मुक्त कविता

तुझे गाणे

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
12 Dec 2021 - 11:51 am

मी पाऊस झालो सखे
तू माती होशील का?
स्पर्शाने माझ्या अलगद
तू सुगंध होशील ना?

मी दरीत येऊन पडलो
तू वारा होशील का?
शीर्षासन करून मग मी
जग पायाखाली घेईल ना.

तू रात्र अबोली हो ना
मी चंद्र सखा तुज भेटेल.
तू पहाट होशील तेव्हा
मी तुझ्याच कुशीत झोपेन.

सुख बिंदू झेलायला
तू गवताचे पाते हो ना.
आयुष्याच्या धक्क्यांना मग
मी अलगद सोशीत जाईल.

जरी विस्कटली घडी जीवनाची
तू अशीच हसरी राहशील?
मी वचनाने मज बांधून घेतो
हे गाणे तुझ्याच साठी गाईल.

प्रेम कवितामाझी कवितामुक्त कविताकविताप्रेमकाव्य

ऐसे ऐकिले आकाशी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
11 Dec 2021 - 11:06 pm

(१) ग्रहकक्षांच्या कातीव रेषा
वितान अवकाशाचे व्यापून-
अचूकतेची लय सांभाळीत-
परस्परांशी अंतर राखून-
कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो,
फिराल तुम्ही अथकपणाने
विश्वांताचा क्षण आला तरी
अमुच्या आभासी पण तरिही
अभेद्य ऐशा बेड्या घालून?"

(२) पिठूर केशरी चंद्रधगीने
स्फटिकतळ्यातील मासोळीला
म्हटले बिलगून जललहरीतून,
"झगमगणारे लोलक दाहक
त्वचेवरून देशील का काढून?
मावळतीवर जेव्हा तारे-
भल्या पहाटे फिक्कट होतील-
तेव्हा त्यांना तेज त्यातले
थोडे थोडे देईन वाटून"

मुक्त कविताकविता

B.1.1.529

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
29 Nov 2021 - 9:10 pm

मश्गूल मानवा
थेट डिवचून
हताश करून
पुरे मास्कवून
ज्ञानविज्ञानाला
कुंठित करून
जुन्या गृहितांना
निष्प्रभ करून
चाकोर्‍या आडाखे
मोडून तोडून
कल्पने पल्याड
पायंडे पाडून
वाटले गेला तो
कायम निघून...

गनिमी काव्याने
माघार घेऊन,
अस्पष्ट, दुरून,
कोण हे बोलते?
"पुन्हा मी येईन"
"पुन्हा मी येईन"

मुक्त कवितामुक्तक

किनखापी आभाळाने

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
13 Nov 2021 - 4:30 pm

किनखापी आभाळाने
लपविले निळे नक्षत्र

मृगजळात बुडून गेले
काळाचे घटिकापात्र

थोपवल्या आवेगांच्या
डोहात दफनली रात्र

रिक्तता नसे ज्या ठावी
ते फुटले अक्षयपात्र

जागवूनी पिशाच्च शमतो
का कधी अघोरी मंत्र ?

मुक्त कविताकविता

गाथा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 Nov 2021 - 12:10 pm

तुकारामाच्या गाथेने
जेव्हा पछाडले मला
तेव्हा ज्ञानोबा नावाचा
एक मांत्रिक शोधला

भ्रम रिंगण तोडून
ज्ञानोबाने केली शर्थ
कानामध्ये सांगितला
गहनाचा गूढ अर्थ

त्याची बहीण मुक्ताई
सार्‍या मांत्रिकांची माय
सूर्य गिळण्या ही मुंगी
नभ उल्लंघून जाय

"गाथा बुडवून टाक"
मला मुक्ताई दटावे
गाथा तरंगून येते
अंतर्यामी तिला ठावे

गाथा रक्तात भिनते
गाथा वज्रलेप होते
शब्द रोकडे बोलत
पुन्हा पुन्हा पछाडते

मुक्त कविताकविता

वाडा

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जे न देखे रवी...
25 Oct 2021 - 1:38 am

जुनाट वाडा, उजाड मंदीर, पडकी कौले ,पडक्या भिंती
शिसवी तुळया वाळवीसही सांगत असतील गतश्रीमंती ||

इथे जाहल्या कित्येक मुंजी कित्येक लग्ने किती सोहळे
वाड्यानेही मनसोक्त भोगीले सुखदु:खांचे हे हिंदोळे ||

कित्येक घरटी इथेच वसली, इथेच फुलली, इथे बहरली
कित्येक पाखरांचीही किलबिल ह्या वाड्याने इथे पाहिली ||

सारी पाखरे मोठ्ठी झाली बघता बघता उडो लागली
संवत्सरफल ऐकत ऐकत कित्येक वर्षे सरोनी गेली ||

फुटलेले नवपंख घेती मग गरुड भरारी हिरव्यादेशी
एकाकीपण उमगत जाई रोज नव्याने नवीन दिवशी ||

मुक्त कवितासमाज

आभाळाच्या फळ्यावर

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
20 Oct 2021 - 3:49 pm

धूमकेतूच्या खडूने
आभाळाच्या फळ्यावर
काहीबाही लिहीण्याची
होता ऊर्मी अनावर

चांदण्यांच्या ठिणग्यांची
घेतो मदत जराशी
चित्रलिपी सजविण्या
लिहीतो मी जी आकाशी

रात्र होते जशी दाट
तशा काही अनवट
मिथ्यकथा नक्षत्रांच्या
उजळती नवी वाट

झळाळते तेजोमेघ
गूढ कृष्णविवरांशी
बोलताना, जोडतो मी
नाळ आकाशगंगेशी

भेट विराटाशी थेट
माझ्या नक्षत्रभाषेची
रोमरोमातून तिच्या
रुणझुण ये सूक्ष्माची

लागे उगवतीपाशी
जेव्हा उषेची चाहूल
माझ्या नक्षत्रभाषेची
फिकटते चंद्रभूल

मुक्त कविताअद्भुतरसकविता

हाच क्षण

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
8 Oct 2021 - 4:48 pm

चाल चाल चालत गेलास
वणवण भटकून थकून गेलास
हाच क्षण मोलाचा
रोवून पाय
थांबायचा

दार दार ठोठवत गेलास
उंबरा उंबरा झिजवत राह्यलास
हाच क्षण मोलाचा
तोडून दार
घुसायचा

वाच वाच वाचत गेलास
वाचून वाचून साचत गेलास
हाच क्षण मोलाचा
फोडून बांध
लिहायचा

मुक्त कवितामुक्तक

शब्दांची कर्णफुले

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
24 Sep 2021 - 9:18 am

शब्दांची कर्णफुले

प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी
प्रेम बरसले अवचीत अवकाळी
नाहत्या ओलेत्या भोर केशांतून
थेंब तयाचे अवतरले भाळी

ओठी शब्द फुलून आले
शब्दांचे मग मोती झाले
तु ते हळूवार उचलूनी घेत
कर्णफुलांसम कानी ल्याले

इशाराकविता माझीजिलबीप्रेम कवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितालावणीवाङ्मयशेतीवाङ्मयकविताप्रेमकाव्य

धत् तेरे की...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
13 Sep 2021 - 11:26 am

तसं म्हटलं तर त्यांची ती होती खरीखुरी डेट
पण तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..

सुट्टीचा दिवस होता,
Backdrop ला पाऊस होता.
Romantic होतं weather,
एकांताची हलकी चादर.
ती म्हणाली, खरंच येऊ? तो म्हणाला, yes plz, I'll wait....
पण... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..

gholकैच्याकैकविताजिलबीमुक्त कवितामुक्तक