मी आणि शाळेचे Reunion - (भाग १)

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
6 Feb 2016 - 5:17 pm

जिमला जायला सुरुवात करून एक महिना होऊन गेला होता. डोंबिवली उत्सव होऊन गेला होता. नूतन वर्षारंभ देखील झाला होता. वाढलेल्या थंडीने सकाळी लवकर उठून जिमला जायला कंटाळा येऊ नये म्हणून मी मुलांच्या आवाजातील "उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान, निबोधत… बाबा उठ… जिमला जायचंय ना तुला….उठा राष्ट्रवीर हो…. सुसज्ज व्हा उठा चला …" अशी वाक्ये फोनमध्ये रेकोर्ड करून त्यांचा अलार्म लावून ठेवला होता. रोज जिमला जात होतो. घाम गाळत होतो. आरशाकडे बघणे टाळत होतो. लिफ्ट सोडून जिने चढत उतरत होतो. बटन स्टार्ट असूनही बाईकला किक मारून चालू करीत होतो. रात्री जेवल्यावर शतपावली म्हणून नाक्यावरच्या पानपट्टीवाल्यापर्यंत चालायला जाऊ लागलो होतो. मग पानपट्टीवाल्याने आग्रह केला म्हणून रोज रात्री पान खाणे चालू झाले. हिने विचारले तेंव्हा, गुलकंद घातलेले पान घशाला चांगले इतके बोलून मी तो विषय घाई घाईने संपवला.

बाहेरचे खाणे बंद केले होते. फारच इच्छा झाली तर घरी आणून खात होतो. एक दिवसआड पाणीपुरी खाण्याचे बंद करायचे ठरवले. तसे मी प्रजापती पाणीपुरी वाल्याला बोललोसुद्धा. त्याचे हात थरथरले. दोन पुऱ्या त्याच्या हातातंच फुटल्या. पाणीपुरी मी खात असतानादेखील त्याला ठसका बसला. "साब अभी पंधरा सालसे खा रहे हो… आप ऐसा बोलोगे तो मै किसकी तरफ देखनेका?" असे जेंव्हा तो म्हणाला तेंव्हा मला त्याच्या पाण्याने डबडबलेल्या डोळ्यात त्याची कच्ची बच्ची दिसू लागली. म्हणून मग केवळ त्याच्या त्या मला कधीही न भेटलेल्या बाळांच्यासाठी मी आठवड्याच्या शेवटी एकाच दिवशी तीन प्लेट पाणीपुरी खाणे चालू केले.

आधी भात सोडायचे ठरवले होते. तसे मी घरगुती ऋजुता दिवेकरला सांगितले देखील. त्यावर तिने काहीही प्रतिक्रिया न देता "बरं" इतकेच म्हटले. पान प्रकरणानंतर ती थोडी अबोल झाली होती. मी देखील जास्त काही न बोलता स्वयंपाकाच्या मावशीना भात कमी लावण्यास सांगितले. दिवसअखेरीस मला जाणवले की स्वतःची कुठली अशी खास चव नसलेला ह्या अन्नघटकाचे मला व्यसन लागले आहे. दारू, चरस, गांजा सोडताना लोकांना प्रचंड त्रास होतो हे ऐकून माहित होते. पण तसला अनुभव मलापण येईल याची कधी कल्पना देखील केली नव्हती. काही केल्या पोट भरल्यासारखे वाटेना. चार पोळ्या जास्त खाउन देखील पोट रिकामेच वाटू लागले. ही तर काहीच बोलत नव्हती. दोन दिवस पोटाचे हे रिकामपण सहन करून सगळे शेवटी असह्य झाले आणि मित्राला माझी व्यथा सांगितली तर तो म्हणाला अरे गरम भात जास्त जातो, म्हणून तू गरम भात खाणे सोड. त्याचे म्हणणे ऐकून मी दुपारचा उरलेला भात रात्री तर रात्रीचा उरलेला भात दुसऱ्या दिवशी दुपारी खायला सुरवात केली. माझी अवस्था बघून, हिच्या नकळत आईने स्वयंपाकाच्या मावशीना थोडा जास्तीचा भात लावायला सांगितले. एक दोन आठवडे हे छान चालले, पण मग माय लेकरांचे प्रेम हिच्या लक्षात आले. तिने काही बोलायच्या आधीच मी शरणागती पत्करली. शेवटी मी एक वेळचा भात सोडावा आणि दिवसातून फक्त दोन कप चहा प्यावा अश्या तहाच्या कलमावर माझी सुटका झाली. चीनला बरेच वर्षे राहून आलेले माझे एक जुने वरिष्ठ सहकारी नेहमी म्हणत की, "आनंद, बायकांनी हळदी कुंकवाला आणि पुरुषांनी चहाला कधी नाही म्हणू नये." त्यांचे ते वचन म्हणजे यिन का यांग का कुठल्याश्या चीनी ड्रॅगन देवाची मला अप्रत्यक्ष आज्ञा आहे असे माझ्या मनाने घेतल्याने त्या चीनी तीर्थाचे पेयरूप मी दिवसातून साताठ वेळा भक्तीभावाने ग्रहण करीत असे. पण आता एक वेळच्या भाताबरोबर अनेक वेळेच्या चहावर मला पाणी सोडावे लागले. पोट कमी होईल या आशेने मी हे अनशनाचे प्रयोग सहन करीत होतो.

आणि नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी तिसरी प्लेट पाणीपुरी संपवताना जुना शाळासोबती भेटला. त्याने एकदम, "काय इंटरनेटचे लेखक ! आजकाल काय क्लास चालत नाही वाटतं ? बराच वेळ मिळतोय लिहायला … ह्यां ह्यां ह्यां", म्हणत माझ्या पाठीवर, ज्याला धपाटा म्हणतात अशी एक सणसणीत थाप मारली. एका हातात प्लेट तर दुसऱ्या हातात मोबाईल असल्याने मला प्रतिकार करता आला नाही आणि तोंडात भली मोठी पुरी असताना स्मित हास्य करण्याचा प्रयत्न केल्याने, अंजनीच्या सुतासारखा दिसत असताना, मी खांदे उडवून, मान हलवून, प्रजापतीवाल्याकडच्या त्या गर्दीत हलकी उडी मारत त्याला मूक प्रतिक्रिया दिली. त्याला काहीतरी झणझणीत उत्तर द्यावे असे मनात आले पण काही सुचलेच नाही. माझे असे बरेचदा होते, आयत्या वेळी प्रतिक्रिया सुचतच नाही आणि सुचते तेंव्हा मी एकटा असतो.

मला कसे गुंडाळायचे याचा साक्षात्कार माझ्या या मित्राला फार लहानपणीच झालेला होता. म्हणून त्याने सवयीप्रमाणे पुढच्या सगळ्या संभाषणाची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली. मग त्याच्या आग्रहावरून, माझ्या खात्यावर, पुढच्या दोन प्लेट पाणीपुरी खाताना कळाले की आमच्या दहावीच्या बॅचला २५ वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून आमच्या बॅचच्या काही लोकांनी Reunion चा कार्यक्रम (ह्याचे "पुनर्मिलन सोहळा" हे भाषांतर लिहिताना मलाच लाजल्यासारखे झाल्याने मी इंग्रजी शब्दच वापरला आहे) आखला आहे. नाश्ता, गप्पा, विविध गुणदर्शन, जेवण, खेळ, चहा वगैरे भरगच्च कार्यक्रम असून त्यासाठी माणशी एक गांधीजी अशी वर्गणी द्यायचे ठरले आहे. मी स्वभावाने तसा थोडासा बुजरा असल्याने लगेच हो-नाही न म्हणता नंतर फोन करून सांगतो असे सांगायचा प्रयत्न केला. तर त्यावर, "हो. तुम्ही आता मोठे लोक झालात. आता तुम्ही काय ज्ञानपीठ मिळालेल्या लोकांच्यातच बसणार. आमच्यासारख्या जुन्या मित्रांची आता काय किंमत?" वगैरे हृदयास घरे पाडणारी वाक्ये बोलू लागला. शेवटी, मी Reunionला येणार की नाही याच्या अनिश्चिततेमुळे त्याला होणाऱ्या दुख्खाला कमी करण्यासाठी मी एक गांधीजी त्याच्या हातावर टेकवले आणि घराकडे वळलो.

क्रमश

विनोदमौजमजालेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

विवेक ठाकूर's picture

6 Feb 2016 - 5:30 pm | विवेक ठाकूर

लगे रहो.

खेडूत's picture

6 Feb 2016 - 5:32 pm | खेडूत

:)
पुन्हा मज़्जा येणार.

पुभाप्र...!

नीलमोहर's picture

6 Feb 2016 - 5:33 pm | नीलमोहर

पुभाप्र

मिपावर अशा लेखांची सांप्रत अतिनिकड जाणवते आहे. पुभाप्र!

अजया's picture

6 Feb 2016 - 6:50 pm | अजया

:)
शाळेचा पुनर्मिलन सोहळा ;)
वाचतेच आहे! पुभाप्र

गवि's picture

6 Feb 2016 - 7:10 pm | गवि

वा... मस्त.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Feb 2016 - 7:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं!!! =))

उगा काहितरीच's picture

6 Feb 2016 - 7:55 pm | उगा काहितरीच

मस्त खुसखुसीत ! रच्याकने एकीकडे डॉक्टर खरे यांचा वजन कमी करायचे सल्ले अन् एकीकडे तुम्ही ! विठ्ठला कोणता हा झेंडा घेऊ हाती .

आई! आत्ता पापु खायची इच्छा झाली!

मोरेसाहेब भारी इशय घेतलासा.

आता काय गटग होनार, जुन्या चाफेकळ्या, (नट)मोगरे भेटनार. मज्जा मज्जा नुसती. त्यात तुमची नर्म इनोदी लेखन शैली. मग काय. धुरळाच.

बाकी हे रिउनियनने आमच्या व्यवसायाला पैसे कमवायचा मस्त मार्ग दिलाय बर्का. कोणतरी उत्साही प्राणी स्मरणिका काढतो, जाहीराती जमवतो, फोटो जमवतो. सगळे अगदी लाखभराच्या घरात जाते बघा. एका बॅचचे निदान १०० जण असतात. १००० रुपये कॉन्ट्री प्लस जहीरातीचा पैसा. मज्जाच मज्जा. काहीजण इव्हेंट पण देतात. बॅक्ड्रॉप, हॉल, जेवण, ऑर्केस्टॉ. मज्जाच आमची.

संदीप डांगे's picture

6 Feb 2016 - 9:01 pm | संदीप डांगे

असं नाय करायचं ना लेका अभ्या.. असं लाख वैगरे अमाउंट, कॉन्ट्रीच्या फिगर्स डिस्क्लोज नाय करायच्या, लोकांच्या डोळ्यात येतं ते. थोडी ष्टाईल बदलनेका, बघ असं जमतंय का ते:

"हे रियुनियन म्हणजे खरंच आयुष्याचा ठेवा असतो. परत कोण कधी भेटेल, कोण जाणे. मग काही उत्साही गट छान छान कल्पना घेऊन आमच्याकडे येतात, स्मरणिका, मेमेंटोज असावेत, प्रत्येकाला खास एक ए-थ्री साइजचा गॄपफोटो फ्रेम करुन द्यायचा. संध्याकाळी मस्त एखाद्या लॉनवर छान गप्पांची मैफल, जोडीला साग्रसंगीत जेवण, जुने दिवसा आठवून जुन्या काळातली आपली आवडीची गाणी गाणारा ऑर्केस्ट्रा.. हे सगळ खुप आवडतं सगळ्यांना, ह्यात जी काही मदत होईल ती सर्व आम्ही करतो, शेवटी कुणाच्या आयुष्याला पुरणारं हे यादगार गिफ्ट अजुन यादगार कसं बनवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. अशा क्षणांसाठी कोणी पैशाकडे पाहत नाही. आमच्याकडे येणारे क्लायंट नेहमीच खुष होउन जातात. त्यांच्या चेहर्‍यावरची खुषी पाहली की मेहनतीचं चीज होउन जातं." =))

बाकी, मोरेसाहेब, लेख नेहमीप्रमाणेच.... खुमासदार! आज इथे याठिकाणी, यानिमित्ताने, माय भवानीच्या साक्षीने समस्त मिसळापाव बुद्रुकच्या नागरिकांतर्फे आम्ही तुम्हाला "मिसळपावचे खुमासराव मोरे" अशी उपाधी प्रदान करतो आहोत. जय हिन्द जै माराष्ट...! ;-)

धन्यवाद … संदीप प्रतिष्ठाण की जै… भारत माता की जै … वन्दे मात्रम …

अभ्या भाऊ धंद्याचे गणित इतक्या खुल्लम खुल्ला मांडताय म्हणजे नक्कीच तुम्ही मराठी असाल. तुमच्या व्यवसायाला माझ्या शुभेच्छा.

अर्रर. तीनदा अर्धाच प्रतिसाद आला की.
असो....मी काय म्हणत होतो की मी नायजेरीयन आहे आणि पैसे कमवायच्या नवीन आयडीयावर पीएचडी करण्यासाठी इथे आलो आहे. ;)

खरे प्रतिसाद नसताना केवळ संख्या वाढवण्याचे हे नायजेरियन स्कॅम तर नव्हे? ;-)

खरे प्रतिसाद नसताना केवळ संख्या वाढवण्याचे हे नायजेरियन स्कॅम तर नव्हे? ;-)

पद्मावति's picture

6 Feb 2016 - 8:55 pm | पद्मावति

तुमचे लेख म्हणजे हमखास मनोरंजनाची guarantee असते.
मस्तं झालाय हा भाग सुध्धा. पु.भा.प्र.

बाबा योगिराज's picture

6 Feb 2016 - 9:10 pm | बाबा योगिराज

आवड्यास.
पुलेशु.
पुभाप्र.

आम्हाला आवडले आहे.लवकर लिहा.
सध्या आम्हीही त्यातूनच गेलो आहोत.आमच्या बॅचला ४५ वर्षं झाली म्हणून.एक झटपट प्रोग्राम आणि नंतर लोणावळ्यात एक दिवस राहून इनिमिनिमायनिमो'ला( चार गांधिजीच्या बदल्यात) पुरेसा वेळ मिळावा म्हणून.एक सांपल म्हणून मुलाखतीसाठी आमचीच निवड झाली होती.आता आणखी लिहून लेखाला डाय वर्शन लावत नाही.

यशोधरा's picture

6 Feb 2016 - 10:13 pm | यशोधरा

रॉयल्टीचा विचार व्हावाच!

पैसा's picture

6 Feb 2016 - 10:10 pm | पैसा

एकदम खुसखुशीत!

धन्यवाद मिपाकरांनो. काय छान प्रतिसाद देता तुम्ही लोक ! माझ्यासारख्या नवख्यालाही हुरूप चढतो लिहिण्याचा. पण तुमच्या अपेक्षेला मी खरा उतरीन की नाही ती शंकाच आहे. जे काही तोडकं मोडकं लिहितो आहे ते गोड मानून घ्या वगैरे सांगून तुमच्यावर जबाबदारी टाकत नाही. पण कुठलीही अपेक्षा न ठेवता वाचा एव्हढी विनंती नक्की करीन. पुढचे भाग टाकल्यावर तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत राहीन. तुमच्याच भाषेत सांगायचे झाले तर पुप्रप्र (पुढील प्रतिसादाच्या प्रतीक्षेत)

मी-सौरभ's picture

7 Feb 2016 - 9:20 am | मी-सौरभ

त्याला काहीतरी झणझणीत उत्तर द्यावे असे मनात आले पण काही सुचलेच नाही. माझे असे बरेचदा होते, आयत्या वेळी प्रतिक्रिया सुचतच नाही आणि सुचते तेंव्हा मी एकटा असतो.

आयला शेम टू शेम

मुक्त विहारि's picture

7 Feb 2016 - 9:53 am | मुक्त विहारि

सेम टू सेम...

मुक्त विहारि's picture

7 Feb 2016 - 9:57 am | मुक्त विहारि

खमंग बटाटेवड्यासारखा लेख....

(भजी-बटाटेवडा-चकली-चिवडा-भेळ-मिसळ टाइप लेखांचा प्रेमी) मुवि

भाते's picture

7 Feb 2016 - 11:34 am | भाते

आज बरोबर एक वर्ष झालं. गेल्या वर्षी, २१ वर्षांनंतर, आम्ही शालेय सवंगडी असेच स्नेहसंमेलनाला शाळेत एकत्र भेटलो होतो. त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. छान.
सुरुवात छान झाली आहे. पुभाप्र.

पिलीयन रायडर's picture

7 Feb 2016 - 2:49 pm | पिलीयन रायडर

=))

Mastch lihita ho!!

स्वाती दिनेश's picture

7 Feb 2016 - 6:36 pm | स्वाती दिनेश

खुसखुशीत लेख..
पुभाप्र.
स्वाती

विभावरी's picture

8 Feb 2016 - 10:59 am | विभावरी

मस्त लेख !!

कपिलमुनी's picture

8 Feb 2016 - 12:43 pm | कपिलमुनी

आवडला