टीप : या कलाक्रुतीतील (डोंबल!) सर्व घटना आणि पात्रे वास्तव असली, तरी मिपाच्या कोणत्याही सभासदांचा त्यांच्याशी काहीही संबंध नसण्याची दाट शक्यता आहे. या लेखनाच्या वाचनानंतर कोणतीही जिवंत व्यक्ती म्रुत झाल्यास, तो निव्वळ योगायोग (किंवा त्याचा भोग!) समजावा.
--------
डिस्कव्हरी, अनिमल प्लॅनेट, इत्यादी इत्यादी वाहिन्यांवरून अनेकविध माहितीपर कार्यक्रम, उपक्रम चालू असतात म्हणे दिवसरात्र. मी कधी फिरकलो नाही तिकडे. परवा सहज सकाळी टीव्ही लावला आणि जो चॅनेल लागला होता, तो पाहून एकदम सर्दच झालो. कुणीतरी भगवी कफनी, गळ्यात मोठमोठ्या मण्यांची माळ घातलेला, पांढरे केस भुतासारखे मोकळे सोडलेला एक बाबा बेंबीच्या देठापासून ओरडून काहीतरी सांगत होता. आधी मला वाटलं, कुठला तरी न्यूज चॅनेलच की काय! कारण प्रसंगानुरूप वेशभूषा करायचं फॅड तिकडे सध्या असल्यामुळे त्यातही काही अवघड नव्हतं. पण हे प्रकरण वेगळंच होतं, ते जरा नीट बघितल्यावर कळलं.
तुमच्या घराला, ऑफिसला, आयुष्याला कुणाची तरी द्रुष्ट लागलेय, त्यातून कसं वाचायचं, यावरचे मौलिक विचार तो मांडत होता. कुणीतरी तुमच्या घराची तारीफ करतं, तुमच्या मुलाचं कौतुक करतं आणि तेव्हापासूनच दुर्दैवाचा फेरा सुरू होतो हे त्याला सांगायचं होतं. जनहितार्थ दाखविल्या जात असलेल्या या कार्यक्रमातलं `स्वहित' थोड्याच वेळात उघड झालं. कुठला तरी ताईत गळ्यात घातला आणि लॉकेट गाडीत, घरात, ऑफिसात टांगून ठेवलं, की ही सगळी संकटं, दुर्दैवाच फेरा बिरा दूर होतो, असं त्याच्या बोलण्यावरून कळलं. या लॉकेटच्या सेटचे किंमत होती, फक्त अडीच हजार की काय तरी!
सगळ्यात महत्त्वाचा आणि नवी द्रुष्टी देणारा भाग होता, त्या जाहिरातीतल्या स्पेशल इफेक्टचा. एक बाई घरात येते, बाळाला उचलून घेते आणि त्याचं कोडकौतुक करते. तिच्या डोळ्यातून अचानक पांढरे किरण बाहेर येतात आणि बाळ एकदम रडायलाच लागतं.
गंमत म्हणजे, जाहिरातीच्या पुढच्या भागात, घरात लॉकेट अडकवल्यावर, हे किरण परत त्याच्या डोळ्यात जातात, असं दाखवलं होतं. कमाल आहे की नाही?
मला तर थेट रामानंद सागरांच्या (गेले बिचारे!) रामायणाचीच आठवण झाली. त्यात नाही का, एकमेकापासून पंधरा-वीस फुटांवर उभे असलेले राम-रावण एकमेकांवर बाण सोडतानाही आधी तो आकाशात मारायचे. मग तिथे काहीतरी वर्तुळं नाहीतर चांदण्या निर्माण होउन एक बाण नाहीसा व्हायचा. मग त्या रामाच्या नाहीतर रावणाच्या चेहर्यावर एकता कपूरच्या सीरियलमधल्या कलाकारांच्या चेहर्यावर धक्का बसल्यानंतर येतात, तसले भाव.
हे भारीच ना?
माझ्या आजोळी परसातल्या एका फणसाला येणारे-जाणारे लोक द्रुष्ट लावतात म्हणे. त्यामुळे तो फणस पिकायच्या आधीच काळा पडतो. असलं एक लॉकेट घेऊन देतो आता मामाला. म्हणजे तिकडे गेल्यावर `स्पेशल एफेक्ट'चा खेळ तरी बघायल मिळेल घरबसल्या!
प्रतिक्रिया
23 Jan 2009 - 3:14 am | रामपुरी
एक फणस नाडीवाल्यांकडे पाठवा. तो काळा का पडतो हे लगेच कळेल. (फक्त तो कुठे लावला आहे, केव्हा लावला, कुठल्या जातीचा आहे, वगैरे किरकोळ माहीती पुरवावी लागेल. मग ते तीच माहिती तुम्हाला कॅसेटवर रेकॉर्ड करून देतील)
23 Jan 2009 - 11:25 am | मर्जी चे मालक
क्षण भर डोळ्यासमोर "अलिफ लैला" ही मालिका उभी राहीली... 8}
त्यामधे सुद्धा असेच काहीतरी आचरटपणा केलेला असायचा...
बाकी एक शंका - असे प्रोग्राम चालु असताना "अंधश्रद्धा निर्मुलन समिती" वाले कुठे लपलेले असतात...?
23 Jan 2009 - 5:39 pm | आपला अभिजित
मध्ये माझा सर्वात आवडता अभिनेता म्हणजे विलास राज. तो `क्रुष्ण'मध्ये कंसही होता. कसला बेंबीच्या देठापासून ओरडायचा तो! आणि त्याच्या प्रतिक्रिया पण जबरा असायच्या!!
23 Jan 2009 - 5:43 pm | लिखाळ
असे ताईत किंवा त्याचे फोटो संकेतस्थळांच्या मुखपृष्ठावर लावायची सोय आहे का?
(उगीच मनात प्रश्न आला हो ! :) )
-- लिखाळ.
23 Jan 2009 - 6:23 pm | आपला अभिजित
तात्यांना सुचवले पाहिजे.
पण ते `तंत्र-मंत्र' करणार्यांना मी फाट्यावर मारतो. : - (मुडद्यांना पुरून उरलेला) तात्या' अशी प्रतिक्रिया देतील.
बघा बुवा!!
23 Jan 2009 - 10:49 pm | प्राजु
आठवली ती अलिफ लैला...
अशाच एका कसल्याशा यंत्राबद्दल पाहिले होते मी टिव्ही वर.. काहीही फेकत असतात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Jan 2009 - 3:35 pm | रेझर रेमॉन
भूत-प्रेत, करणी, सन्तानसुख यावर बंगाली इल्म...
जालिम इलाज.. चोबीस घण्टों में फल नही मिल तो
पैसा वापस, गॅरन्टी के साथ..
-रेझर
26 Jan 2009 - 4:30 pm | आचरट कार्टा
काय सांगणार आता?
अहो तिथे "नुस्ता उरा-पोटाला हजारो रुपड्यांचा पट्टा गुंडाळा, आणि निवांत बसा तंगड्या ताणून... सुटलेलं पोट आठवड्यात निम्म्यावर आणू !" असल्याही जाहिराती असतातच की! ही सुद्धा अंधश्रद्धाच म्हणायला हवी! :D
-----------------------------------------------------
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !