महाबडबडगीत
वस्त्र ढगांचे धुवून सागरी वाळत घालीन व्योमी
धग सूर्याची परिटघडीला येईल माझ्या कामी
कधि चंद्राचा घेउनी चेंडू करेन क्रीडा गगनी
चांदणमेवा थोडा थोडा चाखिन अधुनी मधुनी
प्रकाशवर्षांचे अंतर मी तोडिन प्रकाश वेगे
अंतरिक्ष लंघून संपता कशास येईन मागे?
भव्य स्वप्न हे माझे कधितरी येईल का सत्यात?
ठाऊक नाही, पण तोवर मी झोपून पाहीन वाट!