शैलेंद्रच्या निमित्ताने...
एका मुलाला ओळखता का? डोंबिवली शहराबाहेरील पाथर्ली गावात शंकराच्या देवळाजवळ एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रहायचा. खाली रस्त्याला लागून त्यांचे दुकान होते. ज्या शाळेला मैदान नाही, स्कुल बस नाही. ते कशाला शाळेला स्वतःची इमारतही नव्हती. शाळेची किल्ली नाही मिळाली म्हणून किंवा धो धो पावसात छत गळत असल्यामुळे सुट्टी देणाऱ्या शाळेत शिकला तो. ४ थी, ७ वी शिष्यवृत्ती नाही, प्रज्ञा शोध परीक्षेचा शोध त्याला लागलाच नव्हता, होमी भाभा हे शास्त्रज्ञाचे नाव एवढीच माहिती होती, त्या नावाने परीक्षा बिरीक्षाही असतात हे काही त्याला ठावं नव्हते.