जे न देखे रवी...
कवितेच्या गणिताची कविता + - x ÷
कविता-रतीचे | विभ्रम अनंत
तयांचे गणित | कैसे करू?
तरीही करितो | वेडे हे धाडस
माझ्या अक्षरांस | हासू नये :)
~~~~~~~~~~~
कधी बेरीज बेचैनीची
कधी वास्तव वजावटीस
कधी गुणाकार गहनाचा
कधी भागे कवी शून्यास
कवितेचे गणित कसे हे
उत्तर ना त्याचे कळते
ओळींच्या मधली जागा
गणिताला डिवचून जाते
(π)वाट
स्पर्शरेषा जोखते जणु
वर्तुळाची वक्रता
परीघ अंशी / व्यास छेदी
(π) उरवी तत्त्वता
वर्तुळाचे केन्द्र जीवा #
ना कधीही स्पर्शिते
केंद्र गिळता तीच जीवा
व्यास बनुनी राहते
(π) द्विगुणित होऊनी
परिघास जेव्हा भागतो
हाती ये त्रिज्या-जिला
व्यासार्ध कुणी संबोधितो
होडी
वाण्याचे सांगतो कुळ,
विकतो देहू गावी गुळ
नांदुरकीच्या झाडाखाली
बेतुक्या शोधतो मुळ
स्वर टाळ चिपळ्यांचा
विरून हवेत गेला
छेडून विणेच्या तारा
बेतुक्या थकून गेला
भोवती गर्द पाचोळा
काही हिरवा काही पिवळा
काही वार्याने उडून गेला
काही तीथेच निजला
उंदीर
घरात पडला उंदीर मरूनी
थकलो सगळे शोध घेऊनी
चंद्रावर गेला मानव तरीही
उंदीर शोधण्या गॅजेटच नाही...
स्ट्रिंग थिअरीचा पाया
(FunU)वादी लेखनाची
होता उर्मी अनावर
ब्रह्मलीन असूनही
प्रकटू का मिपावर?
बादरायणी संबंध
येतील का माझ्या कामी?
(एन्ट्रॉपीचे ॐकाराशी
करू कलम कसे मी?)
"जानव्याचा दोरा हाच
स्ट्रिंग थिअरीचा पाया"
हीच थीम ठेवूनिया
लेख घ्यावा का पाडाया?
कृतांतकटकामलध्वज जरा जरी पातली...(#)
केस पांढरे तरी हा
डाय लावतो हिरवा
पाखरांनो सावधान
घुमे टेचात पारवा
केस पांढरे तरी हा
डाय गुलाबी लावतो
पाखरांनो उडलात
तरी पिसे हा मोजतो
केस पांढरे तरी हा
काळा कलप लावतो
पाखरांनो सावध हा
दाणे दुरून टाकतो
केस पांढरे तरी हा
अंतर्यामी अतरंगी
पाखरांनो नका भिऊ
निर्विष याची हो नांगी
असं कुठं लिहिलंय?
मागे वळून बघू नये,
म्हातार्याने चळू नये,
आठवणीत जळू नये,
असं कुठं लिहिलंय?
अवचिता परिमळू नये,
शरदी मेघांनी पळू नये,
अवकाळी झरू नये,
असं कुठं लिहिलंय?
पाउली पैंजणांचा मला भार आहे
पाउली पैंजणांचा
मला भार आहे..
रात्रीस चांदण्यांचा
अबोल दाह आहे..
शेजावरी स्वप्नकळ्यांचा
मूक शृंगार आहे
कुंकवाचा चंद्रमा
त्यालाही डाग आहे...
नजरेत भावनांचा
भरला बाजार आहे..
आरसा मनाचा
त्यालाही भेग आहे..
अंतरात श्वासांचा
खोल वार आहे..
सावल्यांच्या मिठीत
माझा संसार आहे...
बखरीच्या पानाआड
बखरीच्या पानाआड
पाहिले मी क्षणभर
दडपल्या वास्तवाचे
छिन्नभिन्न कलेवर
प्रचलित इतिहास
तुझ्या माझ्या मेंदूतून
अज्ञाताच्या शक्यतांना
टाके पुरता पुसून
जेत्यांचाच इतिहास
रुळे मग माझ्या मुखी
पराजितांचा ठरतो
इतिहास अनोळखी
बखरीच्या पानाआड
वास्तवाचा भग्न गड
त्याच्या झाकल्या गूढाचे
कसे सरावे गारूड?
सहा कोवळे पाय
नादमय सरसर
कोवळ्याशा वाटेवर
कोवळ्या सहा पायांची
चाल होई भरभर
एकामागे दुजा चाले
पुढचे न पाहताना
पुढच्याचे ध्यान नाही
पुढे पुढे चालताना
कधीतरी भांबावून
पुढचा जागी थिजतो
हरवल्या मागच्याला
चार दिशांत शोधतो
मागलाही नकळत
गेलेला पुढे जरासा
थबकून तोही टाके
पुढच्यासाठी उसासा
नक्षत्रांचे देणे होते
नक्षत्रांचे देणे होते
द्यायचे राहिले
जगण्याच्या वाटेवर
काटेच भेटले
नक्षत्रांनी अव्हेरून
उल्का पाठविली
काट्यांशीच केली मैत्री
फुले त्यांची झाली
एकेका फुलाचे रंग
आठवत होतो
निर्माल्य फुलांचे झाले
-बेसावध होतो
निर्माल्य होताना फुले
नि:शब्द म्हणाली,
"खत होणे हेच थोर
भाग्य आम्हा भाळी
गुरूंना वंदना
आकाशातले चंद्र तारे, हे जगाचे गुरु सारे
जमिनीवरचे पाणी वारे, हे जगाचे गुरु सारे ||
उंच पर्वत, खोल दरी
हळू जोरात वाहणारी नदी
हे म्हणती, मानवा शिका रे
जितके श्रम तिथेच यश सारे ||
पक्षी, प्राणी, वृक्ष आणि कीटक
ते शिकवती, आयुष्य बिकट
चिकाटीने पुढती जाता
होते सगळे सरळ सुलभ ||
आषाढी एकादश
आषाढी एकादश,
भक्त कासावीस,
विठ्ठलाची आस,
दर्शनाची ||
उचंबले मन,
हरपले भान,
लागलेच ध्यान,
पांडुरंग ||
वैजयंती सुगंध
तुटे भाव बंध,
वैष्णव ते धुंद,
नाचण्यात ||
टाळ मृदुंग धून,
विठ्ठला चे गुण,
भजन आतून,
कीर्तनात ||
नाचे वारकरी,
तुळशी हार करी,
भवतारु पारकरी,
कृपावंता ||
पार
जनुकांचा जिना सोसे
प्रसवाच्या कळा
श्रवणाच्या पार उभा
अनाहत निळा
प्रतिबिंब जाऊ पाहे
बिंबाच्याही पार
उडोनिया पारा उरे
काच आरपार
पिंपळाच्या पारापाशी
खोरणात दिवा
लावण्यास कोण येते
घोर लागे जीवा
नक्षत्रांच्या पार जाई
मिथकांचा पैस
सृजनाच्या कल्लोळात
सावरून बैस
गेले द्यायचे राहून.....
गेले द्यायचे राहून.....,
म्हणत आयुष्य Mute केलं
प्रारब्ध, नशीब म्हणत .....
कण्हत,कण्हतआयुष्य Cute केलं
जगण्याची मजा काय विचारता?
स्वतःच्या मनाला mute करून,
दुसऱ्यांच्या अपेक्षांना like करत जगतोय...
Wi-Fi शिवाय चालणाऱ्या मोबाईलवर
Google करून बघतोय!
पाच सागर
निळ्या जळाच्या पृथ्वीवरती
सागर ते पाच
जमीन आपली करू लागते
मधोमध नाच
भारतभूमीचे पद धुणारा
हिंदी तो सागर
दक्षिणेला जाऊन भेटतो
दक्षिण सागरास
दोन खंडांच्या मध्येच रुळतो
अटलांटिक सागर
सगळ्या खंडांना मिळून उरतो
प्रशांत महासागर
फाया
"कृबु (*)व्यापित या जगी अता तुज स्थान काय उरते ?
मनात येता क्षणार्धात मग इच्छित अवतरते !
काव्य, नाट्य, शिल्पे, चित्रे अन् जटिल अधिक काही
गरज तुझी यासाठी कशाला? कृबुच सर्व देई !"
कठोर शब्दे मानवी प्रतिभा दुःखमग्न झाली
नवक्षितिजांना ओलांडुन कृबु पार पुढे गेली
हताश होत्साती प्रतिभा क्षण-भर निष्प्रभ झाली
पुन्हा सावरून मनात काही जुळवून मग वदली,
यंदाचा पाऊस .
पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय .
इकडे तिकडे पळता पळता मध्येच . . , आंगणात थबकतोय !
बराच चिखल मग बरेच उन्ह
मग मधेच रिपरिप , टाकते नाहवून
निसरडा कधी , गच्च ओला
क्षणात रस्ता भिजवतोय !
पाऊस यंदा खरच माझ्या ,मनासारखा पडतोय . ॥ १ ॥
गच्चीत कधी तोच एकटा , मी मोठा तो धाकटा ,
तरिही अंगावर आणवून काटा
मोठ्या भावासारखा घाबरतोय !
चक्र
कवीने वाचावे
वाचले साचावे
वाचले, साचले
साचले, सुचले
आतल्या आचेच्या
प्रखर धगीत
प्रज्ञेच्या मुशीत
शब्दांच्या साच्यात
अल्लाद ओतून
पाचही प्राणांची
पाखर घालून
उत्फुल्ल, उत्कट
प्रतिभा शिंपून
वाटून टाकावे
पुन्हा एकदा
कागद कोरा ~
सृजन चक्राचा
नवीन फेरा
- 1 of 468
- next ›