ऑब्जेक्षनेबल..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
23 Sep 2019 - 12:21 pm

मी रिटायर होण्यापूर्वी एकूण एकतीस वर्षे रेडिओत नोकरी केली. आकाशवाणीवर असताना कोणते शब्द,वाक्यं, गाणी प्रसारीत होऊ द्यायची याबाबत काटेकोर नियम होते. ते पाळावेच लागत. म्हणजे पाळले नाहीत नाहीतर मेमो मिळत. मग मेमोवर न भागलेल्या केसेसना गांभीर्यानुसार प्रसंगी सस्पेन्शन ही भोगावे लागे. तर ते असो.

आता "अबीर गुलाल उधळीत रंग" हा तसा किती रसाळ अभंग आहे की नाही ?!
पण तो आम्ही रेडियोवर लावू शकत नव्हतो, कारण त्यात "उंबर्‍यासी कैसे शिवू आम्ही यातीहीन " अशी ओळ आहे. म्हणजे आम्ही हीन जातीचे लोक देवा तुझ्या पायरीला कसे शिवू?

यातून हीन समजल्या जाणार्‍या जातीला मंदिरप्रवेश नाही असा अर्थ होतो आणि तो अर्थातच आक्षेपार्ह आहे. हे सर्वच कर्मचाऱ्यांना लक्षात येईच असं नव्हतं.

याच न्यायाने "थांबली बहिणाई दारी. देऊळातल्या देवा याहो, उतरा ही पायरी " हे गाणे चालत नसे.इथेही बहिणाईला मंदिरप्रवेश नाही असा अर्थ होतो.

"जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार " पुढे तर "तुमच्या उष्ट्यासाठी आलो." हे शब्द आहेत.

यात जातिवाचक शब्द आल्याने हे गाणे चालत नसे. जातीला हीन लेखणारा कोणताही शब्द चालत नसे. एकूण कोणत्याही जातीचा तुच्छतेने उल्लेख, वरुन त्याला "डा" अक्षर जोडून अनेक जुन्या पुस्तकांत, साहित्यात असायचा. मूळ साहित्यात तो कोणाच्याही तोंडी किंवा कोणत्याही संदर्भात का असेना.
असले शब्द अर्थातच आक्षेपार्ह होते. आणि त्या शब्दांच्या वापराबाबत शिक्षा होणं योग्यच म्हणता येईल. त्यामुळे कोणतेही उतारे किंवा काव्य जसेच्या तसे उद्धृत करताना खूप काळजी घ्यावी लागायची.

"मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट" हे शब्द फक्त सैन्यभरतीच्या निवेदनात चालत. "स्त्री ही पायातली वाहाण आहे,ती पायातच राहिली पाहिजे", असली वाक्यं चालत नसत. मग भले ती खलपात्राच्या तोंडी का असेनात. गीतेतला "चातुर्वर्ण्यम मया सृष्टयम "हा श्लोक चालत नसे. तसेच पुरुषसूक्तातील "देवाच्या मुखापासून ब्राह्मण उत्पन्न झाले. छातीपासून क्षत्रिय ,पायापासून शूद्र निर्माण झाले" अशा अर्थाचे वर्णन चालत नसे गीतेतला "नारी शूद्र यांनाही मोक्ष मिळतो. मग
ब्राह्मणांना, राजर्षिना मिळेल यात काय आश्चर्य ?"अशा आशयाचा श्लोक चालत नसे. अर्थातच यामागचा हेतू अतिशय योग्य असल्याने तक्रार असण्याचं कारण नव्हतंच, पण जनतेतल्या बहुविध प्रकारच्या लोकांकडून स्क्रिप्ट लिहून घेताना, वाचून घेऊन रेकॉर्ड करताना सदैव क्रिकेटच्या अंपायरप्रमाणे डोळ्यात आणि कानात तेल घालून सावध राहावं लागतं असे.

हरिजन,गिरिजन हे शब्द चालत नसत. मग ते अगदी खुद्द महात्मा गांधींनी का म्हटले असेनात. आमच्यातल्या एक बेसावध राहिला. त्याने गांधी जयंतीला एक रूपक सादर केले. त्याने महात्मा गांधीजींच्या भाषणातला काही भाग त्या रूपकात वापरला. खुद्द त्यांच्या भाषणातला उतारा म्हणजे काही आक्षेपार्ह असण्याची शक्यता नाही असं मानून तो गाफील राहिला असावा. पण त्यात "हरिजन" हा शब्द होता. भले तो त्या काळाच्या संदर्भात का वापरलेला असेना. मेमोला कारण झालं!

गांधीजीच्या त्या जुन्या रेकॉर्डस इतक्या अस्पष्ट ऐकू येतात की त्या बिचार्‍याच्या कानातून तो शब्द कानचुकीने निसटलाही असेल. पण आमच्यापैकी कुणीही नंतर गांधीजींच्या भाषणाच्या रेकॉर्डसना हात लावला नाही.

हे झालं जाती आणि समाजांवरून. पण याखेरीज उदाहरणार्थ म्हणजे कुठल्याही प्रॉडक्टचं, ब्रँडचं वगैरे नाव घेता येत नसे.

नभोनाट्यात "तुझे डोके दुखते आहे का?थांब मी अमृतांजन लावून देते." किंवा "मी मस्तपैकी लक्स लावून आंघोळ करून आलो", "पॉंड्सचा सुवास आसमंतात दरवळला" अशी वाक्ये चालत नसत. जाहिरात होते म्हणून.

"क्रोसीनची गोळी घे" असं न म्हणता "वेदनाशामक गोळी घे" असा संवाद म्हणावा लागे.

आपल्या देशाविरुद्ध ,राष्ट्रध्वजाविरुद्ध कोणाकडून चुकून नकळत काही गैर उद्धृत होऊ नये म्हणून काळजी घेत असू. हे तर साहजिक व्हायचं. पण देशाच्या परराष्ट्र धोरणानुसार एखाद्या राष्ट्राशी आपण मैत्री करायची ठरवली असेल तर त्या राष्ट्राबद्दलही नजरचुकीने वाईट उल्लेख चालत नसे. त्याविषयी माहिती अद्ययावत ठेवावी लागे.

प्रत्येक स्क्रिप्ट हे डोळ्यात तेल घालून वाचले जाई त्यावर "नथिंग ऑब्जेक्षनेबल, सुटेबल फॉर ब्रॉडकास्ट" असा शेरा असेल तरच ते स्क्रिप्ट प्रसारित होई.

ही सर्व काळजी घेणं हा कामाचा आवश्यक भागच होता, पण..

एखादा कार्यक्रम लाईव्ह, म्हणजे थेट प्रक्षेपणवाला असेल तर श्रोता फटकन काय बोलेल यावर आमचा ताबा राहत नसे. त्याची मजा फिर कभी...

समाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Sep 2019 - 12:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

किशोर कुमारची गाणी सुध्दा आकाशवाणी वर वाजायची नाहीत असे ऐकून आहे, त्या बद्दलही लिहीना....

पैजारबुवा,

प्रदीप's picture

25 Dec 2019 - 2:27 pm | प्रदीप

खरे आहे, पण ते फक्त इमर्जन्सीच्या काळात होते, इतर वेळी नव्हे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Sep 2019 - 12:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

सरकारी विनोद !

जॉनविक्क's picture

23 Sep 2019 - 12:40 pm | जॉनविक्क

???

खूप बंधने असली की क्रिएटिव्ह काम कितपत होत असेल शंकाच आहे. अर्थात बंधने पाळूनही काही मनोरंजक कार्यक्रम बनवणं हेही कौशल्यच म्हणा.

मस्त.
क्रमशः करावे ही विनंती

श्वेता२४'s picture

23 Sep 2019 - 12:59 pm | श्वेता२४

लईच कडक होते म्हणायचे. असो. नवीन माहिती.

जालिम लोशन's picture

23 Sep 2019 - 1:27 pm | जालिम लोशन

सुरेख

नि३सोलपुरकर's picture

23 Sep 2019 - 1:41 pm | नि३सोलपुरकर

"कानचुकीने " _/\_

नि३सोलपुरकर's picture

23 Sep 2019 - 1:41 pm | नि३सोलपुरकर
नि३सोलपुरकर's picture

23 Sep 2019 - 1:42 pm | नि३सोलपुरकर

"कानचुकीने " _/\_

मराठी_माणूस's picture

23 Sep 2019 - 2:21 pm | मराठी_माणूस

ऑब्जक्षनेबल गाणी (लेखात उल्लेख केलेली) "आपली आवड" अंतर्गत रसिंका कडुन विनंती स्वरुपात आली तर ?

अर्थातच ती विनंती स्वीकारता येत नसे.

महासंग्राम's picture

23 Sep 2019 - 2:41 pm | महासंग्राम

आज्जे लै बेस लिवलंय पुढचे भाग येऊद्या

एखादा कार्यक्रम लाईव्ह, म्हणजे थेट प्रक्षेपणवाला असेल तर श्रोता फटकन काय बोलेल यावर आमचा ताबा राहत नसे.

आज्जे, वक्ता म्हणायचंय का?

हरवलेला's picture

24 Sep 2019 - 5:08 am | हरवलेला

द्या मेमो आजीला ...

लाईव्ह म्हणजे मुख्यतः डायल इन कार्यक्रम असायचे. श्रोत्यांनी थेट फोन करुन उपस्थित तज्ञाना प्रश्न विचारणे किंवा एखाद्या घटनेविषयी प्रतिक्रिया घेणे, किंवा श्रोत्यांनी फोनवरुन फर्माईश करणे, अशा प्रकारचे कार्यक्रम.

बाकी नेत्यांची भाषणं वगैरे अगोदर ठरलेली असल्याने त्यात शक्यतो आक्षेपार्ह काही ऐनवेळी येत नाही. मुख्यतः श्रोत्यांशी संवाद या प्रकारचेच अनेक लाईव्ह कार्यक्रम होते , असतात.

प्रदीप's picture

25 Dec 2019 - 2:34 pm | प्रदीप

पूर्वी लाईव्ह म्हणजे अगदी 'लाईव्ह'च-- तात्काळ ते ऑन- एयर जाई. आता, डिजिटलच्या वापरामुळे बहुतेक सर्व आकाशवाण्या व दूरचित्रवाण्या, थोडाफार 'डीले' देऊनच फीड्स 'ऑन- एयर' जाऊ देतात. हेतू अर्थात चुकीच्या शब्दास/ दृष्यास 'ब्लॉक' करता यावे, हा आहे.

काही अतिशय 'जागरूक' देशांतील प्रक्षेपणकर्त्यांना तर कायद्याने, सगळेच बाहेरून येणारे, सतत डीले करून पुढे जाऊ द्यावे लागते.

कंजूस's picture

24 Sep 2019 - 5:17 am | कंजूस

गाळीव रत्नेच.

सर्व वाचणाऱ्या आणि प्रतिसाद देणाऱ्यांना धन्यवाद.

अनिंद्य's picture

24 Sep 2019 - 10:49 am | अनिंद्य

हे आवडले.
आकाशवाणीचे अजून किस्से वाचायला आवडतील.

गामा पैलवान's picture

24 Sep 2019 - 1:06 pm | गामा पैलवान

आज्जीबाय,

मस्त किस्से हाईत तुमच्याकडं. आजून सांगा ना!

रच्याकने : कंपनीच्या गलथान कारभारामुळे जो प्रसंग गुदरला त्यामुळे तो अगदी गर्भगळीत होऊन गेला. हे (माझ्या आवडीचं) वाक्य चालेल काय? यांत तीन आक्षेपार्ह शब्द आहेत.

गलथान = गालावरची थानं (बोकडाची असतात ती) की गळलेली थानं?
गुदरला म्हणजे नक्की कुठून कुठे गेला?
गर्भगळीत या शब्दाबद्दल बोलायलाच नको.

आ.न.,
-गा.पै.

कानडाऊ योगेशु's picture

24 Sep 2019 - 4:18 pm | कानडाऊ योगेशु

माझ्या आठवणीप्रमाणे दूरदर्शन आधी सकाळी काही वेळ व संध्याकाळी ५ नंतर चालु व्हायचे. पण जेव्हा दुपारचे प्रक्षेपण ही चालु झाले तेव्हा काही कलाकुसरी संबंधींचे कार्यक्रम असायचे.(डेलि सोप नंतर आले. पहिला डेली सोप शांती ही मालिका होती. मंदीरा बेदीची). तिच्यातही असाच प्रकार असायचा. फेविकॉल न म्हणता चिपकाने वाला पदार्थ असे वारंवार यायचे. एका गेस्टने चुकुन फेविकॉल असे म्हटले व मग लगेच चिपकाने वाला पदार्थ असे म्हटले.

मराठी_माणूस's picture

30 Sep 2019 - 3:29 pm | मराठी_माणूस

पहिला डेली सोप शांती का हमलोग ?

तारेवरची कसरतच की रेडीओवरची नौकरी!!

प्राची अश्विनी's picture

27 Sep 2019 - 10:39 am | प्राची अश्विनी

छान लिहिलंय.

नाखु's picture

28 Sep 2019 - 4:07 pm | नाखु

इतक्या मोठ्या कालावधीमध्ये नोकरी असल्याने बरेच किस्से असतील,नाव ओळख न देता इकडे टाका एकूणच सरकारी आकाशवाणी दूरदर्शन यांच्या कामकाजाबाबत आणि निर्माण होणाऱ्या गोंधळावर थोडंफार वाचन विनया धुमाळे यांच्या लोकसत्तामध्ये आलेल्या लेखमालेतूनच वाचले आहे.बाकी सरकारी नोकरीत सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते हेच लक्षात आले.
वृततनिवेदकांचे आणि वार्तांकन करताना आलेले अजब अनुभव यांचा खजिना आज्जी नक्कीच आहे.
तो येऊद्या जरा अंगड टोपड घालून.

विविध भारती श्रोता वाचकांची पत्रेवाला नाखु

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

30 Sep 2019 - 6:36 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

छान लिहिलय! हे वाचून लीलावती भागवतांनी 'रेडिओचे दिवस' (बहुतेक) असं एक पुस्तक लिहिलं होतं ते मी वाचलं होतं त्याची आठवण झाली. माझ्या ओळखीच्या नेने मॅडम, कमल विजयकर होत्या आकाशवाणीवर. त्यांच्याकडूनसुद्धा बर्‍याच गोष्टी ऐकल्या. तुम्ही अजून लिहा. वाचायला आवडेल.

प्रदीप's picture

25 Dec 2019 - 2:42 pm | प्रदीप

आवडली. ह्या मराठी गीतांत असे काही असेल असे वाटले नव्हते.

तरीही "थांबली बहिणाई दारी...' हे गीत पूर्वीतरी मी आकाशवाणीवरूनच ऐकलेले असल्याचे आठवते आहे. कारण ही माध्यमे-- विशेषतः आकाशवाणी- व लग्नसमारंभात लावलेल्या रेकॉर्ड्स सोडून, गीते ऐकण्याची इतर काही साधनेच तेव्हा नव्हती. म्हणजे, बहुतेक हा हळवेपणा नंतर कधीतरी आला असावा.

मात्र पन्नाशीच्या दशकातही 'चीनो अरब हमारा, हिंदोस्ताँ हमारा,...' हे 'फिर सुबह होगी' मधील गीत 'आकाशवाणीवरून हद्दपार करण्यात आले होते.