दिव्यांची कहाणी
(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) )
ऐका दीपांनो तुमची कहाणी.
कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’
‘काय झाले?’
‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’