दाही दिशांस जेंव्हा,अंधार दाटला होता
भरपूर,काजव्यांचा आधार वाटला होता!
पृथ्वी कधीतरी तर थांबेल वाटले होते
माझ्यासवे दिशांनी संसार थाटला होता!
ही कंपने अशी का गाण्यात सुरमयी आली?
हुंकार वेदनांचा कंठात दाटला होता!
अमृत म्हणून प्यालो एकेक दवाचा बिंदू
मग्रूर पावसाचा मग ऊर फाटला होता!
लाटेवरुन एका नुकताच स्वार झालो अन्
एका क्षणात अवघा दर्याच आटला होता!
मिळवून दाद गेले,सत्कार जाहले त्यांचे
माझाच शेर ज्यांनी तूर्तास लाटला होता!
मज मायना जरा हा,उशिराच उमगला होता
पत्रामधून माझा पत्ताच काटला होता!
—सत्यजित
प्रतिक्रिया
13 Apr 2017 - 11:56 am | माहितगार
सुरेख
13 Apr 2017 - 12:03 pm | अनुप ढेरे
छान!
13 Apr 2017 - 4:12 pm | पैसा
सुरेख!
14 Apr 2017 - 12:57 am | सत्यजित...
सर्वांचे धन्यवाद!