संध्याकाळी तू गंगेतीरी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
1 Sep 2019 - 12:14 pm

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....
मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर
लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर
सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात
घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस....
तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे
बघू देत लोकांना देवांना साधुंना
माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून
तिच्या देहात लयदार मिसळताना.....

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....
मला सांग ना तुलाही असेच वाटते ना
कुठूनतरी समुद्राने वाट काढावी
नाहीतर गंगेने पदर उलटा करावा
चार व्याकुळ डोळ्यांत प्रलय व्हावा...

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....
मला माहित आहे तुला माहित आहे
लाटांना माहित आहे हाक त्यांचीच तर आहे
धावणाऱ्या रक्ताला मी फुलांनी अडवले आहे
नशिबाची कविता तिच्या लयीत सोडली आहे ......
संध्याकाळी तू.....

शिवकन्या

कविता माझीकालगंगातहानप्रेम कविताभावकवितामनमेघमाझी कविताविराणीकरुणमांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

कुठूनतरी समुद्राने वाट काढावी नाहीतर गंगेने पदर उलटा करावा
विस्तारून सांगाल काय ?

शिव कन्या's picture

1 Sep 2019 - 8:09 pm | शिव कन्या

समुद्र आपली मर्यादा ओलांडून वाट शोधेल का? नाही.
गंगा कधी उलटी वाहील का? नाही.
पण तिला वाटते हे असे अघटीत काहीतरी घडावे, आणि त्याची भेट व्हावी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Sep 2019 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....
मला सांग ना तुलाही असेच वाटते ना
कुठूनतरी समुद्राने वाट काढावी
नाहीतर गंगेने पदर उलटा करावा
चार व्याकुळ डोळ्यांत प्रलय व्हावा...

खास. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

2 Sep 2019 - 5:34 pm | मदनबाण

छान...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रांजण गावाला, गावाला, महागणपती नांदला... :- Kartiki Barge | Unplugged |