डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला हा - काजोल, विशाल जेठवा यांच्यासह आमिर खान ची छोटी भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच 'चॅनेल सर्फिंग' करताना दिसला. एवढ्या सशक्त अभिनेत्यांचा हा कोणता सिनेमा आपण पाहीला नाही, या विचाराने सर्फिंग थांबले. जसजसं कथानक पुढे सरकायला लागलं, तसतसं न पाहिलेल्या भागाचा अंदाज येऊ लागला आणि चित्रपटात गुंतत गेलो - याचे श्रेय नक्कीच दिग्दर्शक रेवती (दक्षिणात्य अभिनेत्री), पटकथा लेखक समीर अरोरा व कौसर मुनीर या त्रयीना जातं. हा चित्रपट श्रीकांत मूर्थी यांच्या The Last Hurrah या पुस्तकांवर आधारित आहे.
आता कथानकाबाबत, तुम्ही ऋत्विक रोशनचा 'गुजारिश' हा चित्रपट पहिला असेल किंवा त्याबद्दल ऐकलं असेल ज्यात इच्छामरण/दयामरण (euthanasia) या अत्यंत संवेदनशील विषयावर भाष्य केले आहे. त्याच विषयावर पण ‘कोलवेनू व्यंकटेश’ या आंध्र प्रदेशातील मुलाच्या २४ वर्षाच्या आयुष्यावर आधारित सलाम वेंकी हा चित्रपट 'गुजारिश' पेक्षा अजून पुढे जातो. यात वेंकी या ५/६ वर्षाच्या मुलाला Duchenne Muscular Dystrophy (DMD) हा असाध्य आजार झालेला असतो, डॉक्टरांच्या मते अश्या रुग्णाचे आयुष्य फार तर १४/१५ वर्ष असतं. मुलाची आई (काजोल) सतत त्याच्या वैद्यकीय आणि मानसिक आरोग्याबाबत जागृक असते, त्यामुळे हा मुलगा वयाची २४ वर्षे पाहू शकतो. या तरुण वेंकी (विशाल जेठवा) च्या शेवटच्या काही दिवसांचं उत्तम सादरीकरण मनात नक्कीच घर करून जातं.
Euthanasia आणि organ donation म्हंटलं तर अगदी परस्पर विरोधी बाबी आहेत, एक स्वतःच आयुष्य संपवत दुसर्यांना आयुष्य देऊन जातं. यामध्ये वेंकीला इच्छामरण घेऊन नंतर स्वतःचे अवयव दान करायचे असतात. पण त्यात आधी घरच्यांचा भावनिक विरोध व नंतर कायदेशीर अडचणी वेंकीच्या शेवटच्या इच्छेचा आड येतात आणि तो त्याच्यापरीने त्या दूर करायचा अगदी प्राणांतिक प्रयत्न करतो.
एका असहाय पण खंबीर आईच्या मनाची खुप चांगली मांडणी आमिर खानच्या व्यक्तिरेखेने केली आहे. कदाचित मनाला असं मूर्त स्वरुपात दाखवण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा. शेवटी शेवटी इच्छामरणाच्या कायदेशीर परवानगी साठीची कोर्टातील धावपळ, सुनावणी, एरवी त्रासदायक वाटणाऱ्या 'मीडिया' चा केलेला रास्त उपयोग भाव खाऊन जातो. आता अगदीच भावनिक विषय असल्याने त्यातील विनोदांना सुद्धा कारुण्याची झालर आहे, जे कि मुख्यत्वे वेंकीच्याच तोंडी आहेत. मिथुन शर्मा यांचं संगीत प्रसंगानुरूप मनाला हेलावून सोडतं.
यामध्ये विशाल जेठावाच्या अभिनयाचं विशेष कौतुक - कारण त्याला पाहिलं कि आधी आठवतो मर्दानी २ (राणी मुखर्जी) सिनेमातील थंड रक्ताचा, धडकी भरवणारा खलनायक. त्याच निष्ठेने निभावलेली ही मरणासन्न, असहाय तरुणाची भूमिका नक्कीच भावस्पर्शी आहे.
हा चित्रपट का पहावा, एक रिऍलिटी चेक म्हणून पहावा. आपल्याजवळ जे आहे ते किती अमूल्य आहे याचा विसर पडू नये म्हणून पहावा. मृत्यू समोर असताना देखील न डगमगता, सारासार विचार करून, आहे त्या परिस्थितीत इतरांना कसे उपयोगी पडता येईल हा विचार करणाऱ्या वेंकीच्या अलौकिक मन:सामर्थ्याला अनुभवण्यासाठी पहावा. स्वतःच्याच विवंचनांमध्ये गुरफटून गेलेल्या प्रत्येकाने पहावा म्हणजे कदाचित दृष्टीकोन बदलून असलेल्या समस्यांचं ओझं कमी होऊ शकेल.
न्यायदेवतेच्या डोळ्यावर बांधलेल्या काळ्या पट्टीने कदाचित अनेकांचा श्वास गुदमरतो हे देखील असहायपणे मान्य करावे लागते.
या सिनेमावर अजून बरंच काही लिहिता येईल, पण ज्यांच्या आयुष्यात हे घडले आहे त्यांना, चित्रपटातील कलाकारांनी केलेल्या अभिनयाला व चित्रपटातील अभिप्रेत संदेशाला ते न्याय्य होणार नाही. त्यापेक्षा संपूर्ण कथा व इतर दिग्गज अभिनेत्यांचा छोट्या भूमिकेतील पण सशक्त अभिनय स्वतः पाहणे जास्त श्रेयस आहे, म्हणून लेख इथेच संपवतो.
शक्य असल्यास चित्रपट पाहून त्यावर प्रतिसाद लिहा.
धन्यवाद.
जाता जाता.. चित्रपट संपल्यावर लहानपणी शिकलेला, डोळे पाणवणारा एक वृत्त आठवला.
मातीत ते पसरले, अति रम्य पंख
केले वरी उदर, पांडुर निष्कलंक
चंचू तशीच उघडी, पद लांबवीले
निष्प्राण देह पडला, श्रमही निमाले
- ना. वा. टिळक
प्रतिक्रिया
10 Jun 2025 - 4:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रपटाची चांगली ओळख करुन दिली.आभार.
-दिलीप बिरुटे
10 Jun 2025 - 5:53 pm | स्वधर्म
धन्यवाद.
11 Jun 2025 - 12:41 pm | चौथा कोनाडा
अ ति श य सुंदर चित्रपट ओळख ... बघणयादीत लिहुन ठेवला आहे. नक्की बघणार !
असाच एक वैद्यकिय पार्श्वभुमीवरचा चित्रपट "स्काय इज पिंक" हा सत्यकथे वर आधारित सुनेमा पहिला होता ... आवडला होता !