सणासुदीची सफाई
"नास्तिकांनी खायला कोंडा,
उशाला धोंडाचं गाणं!"
कितीही म्हटलं, तरी
आपल्या देशाची पक्की जमीन
धर्माच्या खाटेचीच सोय!
पंथाच्या गादीची उब,
सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप —
आपलेसेपणा देणारी ही सोय
बहुतेकांना हवीच असते, नाही का?
सणांच्या आधी, माळ्यावरची
समृद्ध अडगळ खाली उतरते,
तेव्हा माळ्याचीही सफाई होते.
तसंच काहीसं —
मऊ मुलायम गादीसुद्धा,
खूप दिवसांनी कडक होते.
मग ती कारखान्यात जाऊन
सासुफ-करून, पुन्हा
मुलायम होते, स्वच्छ होते,
दिवाळी अंकांनी वैचारीक
कल्हई दिल्या सारखी.