नवकवीस्तोत्र
काही करण्या उरले नसता । आपली पाटी कोरी असता ।
काही बकांची ध्यानस्थ स्तब्धता । मत्स्यमारीकारणे ।।
दिसता कोणीही नवखा । लबाड साधिती मोका ।
त्याची बुडवती नौका । लागलीच ।।
पाडावी भोके यथेच्छ । भाषा तरी वापरावी स्वच्छ ।
भासवावे तयाते तुच्छ । आत्मक्लेशे ।।
कवीचे उडवावे शिरस्त्राण । मागाहुनि करावे शिरकाण ।
मनसोक्त मारावे पादत्राण । कवितेवरी ।।
आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे ।
सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।।
अशाने होते तरी काय । कवी हतोत्साही होऊन जाय ।
परि अंतरी लागते हाय । कायमची ।।