उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती.
एकामागोमाग शाळेच्या बसेस आल्या,चौकात येवून थांबल्या. मुले आई-वडील पांगले. आपापल्या मुलांना बस मधे बसवले. सुचना थांबत नव्हत्या. बस भरली. ड्रायव्हरने निर्विकार पणे बस मार्गस्थ केली. आई-वडील आपापल्या घोळक्यात सामील झाले. कुणी घराकडे तर कुणी जाॅगर ट्रॅक कडे वळाले.
तारेवर "दयाळ",(ओरिऐंटल मॅगपेई), एवढावेळ सर्व निरीक्षण करत गाणे गात होता त्याने सुद्धा आकाशात झेप घेतली.
शाळेचा पहिला दिवस....
सुंदर सुंदर ललना
त्यांची सुंदर सुंदर बाळे
पाठीवरती ओझे आणी
खोडकर त्यांचे चाळे
चौकात एकच कल्ला
जणू बाजार इथे भरला
उत्साह, उर्जेचा झरा बघून
तारेवर दयाळ गाऊ लागला
एका मागून एक थांबली(बस)
भराभर बाळे पांगू लागली
जणू मधमाशीचे पोळे फुटले
आवाजाने आसमंत भारले
आसमंतातले गीत थांबले
दयाळाने झेप घेतली
आपल्या मार्गे मार्गस्थ झाला
आई बाबानी निश्वास सोडला
पोस्टा मधली जणू छाटणी
कुणी बिशप कुणी संस्कृती
कुणी डि पी एस कुणी इंद्रधनू
बाळे,नाविन्यासाठी सज्ज झाली.
प्रतिक्रिया
11 Jun 2025 - 3:34 am | चामुंडराय
आणि अशा रीतीने शिक्षणाचा "श्रीगणेशा" झाला.
13 Jun 2025 - 2:17 pm | चौथा कोनाडा
व्वा ...छान !
चित्रदर्शी रचना !