वाईट झालं
स्वतःच्या महागड्या गाडीत बसून, पाणावलेल्या डोळ्यांनी श्रवण चितेकडे बघत होता. माझ्यापेक्षा वयाने थोडासाच मोठा पण परिस्थितीमुळे लौकरच मोठा झालेला. नवऱ्याच्या बेताल स्वभावाला वैतागलेली सासुरवाशीण आपल्या तिन्ही मुलांना घेऊन माहेरी आली. सणावाराला आले की अगदी डोक्यावर घेणारे मामा-मामी आता वेगळे वागताहेत हे पाचवीतल्या श्रवणला लगेच कळले. मामांबरोबर शेतात जाऊ लागला. सगळं शेत, गोठा, गुरं आवरूनच घरी यायचा. अधे मध्ये येऊन तरी काय करणार होता. आई बिगारीवर जायची. घरी आलं कि घरची कामं काही ना काही असायचीच त्यापेक्षा गुरं, झाडं, रोपं त्याला जवळ करायची.