कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग २: पिथौरागढ़ भ्रमंती
३ डिसेंबरची सकाळ! कालची रात्र उघड्या बस स्टॉपवर थंडीत काढल्यानंतरचा पहाटेचा अंधारातला घाटाचा प्रवास! ही रात्र संपणारच नाहीय असं वाटत होतं. पण चक्क रात्र लवकर गेली. डुलकी लागली आणि तास गेलेले कळालं नाही. टाईम लॅप्स फोटोग्राफीमध्ये जसे काही तासांचे काही सेकंद होतात, तशीच रात्र भरभर गेल्यासारखी वाटली! टनकपूरवरून तीनला निघालेली बस साडेपाचला चंपावतला चहासाठी थांबली तेव्हा पहाट झाल्याचं दिसलं! सर्वदूर उंच पर्वत! वळणा वळणांचा रस्ता! डोंगरात थोडी थोडी घरं आणि उतारावरची शेती! "बीआरओ" च्या हिरक परियोजनेच्या अंतर्गत हा रस्ता येतो. नंतर लोहाघाट, गुरना मार्गे पिथौरागढ़!
