असं कुठं लिहिलंय?
मागे वळून बघू नये,
म्हातार्याने चळू नये,
आठवणीत जळू नये,
असं कुठं लिहिलंय?
अवचिता परिमळू नये,
शरदी मेघांनी पळू नये,
अवकाळी झरू नये,
असं कुठं लिहिलंय?
कातरवेळी झुरू नये,
कांचनसंध्यी उमलू नये,
गजरा भाळी माळू नये,
असं कुठं लिहिलंय?
एकांताशी बोलू नये,
भरल्या डोळी डोलू नये,
ओल्या शब्दीं भिजू नये,
असं कुठं लिहिलंय?