मराठी गझल

नाद मेघांचाच दर्जेदार होता...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 12:47 am

नाद मेघांचाच दर्जेदार होता
पावसाचा जोर फुसका बार होता!

ओल आहे काळजाच्या खोल रुतली
स्पर्श त्याचा केवढा उबदार होता!

रात्र होती चंद्र होता गार वारा
चांदण्याचा कवडसा अंगार होता!

सावल्याही हाय मज सोडून गेल्या
की उन्हाचा रंग काळाशार होता??

सापडेना खंजिराची खूण कोठे
काळजावर काजळाचा वार होता!

ओळखावे तू मला ही आस नव्हती
हा तसा माझा नवा अवतार होता!

का प्रवासाला निघाला एकटा?तो...
सूर्य होता वा कुणी अंधार होता?

फार थोडे मित्र दिसले आॅनलाइन
आज बहुधा वाटते रविवार होता!

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

दाही दिशांस जेंव्हा...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
9 Apr 2017 - 10:54 pm

दाही दिशांस जेंव्हा,अंधार दाटला होता
भरपूर,काजव्यांचा आधार वाटला होता!

पृथ्वी कधीतरी तर थांबेल वाटले होते
माझ्यासवे दिशांनी संसार थाटला होता!

ही कंपने अशी का गाण्यात सुरमयी आली?
हुंकार वेदनांचा कंठात दाटला होता!

अमृत म्हणून प्यालो एकेक दवाचा बिंदू
मग्रूर पावसाचा मग ऊर फाटला होता!

लाटेवरुन एका नुकताच स्वार झालो अन्
एका क्षणात अवघा दर्याच आटला होता!

मिळवून दाद गेले,सत्कार जाहले त्यांचे
माझाच शेर ज्यांनी तूर्तास लाटला होता!

मज मायना जरा हा,उशिराच उमगला होता
पत्रामधून माझा पत्ताच काटला होता!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलगझल

त्या सुऱ्याची चालही लयदार आहे!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
9 Apr 2017 - 4:01 pm

साचला का एवढा अंधार आहे?
काजव्यांचा तेवढा आधार आहे!

जागल्या होत्या मशाली काल येथे
आज इथला सूर्यही बेजार आहे!

एकही ठिणगी कशी येथे पडेना?
कोण इथला आंधळा सरदार आहे?

फुंकतो आहे कधीचा सूर्य मीही
श्वास माझाही जरा उबदार आहे!

सारखा हिंदोळतो हा प्राण माझा
त्या सुऱ्याची चालही लयदार अाहे!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलगझल

रिक्त प्याल्याच्या तळाशी...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
5 Apr 2017 - 11:20 pm

ओततो पेल्यात जेंव्हा,दुःख मी फेसाळते
विरघळाया लागतो मी,वेदना साकाळते!

ओल राहू दे जराशी आतवर कोठेतरी
कोरडी पडली जखम की,खोलवर भेगाळते!

तू नको येऊ पुन्हा बागेमधे भेटायला
पाहिल्यावरती तुला हर पाकळी ओशाळते!

तू निघुन गेलीस तेंव्हा फक्त इतके वाटले
चंद्र नसताना नभाशी..रात्रही डागाळते!

केवढी असते तुफानी,आठवांची सर तुझ्या
वाट चुकल्या गल्बताला,हर दिशा धुंडाळते!

नीट बघ,दिसतो तुला का?रिक्त हा पेला तुझा
रिक्त प्याल्याच्या तळाशी,पोकळी आभाळते!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
5 Apr 2017 - 3:38 pm

मग्रूर काजव्यांचा संचार होत आहे
पणती जपून ठेवा अंधार होत आहे!

वाटेत सावल्यांचे थांबे नकोत मजला
माझ्याच सावलीचा मज भार होत आहे!

झाली नवीन ओळख,माझी मला अशी की
ऐन्यासमोर चिमणी बेजार होत आहे!

सुरवंट वेदनेचा कोषांत वाढताना
फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे!

हे कोणत्या ऋतूचे नादावलेत पैंजण?
एकेक पाकळीचा गुलजार होत आहे!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

बोललो नाही कधी पण...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
29 Mar 2017 - 12:50 pm

शब्द,शपथा,भाव,कविता..बेअसर झाले
बोललो नाही कधी पण दुःख तर झाले!

चेहऱ्यावरची न रेषा एकही ढळली
वार काही काळजाच्या खोलवर झाले!

लागला धक्का असा अन् सांडला पेला...
पान दुष्काळी कथेचे ओलसर झाले!

या इथे,खेळायची ती सूर-पारंब्या
हेच अंगण..आज त्याचे माजघर झाले!

तू दिलेली डायरी अन् पीसही जपले
डायरी आकाश माझे..पीस पर झाले!

व्हायचे असतेच ते होवून जाते पण
नेमके कळले कुठे जे आजवर झाले?

—सत्यजित

मराठी गझलकवितागझल

'नाते' म्हणून आहे!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
28 Mar 2017 - 6:41 am

तुटली सतार पण मी गाते म्हणून आहे
या मैफलीत मीही,'नाते' म्हणून आहे!

निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या
नाते अता खरेतर 'खाते' म्हणून आहे!

जेवण,चुडा नि साड्या,देतोच ना मला तो
खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे!

गजरा गुलाब अत्तर,निर्गंध होत गेले
शृंगारही अताशा,'न्हाते' म्हणून आहे!

स्मरते नि छिन्न करते,एकेक गीत त्याचे
या काळजात फिरते पाते म्हणून आहे!

या लेखणीस कितिदा,तोडून पाहते पण
माझ्यासवेच तीही,'जाते' म्हणून आहे!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

तो खुला बाजार होता!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
23 Mar 2017 - 3:27 pm

चोरटा व्यापार कसला?तो खुला बाजार होता
वासना अन् भूक यांचा..रोजचा व्यवहार होता!

चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकलेल्या
सांधले काही कवडसे..फाकला अंधार होता!

मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती
पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता!

देह विझलेले जगाची वासना जाळीत होते
चालला रस्त्याकडेने भोंगळा यल्गार होता!

हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती...
हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकरुणकवितागझल

पात्रामध्ये नदीच्या प्रेते सडूनी गेली ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
22 Mar 2017 - 10:33 am

आज आमच्या कवितेच्या ग्रुपवर स्वाम्याच्या (स्वामी संकेतानंद) मस्करीला उत्तर देताना एक मित्र कौतुक शिरोडकर याने हां शेर लिहीला होता.

माझ्या खरेपणाची देऊ कशी मी ग्वाही
मसणातल्या मढ्यानो बोलाल का हो काही ?

******************************************************

त्यातल्या प्रश्नाचा संदर्भ घेवून सुचलेल्या काही ओळी !

रस्त्यास त्या बिचाऱ्या सांगाल का हो काही ?
पथभ्रष्ट भास्कराला शिकवाल का हो काही ?

सगळे खरेच आहे खोटे न येथे कोणी,
रचल्या चितेस सांगा बोलाल का हो काही ?

मराठी गझलगझल

पेटुनी आरक्त संध्या...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
22 Mar 2017 - 5:00 am

पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे...
केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे!

मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे...
वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे!

काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे...
सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे!

एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी...
त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे!

मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही...
आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!

सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी...
मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे!

—सत्यजित

gajhalgazalकविता माझीमराठी गझलकवितागझल