(लिहितो विडंबन स्वतःच साठी)
लिहितो विडंबन स्वतःच साठी
समोर दिसता कच्चा माल
शब्द कल्पना यमके सारी
आपसुक धरती त्यावर ताल
विषय निवडीचा नसे विकल्प
चारोळी, गजल की पोवाडा,
जो कविने विषय मांडला
त्यावरी केवळ तुटून पडा
वाचून किंवा दुर्लक्षूनही
डोळ्यांपुढती नाचत राही
मग डोक्याची होते मंडई
लेखणी खुपसून फाडून खाई
लिहा लिहा तुम्ही लिहा कविता
धीर जराही मनी न धरा!
जोरात चालूदे गिरणी तुमची
पिठही पाडा भराभरा
विषय सत्वरी ना मिळतो जर तर
उघडा गालीब किंवा ग्रेस
उडवा धुरळा यमकांचा की
वाचन करता यावा फेस