शिणवतो मजला छंद मनाचा
काही सुचेना काम रे,
हरि वाजवी वाजवी ....
वेणू वाजवी वाजवी..
मन रिझवी रिझवी ..
माझे रे....॥
कशी सोडवू जीवास माझ्या
झाली मजला बाधा,
कधी रुक्मिणी कधी भामिनी
मध्यरात्री मी राधा
हरवून गेले मीच मला मी
दे आता आधार रे ॥
हरि वाजवी वाजवी ....।ध्रु।
धडधड होते उरात माझ्या
अंगी भासे कणकण
अशी भुलावण,कशी लागली
विसरून गेले मंथन
या तीरावर कशी हरवले
विसरून गेले मी पण
हरि वाजवी वाजवी ....।ध्रु।
प्रतिक्रिया
2 Jun 2025 - 2:23 pm | गवि
वाह. तगमग आणि धडधड अगदी पोचते आहे.. सुंदर रचना. खूप काळाने तुमचे नाव बोर्डावर बघून अत्यानंद झाला.
2 Jun 2025 - 2:54 pm | कपिलमुनी
सुन्दर !
चाल कशी ?
2 Jun 2025 - 7:55 pm | मिसळपाव
रामदासकाका, तुमचं लेखन काही वर्ष झाली, वाचायला मिळत नाहीये. त्यामुळे आमचीपण अवस्था अशीच काहीशी झालेली आहे!! आशा करतो की तुम्ही पुन्हा लिहीते व्हाल. तुमच्या लेखनामुळे दोन घटका सुखाच्या जातात. असो. आय होप की ठीक आहात, खुशाल आहात.
-------------------------------------------------------------
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.