सोशल नेटवर्किंग (भाग ५)
मयंक poptates मध्ये बराच वेळ बसून होता. अनघा अजूनही आली नव्हती. तो तिची वाट पाहत होता असही नाही. त्याला खर तर शांतता हवी होती. पण अनघा काय सांगते याचीही उत्सुकता होती. अनघा आली तीच मोठ्या उत्साहात. ती नेहमीप्रमाणे आल्याआल्याच चालू झाली असती पण मयंकच्या रडवेल्या चेहऱ्यावरूनच कळत होत कि काहीतरी बिनसलंय. मयंक शून्यात हरवला होता. ती त्याच्यासमोर खुर्ची ओढून बसली तरी मयंकला कळलेच नाही. शेवटी तिने मयंकला हलवून विचारले कि काय झालंय. काही नाही असे म्हणत मयंक मेनू कार्ड मध्ये बघू लागला. अनघाला आता स्वतःच्या आणि मल्हारच्या प्रकरणापेक्षा मयंकला काय झालंय हे कळून घेण्यात जास्त इंटरेस्ट वाटू लागला.