मी आणि शाळेचे Reunion - (भाग १)
जिमला जायला सुरुवात करून एक महिना होऊन गेला होता. डोंबिवली उत्सव होऊन गेला होता. नूतन वर्षारंभ देखील झाला होता. वाढलेल्या थंडीने सकाळी लवकर उठून जिमला जायला कंटाळा येऊ नये म्हणून मी मुलांच्या आवाजातील "उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान, निबोधत… बाबा उठ… जिमला जायचंय ना तुला….उठा राष्ट्रवीर हो…. सुसज्ज व्हा उठा चला …" अशी वाक्ये फोनमध्ये रेकोर्ड करून त्यांचा अलार्म लावून ठेवला होता. रोज जिमला जात होतो. घाम गाळत होतो. आरशाकडे बघणे टाळत होतो. लिफ्ट सोडून जिने चढत उतरत होतो. बटन स्टार्ट असूनही बाईकला किक मारून चालू करीत होतो.