार्यक्रम तीन वर्षे राबवला. २०२०,२०२१ चे झाले नाहीत. जुने पुस्तक द्यायचे आणि तिथे अदलाबदलीसाठी ठेवलेल्यातून दुसरे घ्यायचे दहा रुपयात. त्यात काही मिळाली.
लहानपणी मुंबई मराठी ग्रं० आणि दादर सार्वजनिकने खूप आधार दिला.
फुटपाथवर कधीकधी मिळतात.
इपब डाऊनलोड करून ठेवली आहेत खूप. ती वाचायला घेतो.
14 Jul 2021 - 7:12 pm | गुल्लू दादा
दिलेल्या यादीत डॉ.सुधीर देवरे यांची 'मी गोष्टीत मावत नाही' हे आहे. हे मिपाकर आहेत. त्यांच्या लिखाणात जाऊन बघता त्यांनी या कादंबरीचा जन्म कसा झाला याची झलक दिली आहे. मिपाकरचे नाव पाहून आनंद वाटला.
15 Jul 2021 - 10:08 am | संजय पाटिल
ह्या यादीतली ३ -४ वाचली आहेत, आता बाकीची वाचायला घेतो.
बाकी लेख मस्तच....
15 Jul 2021 - 6:55 pm | पाटिल
अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार.. आणि सर्वांच्या ओंजळीत चांगली चांगली पुस्तकं येत राहो, ह्या शुभेच्छा.. _/\_
15 Jul 2021 - 7:07 pm | Nitin Palkar
असा व्यासंग करायची इच्छा आहे..
ह. घ्या.