भाग १: इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना
भाग २: इतिहास्यास्पद (२) स्वातंत्र्यदिनाची तयारी
भाग ३: इतिहास्यास्पद (३) स्वातंत्र्यदिनाचा व्याप (की ताप?)
पुरेसे प्रतिनिधी मिळाल्यावर कार्यक्रमाच्या तयारीसाठी गांधीजींनी सगळ्या व्याख्यात्यांची 'गोलमेज' परिषद आयोजित केली. मात्र यमसभेत मेज नसल्यामुळे ती नुसतीच 'गोल' परिषद झाली. त्यातून ‘परिषद’ ह्या शब्दाचा ज्या पक्षाशी संबंध असतो त्या पक्षाशी गांधीजींचा संबंध नसल्यामुळे त्यातून त्यांना मिळाला तो फक्त ‘गोल’! गांधीजींचा ‘ओन गोल’... खरं तर एक नाही, अनेक ओन गोल्स!
गांधीजींनी पहिला प्रस्ताव मांडला,
“आपल्याला स्वातंत्र्य या विषयावर भाषणं करायची आहेत. त्यामुळे प्रथम आपण स्वातंत्र्य म्हणजे काय हे सर्वांना समजेल असं ठरवूया.”
“स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य!” महाराजांनी (अर्थात शिवराय) बाणेदार उत्तर दिलं.
“अगदी बरोबर! ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, असं मीही म्हटलं होतं...” पलीकडून लोकमान्य टिळक म्हणाले. [अ]
“मान्य!” गांधीजी नक्की टिळकांनी हे विधान केलं होतं त्याला ते ‘मान्य’ म्हणाले होते की त्यांना ती व्याख्या खरोखर पटली होती हे न दर्शवता पुढे सरकले,
“मग स्वराज्य म्हणजे काय?”
“स्वराज्य म्हणजे शासन!” विनोबा भावे जरी आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हणाले असले तरी स्वराज्याची ही व्याख्या करतील असं कुणालाच वाटलं नव्हतं! [आ]
“काय म्हणता?” गांधीजी म्हणाले.
“शालेय पुस्तकांत म्हटलंय. ब्रिटिश राजवटीत स्थानिक शासनाला ‘स्थानिक स्वराज्य संस्था’ म्हणायचे, आता स्वराज्य मिळाल्यावर ‘स्थानिक शासन संस्था’ म्हटलं जातं. याचाच अर्थ, स्वराज्य करणं म्हणजे शासन करणं नाही का?” विनोबा उत्तरले. [इ]
“पण मग स्वराज्यातला ‘स्व’ कोण आणि ‘राज्य’ कोणाचं? की ‘स्व’म्हणजे आपण स्वत: फक्त म्हणून स्वत:लाच शासन करत बसायचं?” गांधीजी हसून म्हणाले.
“यातला ‘स्व’ हे दाखवतो की प्रत्येकाला हे स्वत:चं राज्य वाटायला हवं. होम रूल.” टिळक उत्तरले.
“म्हणजे लोकशाही?” गांधीजींनी पुढचा प्रश्न केला.
लोकशाही हा शब्द ऐकताच इतर राजांमध्ये चुळबुळ सुरू झाली. फक्त त्यांतला टिपू सुलतान म्हणाला,
“मी आणणार होतो लोकशाही - नेपोलियनसारखी.” [ई]
“जे परकीय नाहीत ते सगळे ‘स्वकीय’ – ‘स्व’ आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून मांडलेलं ‘राज्य’ ते स्वराज्य असं म्हटलं तर?” शिवाजी महाराजांनी प्रतिप्रश्न केला.
“पण परकीय कोण आणि स्वकीय कोण?”
“सोपं आहे. जे बाहेरून आलेत आणि ज्यांची गरज नाही ते परकीय [उ].” बाहेरच्या वर्तुळातून एक – बहुधा बाळासाहेब ठाकरे.
“बघा हं, थोडा विचार करा. आर्य भारतात इराणमधून आले. द्रविडही आफ्रिकेतून. [ऊ]”
“अहो! द्रविड मराठी, आफ्रिकेतला कुठला?” बहुधा ठाकरेच पुन:!
“मराठी?” गांधीजी बुचकळ्यात पडले.
“अहो, हे क्रिकेटमधल्या द्रविडांबद्दल बोलतायत.” लोकमान्यांनी खुलासा केला.
“अस्सं! पण स्वकीय कोण?” गांधीजींनी पुन: आपला प्रश्न केला.
“मी स्वकीय की परकीय?” बहादूर शाह जफरनं आता तोंड उघडलं.
“अर्थात स्वकीय!” महाराज पुन: म्हणाले, “स्वकीय नाहीत ते हे – महाराजा जसवंतसिंग आणि मिर्झा राजे जयसिंग.”
“योग्य बोललात!” महाराणा प्रताप महाराजांच्या शेजारीच उभे होते.
“पण मग हे बादशाह स्वकीय झाले तर त्यांचे आजे-पणजे सगळेच स्वकीय होतील!” पुन: मागच्या रांगेतून कुणीतरी (पुनश्च ठाकरे?) मुद्दा मांडला.
“आता मला सांगा – मराठ्यांच्या पटवर्धनांनी विनाश केलेल्या मंदिराला आणि मठाला मी देणगी दिली. शृंगेरीचे शंकराचार्य माझ्याकडे आले होते मदतीसाठी – मग मी स्वकीय की परकीय?” टिपू सुलतान पुन: म्हणाला. [ए]
“अहो, तुम्ही काय चांगलं आणि वाईट केलं त्याचा हिशोब चित्रगुप्त देतील. तुमची वेळ आली की होईल तुमचा निवाडा – स्वर्ग की नरक तो. इथे सांगू नका आपला निवडक चांगुलपणा.” ठाकऱ्यांनी शेवटी संधी साधली.
“मला वाटतं स्वकीय आणि स्वधर्म यांच्यात आपला घोटाळा होतोय.” इतका वेळ शांत असलेल्या राणा संगानं म्हटलं, “मला मारणारे...”
‘धर्म’ हा शब्द कानी येताच वर्मावर बोट ठेवल्यासारखे लोक चवताळले. किंबहुना ‘वर्म’ हा इंग्रजी शब्द म्हणून पकडला तर त्याचा अर्थ किडा होतो या विश्लेषणाप्रमाणे लोक वर्मावर बोट ठेवल्यावर किडा चावल्यासारखे ओरडायला लागतात हे आम्हांला अनुभवायला मिळालं! ‘बरोब्बर, हा धर्माचाच प्रश्न आहे!’, ‘नाही संस्कृतीचा आहे’, ‘हिंदुस्थान हिंदूंचा’, ‘म्हणूनच पाकिस्तान निर्माण झाला’, ‘मग सगळे का नाही गेलात तिथेच?’ ‘आम्हांला नको होता पाकिस्तान’, ‘सर्वधर्मसमभाव म्हणजे भारत’, ‘धर्मनिरपेक्षता’ वगैरे आरडाओरडा सुरू झाला.
“थांबा. थांबा. आपण ‘स्वातंत्र्य’ म्हणजे ‘स्वराज्य’ असं म्हणण्याऐवजी दुसरं काही तरी म्हणू शकतो का ते बघूया. म्हणजे त्यात स्वकीय / परकीय असा घोटाळा होणार नाही.” गांधीजी त्यांना शांत करायला लागले. पण कुणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हतं. मात्र तेवढ्यात -
“स्वातंत्र्याचा आणि धर्माचा काय संबंध? स्वातंत्र्य म्हणजे समाजवादी प्रजातंत्र,” असं म्हणत भगतसिंग पुढे आला.
गांधीजी काही बोलण्याआधीच –
“त्याला काय विचारता, नास्तिक होता तो!” अशी एक घोषणा झाली. [ऐ]
“खरं आहे, तुम्ही माझा ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ हा लेख वाचलाय का?” सावरकर रिंगणात उतरले आणि भगतसिंगाला म्हणाले, “देव-देव करणं, नवस करणं हे सगळं चुकीचं आहे हे इथे आल्यावरही सांगता येईल.”
“बापूजी, बघा कम्युनिस्ट आणि हिंदुत्ववाद्यांची युती!” तेवढ्यात नेहरू ओरडले मागून. मग पुन: आरडाओरडा सुरू झाला. ‘हिन्दी चिनी भाई भाई’ हा नारा तुम्हीच दिलात ना?’ इथपासून ‘तुमच्या लेकीनं घेतला होता पाठिंबा कम्युनिस्ट पक्षाचा ते चालतं वाटतं?’ पर्यंत टोमणे सुरू झाले.
तेवढ्यात, हे इतकं कमी झालं म्हणून की काय, त्यात भर घालायला जीना तिथे येऊन पोहोचले.
“आम्हीही ब्रिटिशांपासून स्वतंत्र होण्यासाठी चळवळीत सहभाग घेतला होता. एवढंच नाही तर ब्रिटन आणि हिंदुस्थान दोघांपासून आम्ही स्वातंत्र्य मिळवलं! त्यामुळे खरं स्वातंत्र्य म्हणजे काय ते आम्हांला विचारा.” असं म्हणून त्यांनी नवा पेच निर्माण केला.
गांधीजी काही बोलणार त्या आधीच –
“आणि बांग्लादेश तुमच्यापासून स्वतंत्र झाला ते कळलं असेलच तुम्हांला!” असं इंदिरा गांधी ओरडल्या मागून.
“आपण एकत्र सोहळा साजरा करू शकतो. मला वाटतं स्वातंत्र्य हे सर्वसमावेशक असतं.” गांधीजी म्हणाले [ओ]. मग त्यावर लोक पुन: सैरभैर झाले. ‘होय’, ‘नाही’, ‘नको’, ‘हा स्वैराचार आहे’, ‘नाही, हा वैराचार आहे’, ‘चूक, हा गैराचार आहे’ असा गदारोळ उठला.
यमसभेत ‘स्वातंत्र्य’ म्हणजे काय हे नक्की कुणाला माहिती नसलं तरी प्रत्येकाला विचारांचं स्वातंत्र्य मात्र ठाऊक असतं. त्याचा उपभोग ते घेत असतात. आता भीती नसते ना कसलीच.
‘स्वातंत्र्य’ म्हणजे काय हे ठरवायला जर इतका वेळ लागणार असेल तर प्रत्येकाची भाषणं तयार करून घ्यायला किती वेळ लागेल असा पेच आता गांधीजींना पडायला लागला. शिवाय या सगळ्या लोकांना मुद्देसूद, मध्ये व्यत्यय न येऊ देता, कसं बोलतं करता येईल, प्रत्यक्ष कार्यक्रमात असाच गोंधळ झाला तर काय परिस्थिती निर्माण होईल अशा अनेक विचारांनी त्यांना घेरलं.
आता मस्करीची कुस्करी होईल आणि कार्यक्रम होणार नाही या भीतीनं मी (हा मी कोण ते पुन: कधी तरी सांगेन) माझ्या साहेबांना बोलावून आणलं. यमदेव आणि चित्रगुप्त साहेब चक्रव्यूहाच्या केंद्रात येताच गर्दी पांगली. त्यांच्या फक्त नजरांवरून “आता शांतता झाली नाही तर इथे सगळ्यांच्या समोर एकेकाचा निवाडा करून नरकात पाठवेन!” हे एवढं सगळं लोकांच्या लक्षात आलं!
यमदेव आता गांधीजींकडे बघून हसले आणि म्हणाले,
“गांधीजी, अहो मी स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम करूया असं सुचवलं होतं. भाषणं करा असं कुठे म्हटलं होतं? तुम्ही स्वत: तरी गेला होतात का भाषण करायला १५ ऑगस्ट १९४७ च्या दिवशी दिल्लीत?”
“पण आता इतक्या सगळ्या लोकांना मी गोळा केलंय...” गांधीजी आपली अडचण सांगू लागले.
“हो, कार्यक्रम करा; पण जे त्यांनाच माहिती नाही ते त्यांना दुसऱ्यांना सांगायला नका लावू.”
“मोठी माणसं आहेत ही सगळी. त्यांना माहिती नाही असं कसं म्हणता येईल?”
“अहो मोठी होतीच ती त्यांच्या काळात. अजूनही त्यांनी केलेल्या अनेक गोष्टी आदर्श म्हणून उदाहरणादाखल घेता येतील. पण काळानुसार बदलणाऱ्या सगळ्याच व्याख्या त्यांना कशा वश होतील?”
“म्हणजे?”
आता चित्रगुप्त साहेब पुढे सरसावले.
“आजकाल डेटा प्रोटेक्शन आणि प्रायव्हसी फार जपायला लागते. दुसऱ्या कोणाचं उदाहरण देण्यापेक्षा तुमचंच देतो.”
“म्हणजे?”
“तुम्ही आफ्रिकन लोकांना ‘काफिर’ म्हटलं होतं, आणि दलितांना ‘हरिजन’. पहिल्या उल्लेखातला विरोधाभास तुमच्याच नंतर लक्षात आला. दुसऱ्यातला तुमच्यानंतर लोकांनी दाखवून दिला! काळ बदलला, व्याख्या बदलल्या!” [औ]
गांधीजी वरमले. समजून चुकले.
“मग?”
“सांस्कृतिक कार्यक्रम बसवा की त्यांचे. नाच-गाणी करा. खेळ करा.”
“हे मी केलं नाही हो कधी पूर्वी. अगदी व्ही. शांतारामांनी मला पत्र पाठवलं होतं ‘डॉक्टर कोटनीस की अमर कहानी’ बघा म्हणून. पण मी नाही म्हणालो होतो.”
“त्यात काय? ‘या मैफिलीसारखी दुसरी कुठे लाभणार आता?’ असं तुम्हीच म्हणाला होतात ना बहादूरशाह जफरना?”
“आलं लक्षात,” गांधीजी हसून म्हणाले.
(क्रमश:)
-कुमार जावडेकर
संदर्भ:
[अ] स्वराज्य हा माझा
[आ] आणीबाणी...
[इ] ‘इतिहास व नागरिक शास्त्र इयत्ता सहावी : प्रथमावृत्ती २०१६, पुनर्मुद्रण ऑक्टोबर २०२१ – महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. ‘शिक्षकांसाठी’ हे पान.
[ई] Jacobin Club of Mysore
[उ] Bal Thackeray and his controversial legacy - India Today
[ऊ] Where Indians Come From, Part 2: Dravidians and Aryans – The Diplomat
[ए] Tipu Sultan
[ऐ] Why I Am an Atheist
[ओ] CabinetMissionPlan - Gandhi offer of Jinnah PM-ship 1947
[औ] Analysing Gandhi’s controversial equation with Africans - The Hindu
प्रतिक्रिया
20 Aug 2025 - 12:49 am | कुमार जावडेकर
या काल्पनिक कथा आहेत, केवळ विनोदासाठी लिहिलेल्या. कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. दीर्घ खुलासा पहिल्या भागाखाली लिहिला आहे (त्याचा दुवा खाली देत आहे). काही चूक आढळल्यास कृपया क्षमस्व.
- कुमार
विनंती
20 Aug 2025 - 10:39 am | अमरेंद्र बाहुबली
हाही भाग आवडला!