धूमकेतूच्या खडूने
आभाळाच्या फळ्यावर
काहीबाही लिहीण्याची
होता ऊर्मी अनावर
चांदण्यांच्या ठिणग्यांची
घेतो मदत जराशी
चित्रलिपी सजविण्या
लिहीतो मी जी आकाशी
रात्र होते जशी दाट
तशा काही अनवट
मिथ्यकथा नक्षत्रांच्या
उजळती नवी वाट
झळाळते तेजोमेघ
गूढ कृष्णविवरांशी
बोलताना, जोडतो मी
नाळ आकाशगंगेशी
भेट विराटाशी थेट
माझ्या नक्षत्रभाषेची
रोमरोमातून तिच्या
रुणझुण ये सूक्ष्माची
लागे उगवतीपाशी
जेव्हा उषेची चाहूल
माझ्या नक्षत्रभाषेची
फिकटते चंद्रभूल