मुक्त कविता

मी आणि तू (प्रणय कविता)

OBAMA80's picture
OBAMA80 in जे न देखे रवी...
27 Oct 2024 - 1:39 pm

रेखीव भृकुटी तुझ्या ललाटी
मी चंद्रकोर सुबक नेटकी
वसतो तुझ्या मृगनयनी
मी गोड आनंदाश्रू मिलनी
रसरशीत तुज गोड ओठात
मी ऐन मोरपिशी यौवनात
रेशमी तुझ्या धुंद श्वासात
मी जन्मतो नव्याने सतत
शिंपूनी लाली तुझ्या गाली
मी विणतो तारूण्य मलमली
मन माझे तुझ्या पावली
जसा नाद नाजूक पैंजणी
गुंफूनी गजरा तव कुंतलात
मी रंगवितो बेधुंद रात
गुंतूनी तुझ्या मादक यौवनी
मी चेतवतो प्रणय अनादी
पोर्णिमेचा चन्द्र मी आणि
शुक्राची तू ग चांदणी

कविता माझीप्रेम कवितामाझी कवितामुक्त कविताशृंगारप्रेमकाव्य

भास-आभास

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जे न देखे रवी...
24 Oct 2024 - 7:03 pm

तू आहेस ?? की हा तुझा भास आहे ??
वार्‍याच्या झुळकेमागोमाग आपसुक
येणारा मोगऱ्याचा धुंद सुवास ??
छे ! हा तर तुझाचं गंध खास आहे....

वही उघडता तुझा चेहरा दिसू लागतो
मी ही मग तुला आवडल्या असत्या,
अशाचं कविता उलगडू लागतो, तेव्हाही,
तू पानभर ओसंडून नुसती दरवळत असतेस…

काळ्याभोर आकाशात चंद्राकडे पाहताना
ढगांच्या आडून तुचं डोकावताना दिसतेस,
दुर पार क्षितिजाच्या पल्याड, पहाट-पालवी
उगवेपर्यंत माझ्याबरोबरीने जागी राहतेस...

मुक्त कवितामुक्तक

परतीचा पाऊस...

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जे न देखे रवी...
3 Oct 2024 - 5:26 pm

थोडासा चिडलेला.... अंमळ रुसलेला..

परतीचा पाऊस...

विजांच्या मागून जोरदार गरजला
बरसून दमल्यावर रस्त्यात भेटला
सवयीप्रमाणे थोडावेळ दाटला
मग जाताना कानात पुटपुटला...

कागदाच्या होड्या सोडताना
आताशा भेटत नाहीस ?
पन्हाळीखाली चिंब भिजताना
मुळी दिसतचं नाहीस ?

अनवाणी पायांनी वाहत्या
पागोळ्यांमागे धावत ही नाहीस
की ओंजळीत विरघळणाऱ्या
बर्फ़ाळ गारा वेचित नाहीस

इतका मोठा झालास की पावलांना
गुंजभर चिखल ही लागु देत नाहीस
इतका थोर झालास की कपड्यांवर
थेंबभर ओलसुद्धा सहन करीत नाहीस..

मुक्त कवितामुक्तक

पाऊस-कविता झाली पाडून

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Jul 2024 - 12:51 pm

पाऊस-कविता झाली पाडून
विठुलाही वेठिस धरिले
जशी मागणी तसा पुरवठा
ब्रीदवाक्य कवि-झोळीतले

जरा स्वस्थ बैसेन तोवरी
दिन येईल स्वातंत्र्याचा
हस्तिदंती मम मनोऱ्यातुनी
शब्द तिरंगी लिहिण्याचा

दुरून मग खुणवेल दिवाळी
शब्दांची आतषबाजी-
-करण्यासाठी सज्ज होऊनी
लावीन "प्रतिभेची(?)" बाजी

"स्वांत:सुखाय लिहितो बिहितो"
धूळफेक जरि करितो मी
शब्दांच्या पलिकडे वसे ते
सांग कधी का पाहीन मी? :)

कविता माझीकाहीच्या काही कवितामुक्त कवितामुक्तकमौजमजा

आठवती..

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
18 Jul 2024 - 9:38 am

आठवती ओले पायठसे
मृद्गंध भारली सांज
नभी मेघमृदंगा साथ करी
रिमझिमती पाऊसझांज

नभ तोलून धरल्या क्षितिजाला
झगमगत दुभंगे वीज
ढग पापण्यात दडण्याआधी
अनिमिष जागतसे नीज

सृजनाची हिरवी हाक जरी
भवतालातून दुमदुमते
ओथंबून येता नभ अवघे
अवचितसे दाटून येते

मुक्त कवितामुक्तक

सद्दीत सुमारांच्या ह्या

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
18 Jun 2024 - 8:59 pm

जटिलाच्या दारावरती
दुर्बोध देतसे थाप
भेटीत उमजले दोघा,
"उभयतांस एकच शाप

सद्दीत सुमारांच्या ह्या
उ:शाप नसे शापाला
अस्वस्थ उद्याची हाक
ऐकू ना येई कुणाला"

दुर्बोध जटिलसे हसले
दुर्बोधून जटिलही गेले
अन् विषण्ण होऊनी दोघे
आश्रयी कवीच्या गेले :)

अनर्थशास्त्रमुक्त कवितामौजमजा

अरण्यऋषीचं वनोपनिषद

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जे न देखे रवी...
15 Jun 2024 - 12:54 pm

'जंगलाचं देणं' जणु 'चकवाचांदणं'
'केशराचा पाऊस' ओते 'शब्दांचं धन'
'नवेगावबांधचे दिवस' जशी फुटे 'चैत्रपालवी'
'निळावंती' उलगडे तशी 'मृगपक्षीशास्त्रा'ची पोथी
'पक्षी जाय दिगंतरा' झाडांच्या कवेतून
'घरट्यापलीकडे' उभा 'रातवा' पाऊसथेंब पिऊन
'आनंददायी बगळे' करविती 'निसर्गवाचन'
'सुवर्णगरुड' झेपावे 'चित्रग्रीवां''च्या गर्दीतुन
'पक्षीकोश' उलगडतो 'पाखरमाये'ची गणितं
'मत्स्यकोशा'च्या जोडीने सुटे 'वृक्षायुर्वेदा'चं कोडं
'जंगलाची दुनिया' ही सारी 'रानवाटां'ची कहाणी
अरण्यऋषीच्या साहित्यसोबतीने फळासं पावली...

#चक्कर_बंडा

मुक्त कवितामुक्तक

मनोरथाच्या वाटेवर जरी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 Jun 2024 - 3:30 pm

भू-कवचा विंधून धरेच्या
गाभ्याशी जाईन
शून्य गुरुत्वाकर्षण तिथले
अधांतरी मोजेन

निंबोणीचे रोप कोवळे
चन्द्रावर रुजवीन
अंगाईचे शब्द बदलूनी
पुन्हा लिहून काढीन

जर्द तांबडी मंगळमाती
शनीवरी शिंपीन
शनि-मंगळ मग युती अनोखी
एकवार पाहीन

राहू-केतुची जोडगोळी मग
समक्ष बघण्यासाठी
चंद्रसूर्य कक्षांच्या अलगद
सोडवीन निरगाठी

सात अश्व सूर्याचे - त्यांना
थोपटीन प्रेमाने
त्यांचा दाणा , पाणी , खरारा
करीन मी निगुतीने

अविश्वसनीयमुक्त कवितामुक्तकमौजमजा

नवी ईमारतीतील अडगळ निवारण

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
19 Mar 2024 - 7:40 am

दोन प्राध्यापक
बांधकाम व्यावसायिकाच्या
कार्यालयात.

पहिल्या प्राध्यापकाने
दुसर्‍या प्राध्यापकास
कानात कुजबुजत विचारले

नव्या ईमारतीच्या अवारातील
जुने वड, पिंपळ, पारीजात, .......
समृद्धतेचे प्रतिक की अडगळ?
दुसरा प्राध्यापक उत्तरला
अर्थात अडगळ!

Nisargअहिराणीकालगंगाखिलजी उवाचगुलमोहर मोहरतो तेव्हाघे भरारीचाहूलजिलबीझाडीबोलीतहानदुसरी बाजूदृष्टीकोननिसर्गप्रेम कविताफ्री स्टाइलमराठीचे श्लोकमुक्त कवितारतीबाच्या कविताशेंगोळेषंढ सरकारचा ( कुठलेही असो ) निषेधसांत्वनासोन्या म्हणेस्वप्नहिरवाईअद्भुतरसप्रेमकाव्यमुक्तकसाहित्यिकसमाजडावी बाजूराहणीभूगोलशिक्षण

ज्योत

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 Feb 2024 - 3:01 pm

रिकाम-टेकडी मोठी तिच्या माथ्यावर
माझा वायफळमळा-त्याच्या बांधावर
मृगजळ साठवितो रोज थोडे थोडे
पिऊनी ते दौडतात कल्पनांचे घोडे
एकशृंगी घोडे त्यांचे पसरूनी पंख
उडतात - टाळण्यास समीक्षकी डंख

कल्पिताचे वास्तवाशी जुळवी जो नाते
ज्योत त्याची विझण्याच्या आधी मोठी होते

मुक्त कवितामुक्तक