आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळेंना म्हणाली
मराठी साहित्य संमेलनाला
नाही गेलात कसे ते?
वाङळें आङळेंना म्हणाला
तुमच्या आङळीकेचे साहित्याने
अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला
जागा आता उरलीच कुठे ?
आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळेंना म्हणाली
मराठी साहित्य संमेलनाला
नाही गेलात कसे ते?
वाङळें आङळेंना म्हणाला
तुमच्या आङळीकेचे साहित्याने
अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला
जागा आता उरलीच कुठे ?
अथांगाचा तळठाव
अज्ञेयाचा पैलतीर
विराटाची पराकाष्ठा
सूक्ष्मातील शून्याभास
खुणावती ऐसे सारे
क्षणोक्षणी अविरत
जरी जटिल तरीही
जीवा लावतात ध्यास
नादावतो या ध्यासाने
ठेचाळतो जागोजाग
असे खडतर तरी
भूल घाली हा प्रवास
आकाशाच्या रिक्तपणाच्या असतील काही कथा
सूर्याच्या जळण्यापाठी असतील त्याच्या व्यथा
नको शोधूस गुढ वाऱ्यावरच्या सुगंधाचे
त्यांच्या कणाकणात मिळतील समर्पणाच्या गाथा.
मीही एक वारकरी
माय मराठी पंढरी,
नतमस्तक होवू तेथे
जेथे कवींची पायरी.
करु रिंगण सोहळा
खेळ शब्दांचा मांडून,
शब्दसृष्टीच्या ईश्वरा
तेथे करुया नमन.
दिव्य सारे अलंकार
सजवू आपल्या देवाला,
नाचवू दिंड्या पताका
गुंफू शब्दांची तुलसीमाला.
आपल्या इवल्या पावलांनी
चालू मोठ्यांची पायवाट,
शब्दसृष्टीचे मायबाप
होवो सदा कृपावंत,
हजारो वर्षांचा सोहळा
रंगतो भाषेचा हा मेळा,
चालो समृद्धीच्या वाटे
लाभो स्वर्गाच्या कळा.
एकट्याने एकट्याशी बोलले पाहिजे
शब्दांनीही भाव वेडे तोलले पाहिजे.
कोण वेडे आहे ऐकण्या पुन्हा पुन्हा
आपुलकीचे रोप येथे रोवले पाहिजे.
दु:खा मध्ये रमून जाणे रोजचेच आहे
आनंदाचे झाड मनात वाढले पाहिजे.
स्वत: साठी जग जगते त्यात काय मोठे
दुसऱ्यासाठी कधीतरी जगले पाहिजे.
आपले आपले करता हात रिक्त होती
दुसऱ्याच्या आनंदाने मोहरले पाहिजे.
आनंदाने जगताना जपले ही पाहिजे
जपण्यासाठी कधी दूर झाले पाहिजे.
कोणे एके काळी
व्हॅलेंटाईन दिनी
मोठ्या उत्सुकतेने
मी आणली होती साडी
होती जरी साधी
ती खुश मात्र झाली
प्रयत्न केला खूप तिने
पण नीट नेसता नाही आली
गोंधळली क्षणभर हसली
ती म्हणे हे ध्यान माझ्या भाळी
पण गोड आठवण प्रेमाची
तिने अजूनही जपून ठेवली
आता एवढ्या वर्षांनी
सुचतील कशा प्रेम ओळी
पण मला पाहायची असते
तिच्या गालावरील सुंदर खळी
त्यासाठी कविता विनोदी
ऐकून म्हणे अजून नाही जमली
मला वाटलं कविता
तिला म्हणायचं होतं साडी
(सौं साठी!)
सापशिडीच्या डावात
माझ्या घडते आक्रीत
शिड्या गिळतात साप
आणि टाकतात कात
बुद्धिबळाच्या डावात
माझ्या घडते आक्रीत
राजा पांढरा, तयाची
काळ्या रंगावर प्रीत
घडे आक्रीत तसेच
माझ्या जगण्यात रोज
वास्तवाच्या कोलाहली
कानी अद्भुताची गाज
कारण काढून भेटायाचे
किती दुरूनी आलेला तू!
लपवलेस तू मनातले तरी
किती बाभरा झालेला तू!
कळले मजला...
विचारसी तू देऊन हाती चित्रे काही
सापडते का यांच्यामधले लपले अक्षर?
इतके बोलून सहज उभा तू माझ्यामागे
आणि इथे मी चूर लाजुनी शोधीत उत्तर
कळले तुजला?
मधुभासांचे रिंगण पडले सभोवताली
गोंधळले मी तुझा गंध का होते अत्तर?
केसांवरती तव श्वासांची मोहक फुंकर
क्षणाक्षणाला वितळत होते मधले अंतर
कळले तुजला??
वृक्ष जसा -
अंकुरण्या आधी
बीजस्वरूपी
अस्फुट असतो
बाण जसा-
सुटण्याच्या आधी
प्रत्यंचेवर
सज्ज राहतो
मंत्र जसा -
स्फुरण्याच्या आधी
बीजाक्षरी
निद्रिस्त राहतो
अर्थ तसा
उलगडण्या आधी
शब्दांच्या
निबिडात राहतो
ओथंबून मग
येतो अवचित
कोसळतो अन्
चिंब भिजवितो
म्हातार्याचे भिरभिर डोळे-
आठवणींचा भुगा भुगा
छटाक उरले खोड, पोखरी
कभिन्न काळाचा भुंगा
म्हातार्याचे वखवख डोळे-
लवथव गोलाई बघती
दारु संपला जसा फटाका
दावू न शकतो स्फोटभिती
म्हातार्याचे टपटप डोळे-
पापणीत पाऊसमेघ
जसा वळीव कोसळतो कधिही
तसा कढांचा आवेग
म्हातार्याचे विझुविझू डोळे-
पैलतिरी काऊ बघती
कोकुनी हाकारितो अहर्निश
उडून जा त्याला म्हणती