वारी !!!
में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून, वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते. सगळ्यात पुढे मुख्य पुजारी घोड्यावर स्वार होऊन आणि त्यापाठोपाठ “डोलीचे” भोई भोलेनाथांना खांद्यावर घेऊन घाटातून झपझप चालू लागतात.