ओततो पेल्यात जेंव्हा,दुःख मी फेसाळते
विरघळाया लागतो मी,वेदना साकाळते!
ओल राहू दे जराशी आतवर कोठेतरी
कोरडी पडली जखम की,खोलवर भेगाळते!
तू नको येऊ पुन्हा बागेमधे भेटायला
पाहिल्यावरती तुला हर पाकळी ओशाळते!
तू निघुन गेलीस तेंव्हा फक्त इतके वाटले
चंद्र नसताना नभाशी..रात्रही डागाळते!
केवढी असते तुफानी,आठवांची सर तुझ्या
वाट चुकल्या गल्बताला,हर दिशा धुंडाळते!
नीट बघ,दिसतो तुला का?रिक्त हा पेला तुझा
रिक्त प्याल्याच्या तळाशी,पोकळी आभाळते!
—सत्यजित
प्रतिक्रिया
6 Apr 2017 - 10:21 am | अत्रुप्त आत्मा
व्वाह! सुंदर..
6 Apr 2017 - 12:13 pm | खेडूत
मस्तच!
6 Apr 2017 - 2:23 pm | शार्दुल_हातोळकर
फक्त शेवटच्या ओळीतील "पोकळी आभाळते" हे थोडेसे खटकले. बाकी शेर उत्तम.
6 Apr 2017 - 3:13 pm | सत्यजित...
>>>फक्त शेवटच्या ओळीतील "पोकळी आभाळते" हे थोडेसे खटकले.>>> उलट तोच खरा गझलेचा शेर,आणि त्यातही ते दोन शब्द सार आहेत गझलेचे! असो!
6 Apr 2017 - 6:44 pm | शार्दुल_हातोळकर
पण "आभाळते" म्हणजे नक्की काय?
मराठीमधे हा शब्द पहिल्यांदाच पाहिला!
हा शब्द तुम्ही स्वतः योजला आहे का?
आणि त्याचा तुम्हाला अभिप्रेत अर्थ काय आहे?
7 Apr 2017 - 2:37 am | सत्यजित...
सदर शब्द माझ्या वाचनात अनेकवेळा आलेला आहे!
बहुतेक भट साहेबांच्या गझलेतही मी हा शब्द वाचलेला आहे!व्यापणे,व्यापून उरणे या अर्थी,तर कधी शब्दशः आभाळच होवून जाणे,अश्या अर्थाने वापरलेला दिसतो!
आभाळली/आभाळल्या/आभाळता/आभाळताना ई. शब्द गुगळले तरी सहज हा शब्द वापरल्याची उदाहरणे मिळतील!
मला कुणाचातरी एक सुंदर मतला आठवतो वाचलेला...
'का झेप पाखराची सांडी मुजोर वारा
आभाळल्या जिवाचा पंखात कोंडमारा!'
मी या आधीही हा शब्द वापरलेला आहे,येणेप्रमाणे...
'आहेत जीवघेणे काही सुरे परंतू
त्यांच्या उरात माझ्या गंधाळल्यात जखमा!
होईल चांदणे का माझे भल्या दुपारी?
वाटे जरा भरोसा,आभाळल्यात जखमा!
6 Apr 2017 - 3:14 pm | सत्यजित...
धन्यवाद अत्रुप्त आत्मा,खेडूत
6 Apr 2017 - 3:18 pm | प्रसाद गोडबोले
सुंदर कच्चा माल !
एकदम तांबीय बिडंबन पाडता येईल अशी
बघ उद्या होईल नक्की रिक्त हा कोठा तुझा
रिक्त प्याल्याच्या तळाशी, कच्ची ताडी हासते !
=))))
6 Apr 2017 - 4:25 pm | सत्यजित...
माफ करा,पण हे 'तांबीय बिडंबन' म्हणजे?
विडंबन म्हणत असाल तर स्वागत! त्यातही गझलेचे विडंबन गझलेत,किंवा फार तर हझलेतच झाले तर अजून मजा येईल वाचायला!
बाकी विडंबन ही अद्भूतच कला आहे!कुणाच्या पेल्यात काय?कुणाच्या पेल्यात काय!!अनुभव ज्यचा-त्याचा!
शुभेच्छा!
7 Apr 2017 - 12:05 am | संदीप-लेले
व्वा, लिखते रहो !
7 Apr 2017 - 2:41 am | सत्यजित...
>>>लिखते रहो !>>>जरुर! और अाप भी!