एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला
जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला
एक कागद कस्पटासम ||धृ ।।
एक बालक हाती घेई,
मायेने मग आकार देई,
बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।।
उंच विहरता मन स्वच्छंदी,
हीन भासली भुतल रद्दी,
वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।।
वाटे त्यासी उंच उडावे
वादळ वारे यांसी भिडावे
कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।।
इतकी उंची तये गाठली
साद मनीची नभी आटली
ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।।
गगन ठेंगणे खुणवी तारे
मांजा परी तो रोखुनी धरे
दृढनिश्चय तो मनी करुनी, तोडी त्या नाळेला ।। ५ ।।
उंच उंच तो जातच राही
स्वानंदी मग तल्लीन होई
कासावीस ते बालक धावे, कैसे कळणे त्याला ।। ६ ।।
सोसाट्याचा सुटला वारा
कधीच मुकला परी आधारा
भरकटलेला गोंधळलेला, लटके बाभळीला ।। ७ ।।
धावत धावत बालक येई
अलगद त्यासी कवेत घेई
घाव पुसुनि तया मनीचे, सज्ज करी उडण्याला ।। ८ ।।
उंची कितीही गाठो कोणी
बाहुबली वा अगाध ज्ञानी
मातीशी या नाळ तोडुनी, सफल न कोणी झाला ।। ९ ।।
प्रतिक्रिया
27 Nov 2017 - 11:45 pm | एस
कविता आवडली. भा. रा. तांबेंची झलक दिसली. फार छान.
28 Nov 2017 - 12:41 am | गबाळ्या
लगोलग वचनाबद्दल आणि प्रोत्साहित करणाऱ्या अभिप्रायाबद्दल खूप आभार !
भा. रा. तांबे हे एक अत्युच्च शिखर आहे. त्यांची झलक तुम्हाला दिसली हा तुम्ही माझ्या क्षमतेपेक्षाही जास्त केलेला माझा गौरव आहे.
28 Nov 2017 - 7:16 am | प्राची अश्विनी
आवडली.
28 Nov 2017 - 8:02 am | गबाळ्या
उत्तेजन देणाऱ्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.