भयकाल
हळू हळू एकेक करत
हरवत चालले आहे...
ज्याच्याकडे पहात पहात
आम्ही आमचे मार्ग शोधायचो
तो ताराच आकाशातून
नाहीसा झाला आहे
आणि तो एकुलता एक चंद्रही...
ज्याची स्वप्नं बघत बघत
आम्ही निश्चिंत झोपी जायचो...
नाहीशा होणाऱ्या प्रत्येकाला मी
खिडकीतून पहात राहतो
आणि मनातल्या मनात चरकतो
उद्या मी ही असाच नाहीसा झालो तर!
आज सकाळी डोळे उघडले
तर ते समोरचे हिरवेकंच झाड
कुठेच दिसत नव्हते
ना ही कुठला पक्षी
या पृथ्वीवरून
हळूहळू एकेक गोष्टी
हरवत चालल्याचे दिसत आहे