मराठी भाषा गौरव दिन अभंग
मीही एक वारकरी
माय मराठी पंढरी,
नतमस्तक होवू तेथे
जेथे कवींची पायरी.
करु रिंगण सोहळा
खेळ शब्दांचा मांडून,
शब्दसृष्टीच्या ईश्वरा
तेथे करुया नमन.
दिव्य सारे अलंकार
सजवू आपल्या देवाला,
नाचवू दिंड्या पताका
गुंफू शब्दांची तुलसीमाला.
आपल्या इवल्या पावलांनी
चालू मोठ्यांची पायवाट,
शब्दसृष्टीचे मायबाप
होवो सदा कृपावंत,
हजारो वर्षांचा सोहळा
रंगतो भाषेचा हा मेळा,
चालो समृद्धीच्या वाटे
लाभो स्वर्गाच्या कळा.