तू.....
तू समोरून अलवार चालत यायचीस
मी उगाचंच रानफुलं वेचत रेंगाळायचो
पैंजणांची रुणझुण पुढे निघून जायची
मागे खच पडायचा पाऊलभर स्वप्नांचा
तू पावसात आडोसा पाहून थांबायचीस
मी मुद्दामचं भिजत पुढे निघून जायचो
काकणांची किणकिण कानाआड व्हायची
मागे ढीग पडायचा सकवार निःश्वासांचा
तू जराही वळून न पाहता निघून जायचीस
मी नुसताच थिजून पाहत राहायचो शून्यात
डोळ्यांच्या कडांवर मळभ दाटून यायचे
मागे सडा पडायचा ओंजळभर आसवांचा