चित्रपट आणि वृत्तपत्रातून भाषेचे धडे

केदार भिडे's picture
केदार भिडे in जनातलं, मनातलं
30 Jun 2021 - 12:20 am

Nicos Weg हा जर्मन भाषा शिकवण्यासाठी निर्माण केलेला चित्रपट बघितला. त्यानिमित्ताने भाषेचे धडे घेण्याबद्दलचा माझा अनुभव मी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.

२०१९ साली काही कामानिमित्त जर्मनीत प्रवास करण्याची संधी मिळाली. त्याचे निमित्त साधून आणि तिथे उपयोग होईल म्हणून मी Duolingo या ऍपवरून जर्मन भाषा शिकण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा मला लवकरच कंटाळा आला आणि आणखी दुसरे साधन मला सापडले नाही. त्यामुळे जर्मन भाषेचे शिक्षण तसेच राहिले. जर्मन भाषा माहित नसल्याने एक गमतीदार प्रसंगही घडला. आम्ही एका क्रमांकाचे घर रस्त्यावर शोधत होतो. शोधता शोधता Einbahnstrasse अशी पाटी दिसली आणि आम्हाला वाटले आमचा रस्ता त्या क्रमांकाचे घर यायच्या आधीच संपला आणि नवीन रस्ता सुरु झाला. तिथे आजूबाजूला घरे होती पण कुणी विचारण्यासारखे दिसेना. १० मिनिटे तिथेच वाट बघितल्यावर शेवटी एक माणूस भेटला आणि त्याने आम्हाला सांगितले की ही एकदिशा मार्ग सांगणारी पाटी आहे आणि तुम्हाला हवे असलेले घर आणखी पुढे आहे. आता भाषा शिकल्यानंतर त्याचा अर्थ चांगलाच लक्षात येतोय. तर जर्मनीहून परत आल्यावर पुन्हा एकदा Duolingo वर शिकण्याचे प्रयत्न केले पण Duolingo मला आवडले नाही. व्याकरणाचे धडे त्यातून मिळत नसल्याचे कारण असावे. शेवटी याच वर्षी श्री. केदार जाधव (केदार जाधव जर्मन युट्युब चॅनेल) यांचे जर्मन शिकवणारे युटयूब चॅनेल मला युट्युबने सुचवलेल्या व्हिडिओत दिसले. केदार जाधव यांनी जर्मन व्याकरणाचे धडे अगदी सहज लक्षात येतील अशा रीतीने शिकवले आहेत. मला वाचनालयात एक चांगले पुस्तकही (जर्मन भाषा रोझेनबर्ग) मिळाले ज्यातून व्याकरणाचे अधिक वाचन आणि प्रश्नसंच सोडवण्यातून सराव करणे शक्य झाले. त्यामुळे माझे जर्मन भाषेचे २ वर्षे रखडलेले शिक्षण सुरु झाले. त्यानंतर माझ्या मैत्रिणीने DW (Deutsche Welle - German Wave) या जर्मनीच्या शासन पुरस्कृत वाहिनीने तयार केलेला Nicos Weg (निकोचा प्रवास Nicos Weg) हा चित्रपट सुचवला. जर्मनीत स्पेनमधून आलेल्या तरुणाची पिशवी विमानतळावर हरवते आणि त्यातून मग त्याला काही लोक मदत करतात, त्यांच्याशी त्याची मैत्री होते अशी अगदी साधी गोष्ट आहे. साधारण ९० मिनिटांची असलेली ही गोष्ट दीड-दोन मिनिटांच्या छोट्या भागात युट्युबवर आपल्याला बघता येते. या कथेच्या प्रवाहाबरोबर आपल्याला अंक, रंग, शिष्टाचार, वस्तूंची नावे, दुकानात काय विचारावे, अन्य विविध प्रश्न कसे विचारावे याचे नमुने ऐकायला मिळतात. भाषेचे धडे हा जरी उद्देश असला तरी छोट्या छोट्या भागात पाहताना कंटाळा येत नाही. अर्थात कथेत नेमके काय सुरु आहे ते जर्मन भाषेचे धडे आधी घेतलेले असणे गरजेचे आहे. चित्रपटामुळे उच्चार नेमके लक्षात येतात आणि शिकलेल्या गोष्टी नीटपणे लक्षात राहतात. डॉइश वेल्ले च्या संकेतस्थळावर या चित्रपटावर आधारित प्रश्नसंचही उपलब्ध आहेत. आपल्या भाषेचा प्रसार आणि त्याकरता प्रशिक्षण यासाठीच डॉइश वेल्लेचा हा उत्तम प्रयत्न आहे.
इंग्रजी शब्दांचा कमीतकमी वापर या चित्रपटातून आणि पुस्तकातूनही जाणवतो. इंग्रजी मुळातच जर्मनीक भाषा असल्यामुळे काही साधर्म्य असणारे शब्द असणारच. पण त्याहूनही असे अनेक शब्द जे आपण मराठी बोलताना इंग्रजीतले वापरतो ते जर्मन भाषेत तसे वापरत नाहीत. हे मी केवळ पुस्तक आणि चित्रपटाच्या अनुभवातून सांगतोय. तिथे भाषा शिकवण्यासाठी मुद्दाम जर्मन शब्द वापरले आहेत असे असू शकते. त्याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे. जर्मन लोकांनी हे कुठून उत्पन्न केले याबद्दल माहिती शोधावी लागेल.
Speisekarte (Menu), Handy (Cellphone), Stifte (Pencil), Aufzug (Elevator),
Wohnung (Flat), Verträger (delivery man/woman), Lageplan (floor plan), Mappe (File or folder)

उच्चार करता करता थकून जाऊ असेही काही शब्द पुढील प्रमाणे जर्मन भाषेत आहेत ज्यांच्यासाठी मराठीत सहज शब्द आठवणे कठीण जाईल.

Bewerbungsgespräch (job interview)
Bewerbungsunterlagen (application documents, in reference to interview), Wohngemeinschaft (flat shared by people)

Job interview ला नोकरीसाठी मुलाखत असे म्हणता येईल पण त्याचा एक शब्द सांगता येणार नाही. (यातील काय योग्य काय अयोग्य, मराठी भाषिकांनी काय करावे याबद्दल कोणतेही मत नाही. जर्मन भाषेबद्दलचे निरीक्षण केवळ नोंदवले आहे.) इझी जर्मन या चॅनेलने भारतात (Easy German in India) तयार केलेल्या व्हिडिओत भारतात खूप इंग्रजी शब्द वापरात असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

चित्रपटांनी इंग्रजी भाषेचेही धडे देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. चित्रपटांसोबत इंग्रजी वृत्तपत्रानेही (The Indian Express) मोलाची मदत केली आहे. इंग्रजी वृत्तपत्र वाचायला सुरुवात केल्यावर नवीन दिसलेले शब्द शब्दकोशात पाहून वृत्तपत्रातल्या वाक्यासहित लिहून काढण्याची सवय लावून घेतली. त्यामुळे अनेक नवीन शब्द चांगले लक्षात राहिले. पण वृत्तपत्रात संवाद नसतो. त्यामुळे संभाषण कसे करावे हे त्यातून नीट काळात नाही. तिथे चित्रपटांचा उपयोग होतो. वृत्तपत्रातून भाषेचे धडे घेण्याची क्लुप्ती मी गुजराती (काही काळ गुजरात येथे वास्तव्यास असताना) आणि कोंकणी या भाषांवर वापरून पाहिली. गुजरात मध्ये भाषेची वेगळी लिपी असल्याने आधी लिपीचा सराव होणे गरजेचे. देवनागरी लिपी आणि गुजराती लिपीत काही अक्षरे सामान आहेत. गुजराती वृत्तपत्र वाचून गुजराती लिपी वाचण्याचा उत्तम सराव झाला. त्याच्या जोडीने व्याकरणाचे धडे न घेतल्यामुळे वाचनापलीकडे प्रगती करू शकलो नाही. कोंकणी भाषा विविध लिपीत लिहिली जाते. कोंकणी भाषा आणि देवनागरी लिपी असलेले वृत्तपत्र भांगरभूय आपल्याला वाचता येते. कोंकणी भाषाही वाचून नेमके काय लिहिले आहे ते मराठी भाषिकास समजू शकते. मात्र त्यातही अजून वृत्तपत्राच्या पलीकडे फार प्रगती नाही. भविष्यात किमान कोंकणी भाषा तरी व्यवस्थित शिकण्याची इच्छा आहे. कोंकणी भाषा शिकण्याचे प्रयत्न करताना मराठीतल्याच एका शब्दाबद्दल मला अधिक उलगडा झाला. मधुमेहासाठी कोंकणी मध्ये वापरला जाणारा शब्द गोडेमूत असा आहे, जो वाचून अगदी नेमका अर्थबोध होतो. इंग्रजीतील डायबिटीस याही शब्दाचे मूळ 'सतत मूत्रविसर्जन करणारा रुग्ण' याच संकल्पनेत आहे. गोडेमूत या शब्दाने आजार नेमका पकडला आहे. अर्थात मधुमेह याही शब्दाने ते साधले आहेच.

हल्ली स्मार्टफोन एवढे स्मार्ट झाले आहेत की एखाद्या भाषेतल्या वाक्याचे छायाचित्रही घेतले तरी लगेच त्याचे भाषांतर आपल्याला पाहिजे त्या भाषेत करता येते. तरीही स्वतः एखादी भाषा आणि तिचे व्याकरण शिकण्यात आणि नंतर बोलण्यात वेगळीच मजा आहे.

भाषाअनुभव

प्रतिक्रिया

मला हे पुस्तक आवडले होते, कुठं मिळालं तर जरूर घ्या
https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5651578263927253883

याची हिंदी आवृत्ती ऍमेझॉनवर दिसते आहे.

मुक्त विहारि's picture

30 Jun 2021 - 12:30 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

कुमार१'s picture

30 Jun 2021 - 9:35 am | कुमार१

छान अनुभव.

चौथा कोनाडा's picture

30 Jun 2021 - 12:20 pm | चौथा कोनाडा

खुप रोचक अनुभव.
निकोचा प्रवास हा सिनेमा बघणार !

मुक्त विहारि's picture

30 Jun 2021 - 12:29 pm | मुक्त विहारि

वाखूसा