नको वाटतो ना? असा पावसाळा!
भिजा चिंब आधी,पुन्हा जीव जाळा
नको वाटतो ना? असा पावसाळा!
भिजा चिंब आधी,पुन्हा जीव जाळा
नको वाटतो ना? असा पावसाळा!
पावसाची सर जशी बरसून गेली
वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!
गुणगुणत होतीस का तू गझल माझी?
एक कोकीळा इथे गावून गेली!
गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे
थेंबास ओघळाया हलकेच गाल दे!
नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती
क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे!
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही
हात घे हातात आधी,आरसा नाही!
टाळता आलाच तर,टाळू जरा तोटा
फायदा नात्यात आता फारसा नाही!
एवढा केला खुबीने खूनही माझा
वारही केला असा जो वारसा नाही!
सांगतो आहे जगाला कोण हा वेडा!
मी असा नाही असा नाही असा नाही!
कैफियत माझी जरा ऐकून तर घे ना
एवढीही या मनाला लालसा नाही!
तू ठरव...आहे कसा मी,मी कसा नाही...
—सत्यजित
हसण्या उसंत नाही
रडण्यास अंत नाही.
निळे सावळे जगणे
मजला पसंत नाही.
बहरली जरी झाडे
हा तो वसंत नाही.
दिले टाकुन जरी तू
मी नाशवंत नाही.
सांगुन थकलो मी, पण
दुनिया ज्वलंत नाही.
-कौस्तुभ
शुद्धसती मात्रावृत्त
पाऊस सांजवेळी, डोळ्यांत दाटलेला,
वाराच काळजाच्या, ओघात साठलेला.
पाळीव हस्तकांनी, मागून वार केले,
त्यांच्या मनातलाही, विश्वास बाटलेला.
माझे खरे प्रबंधी, माझेच प्राण झाले,
त्यांचाच फार वेळा, आधार वाटलेला.
प्रारब्ध ग्रासलेले, कोऱ्याच सावल्यांनी,
रंगांध भावनांचा, हा खेळ थाटलेला.
आभाळ रुक्ष झाले, शोकात चंद्रवेली,
झाडांत खोल गेला, अंधार फाटलेला.
-कौस्तुभ
वृत्त -आनंदकंद
कुठे होते नशा आता पिल्यावर भांग स्वप्नांची
किती पेलायची ओझी शिरी अथांग स्वप्नांची
क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली
रात्रभर संपली नाही पुढे ती रांग स्वप्नांची
किती हा घाम गाळावा किती हे रक्त आटवावे
इथे भरतात का पोटे कधी तू सांग स्वप्नांची
गावची वेसही साधी कधी ना लांघली ज्याने
कशी पोहचे नभाच्या पार त्याची ढांग स्वप्नांची
किती ओसाडला तो पार जेथे तोडले नाते
हसूनी त्याच वृक्षावर शवे मग टांग स्वप्नांची
भरवश्यावर कुणी मारू नये पोकळ बढाया
बसता लाथ बघ जाहलीच पांगापांग स्वप्नांची
इतके अलगद उच्चारावे नाव तुझे ओठाने
एकाच शब्दामध्ये सामावून गावे अवघे गाणे
काना होऊन वीज रहावी खडीच भूमीवरती
मात्र्याने मग नभासमोर खोटेच द्यावे बहाणे
अनुस्वाराचे टपोर मोती अंगठित सजवावे
रेखीव कोरावीत तयास्तव अर्धचंद्र कोंदने
पाय मोडल्या अक्षरांनी मारावी तिरकी गिरकी
ऊकाराने रुणझुणावे पायात बनून पैंजणे
नदी वळवावी कडेकडेने रफार वेलांटीच्या
विसर्ग घेऊन पुरी सजावी उर्वरित व्यंजने
हरेक वळण, गाठ नि कोन मनामध्ये ठसावा
नाव उमटता सुटून जावे जिंदगीचे उखाणे
-- विशाल
खरी वाटते, पूरी वाटते, जवळ असून ती दूरी वाटते
भितो तुला मी, नको मजवरी ऐशी रागावूस प्रिये
क्षणभर समशेरीसम मजला तुझ्या हातची सूरी वाटते
हरेक सुंदरी समोर असता, हीच फक्त माझ्यासाठी पण
हवेत विरते, कणी न उरते, जातच ही कर्पूरी वाटते
सारे लिहिले, तारे लिहिले, शेवट ना परी मनासारखा
तुझे नाव टाळतो म्हणूनच गोष्ट जरा अधुरी वाटते
तू असताना सुचे न काही, आठवांनी पण भरे वही
काय करू मी? हाय! तुझ्याहून याद तुझी कस्तुरी वाटते
सखे आज तू मला तुझे नि गगनाचे या नाते सांग
कशी तुझ्यासोबत असताना , सांज अजून सिंदूरी वाटते
पाळते तू टाळतो मी ही जगाची रीत का
जी बनवणाऱ्यास होता भेटला प्रेषित का
काय त्या सांजेस त्याचे शब्द होते संपले
अर्धवटसे वाटते आहे मला हे गीत का
भंगले याच्यात काही खंगले याच्यात काही
दंगले होते जयात ही ती अघोरी प्रीत का
नाक डोळे ओठ कुंतल वर्णिले गेले किती
नाद नाही हो जयाविन कान दुर्लक्षित का
घाव सोसून देव होतो वेदनेतून हो सृजन
अन दुःखी होताच मन जन्म घे संगीत का
खोडले तव नाव आणि वाचली कविता पुन्हा
तीच कविता भासते आहे अशी विपरीत का
बंदी झाली बंदी गेली वाढली किंमत जरा
जे खिशाला परवडेना ते म्हणू जनहित का