~ गंध धुंद ~
कोणे एके काळी विमानतळावर ड्युटी फ्री शॉप दिसलं की दारू गोळा करणे ही एक “ड्युटी” मानून, मी ती अगदी निष्ठेनं पार पाडत असे. नाकासमोर चालण्याचा स्वभाव, नाकाला इतर कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू न देता नेमक्या दुकानात घेऊन जाई. हव्या त्या बाटल्या मिळाल्या की त्या ड्युटी मधून एकदाचं फ्री झाल्यासारखं वाटायचं. जरा वेळापूर्वी मुक्त असलेले दोनही कर, करमुक्त दुकानातून घेतलेल्या जड बाटल्या सावरण्यात गुंतले की इतर जाणिवा मुक्त होत ज्यात सर्वत्र दरवळणाऱ्या सुगंधाचीही एक असे.