संध्याकाळचा पेग ..
जगातली सर्वोत्तम सुखे अगदी स्वस्तात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच ( हा 'कोणीतरी' कोण म्हणून काय पुसता कीबोर्ड वर बोटे आपटूनी? मीच की तो !). तर स्वस्त मिळणाऱ्या सुखांपैकी "संध्याकाळचा पेग" ही गोष्ट मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. मस्त संध्याकाळ असावी. सूर्य क्षितिजाकडे झेपावत असावा. किंबहुना नुकताच क्षितिजा पल्याड गेलेला असेल तर अति उत्तम. हुरहूर लावणारी सांज असावी. पोट हलके असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत जाण्यास उत्सुक असावे. हलकेच एक लार्ज पतियाळा भरावा आणि सोबतीला चखना असावा. अहाहा ....
फक्त अर्धा पाऊण तास!... सुरानंदी टाळी लागावी आणि आपण मदिरादेवीच्या अधीन व्हावे.
तेवढा हा अर्धा पाऊण तास मिळाला की कसे फ्रेश वाटते. मला असे संध्याकाळच्या वेळी २/४ तास बसने पसंत नाही. फक्त अर्धा पाऊण तास बस झाले. सगळी जिंदगी फ्रेश राहायला मदत होते या एका पतियाळा मुळे.
एकदा माझा एक "चहाप्रेमी टी-टोटलर" मित्र ऐन संध्याकाळच्या सुमारास घरी आला होता. मला रोजच्याप्रमाणे माझ्या लार्ज पतियाळाची आठवण यायला लागली. मी मित्राबरोबर त्याच व्याकुळ अवस्थेत गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होतो. मधूनच अतिशय आठवण येऊन माझे हात असंबद्ध हालचाल करत होते.
"मी जरा 'घेऊ' का? पिता पिता गप्पा मारूया का?" मी भीड सोडून त्याला अधीर स्वरात विचारले. त्यावर तो निक्षून म्हणाला. "छे छे. अजिबात नाही. सवय लागेल". माझ्या वाढलेल्या सोशल स्टेटसकडे बघूनच तो बोलत होता हे उघड होतं. लार्ज पतियाळामुळे माझे सोशल स्टेटस वाढणार असेल तर ते मला "पेग होटोंपर" होतं. तो पुढे म्हणाला,"इतक्या दिवसानी भेटतोय. मला तर किती गप्पा मारू आणि किती नको असे झालंय. पितोस कसला?"
मी अपमान गिळून म्हणालो, "म्हणजे डायरेक्ट ढोसायची नाही रे. उगीच जरा ओठ ओले करायचे. सकाळपासून कामं चालली आहेत न! तुला तर माहीत आहेच माझी सवय."
कसं कुणास ठाऊक त्याला पाझर फुटला. शेवटी माझाच मित्र तो! म्हणाला, "चल घे. पण जास्त नाही. नाही तर बेवडा होशील".
मला आता मी "विशेष" गटारात लोळणारा बेवडा व्यक्ती वाटायला लागलो. एका साध्या पेगची एवढी मोठी किम्मत?
नुसतं प्यायचं ह्या विचारनेही मी प्रफुल्लित झालो. त्याच्याबद्दल प्रेमाचं भरतं आले. त्याने विचार बदलायच्या आधी मी माझा पतियाळा भरायला घेतला. त्याने चक्क चहा ऐवजी 'तकिया मे अल्ला डालके' ची मागणी केली. त्याच्या 'तकिया' भरल्या चषकाला माझ्या पतियाळा भरलेल्या चषकाने चिअर्स केल्यावर त्याने अशा वेळी तक्रं इंद्रस्य दुर्लभम् किंवा ताक हे पृथ्वीवरचे अमृत आहे यावर मला लेक्चर न दिल्याबद्दल त्याचे मनात आभार मानत म्हटलं, "ओके. नुसता एखादा पेग घेतो, ढोसत नाही, मग तर झालं." अर्थात त्याने लेक्चर द्यायला सुरवात केली तर, 'पतियाळा टिटोटलरस्य दुर्लभम्' असा पलटवार करायची मी मनोमन तयारी केली होतीच.
आम्ही बसलो. कसल्या गफ्फा नि कसले काय? तिसर्या मिनिटाला त्याने चखान्यावर जो हल्लाबोल केला त्यामुळे गफ्फा मारायला त्याला उसंत राहिली नाही. आणि तकियाचे बरेच चषक रिकामे झाले होते. इकडे मी हळुवारपणे मंदिरादेवीच्या मिठीत विरघळलो होतो. तकियाला मदिरेची चव येईल काय...??
संध्याकाळचा पेग बुडू नये म्हणून मी संध्याकाळी कुणाकडे जात नाही. संध्याकाळचा सिनेमा, संध्याकाळचे नाटक पाहत नाही, संध्याकाळची संध्या करत नाही. एखाद्या लग्नघरात जेवण झाले की लगेच संध्याकाळी स्वतःच्या घरी येतो. एवढं कशाला, मी नोकरी करत असतांनाही, माझा पतियाळा मॅनेज करायचो. ओ हो हो हो, मी कामावर असताना पीत होतो असा गैरसमज करून घेऊ नका. कसं ते सांगतो. दुपारचा चहा पिऊन झाला की, मी माझा टेबल आवरायला घ्यायचो. बरोबर पाचच्या ठोक्याला ऑफिस बाहेर पडून मावळतीला घरात हजर व्हायचो. हा नित्यनेम कधी चुकला नाही.
आमच्या ऑफिसात बाररुम सारखी खरोखरची "पब"रूम नव्हती म्हणून हा खटाटोप मला करायला लागायचा. अर्थात कधीकधी थोडी घाई, गडबड, गैरसोय होत असे, पर चलता है. मी कुठेही, कधीही, कशाही परिस्थितीत, घरात, घराबाहेर, बसून, उभा राहून, चालता चालता पिऊ शकतो ही तर माझी खासियत आहे. माझी कसलीच अडचण होत नाही. मी मदिरेच्या प्रेमात पडलो तेव्हा पासून माझी 'मेरी यादो मे तुम हो, मेरे खयालो मे तुम हो, मेरे दिलकी धडकन मे तुम हो, या मेरी जान ही तुम हो'… अशी अवस्था आहे !
माझी "पिना न मुझको आये"अशी अवस्था कधी झाली नाही. किंवा "दुसऱ्या दिवशी सकाळी हँगओव्हर आला" अशी त्रासिक तक्रार मी कधीच करत नाही. टवाळ, पेताड मित्रांचा मला त्रास होत नाही. कारण मी त्यांच्या बरोबर माझा पतियाळा शेअर करतो. आय लव्ह माय पेग. एक पतियाळा पोटात गेल्यानंतर येणारी नशा माझी जीवाभावाची सखी आहे.
तळटीप: एका वेळी एका पतियाळाच्या पुढे मात्र जाऊ नका. ड्रिंक रिस्पॉन्सीब्लि, ड्राइव्ह सोबर !
प्रतिक्रिया
28 Aug 2019 - 9:18 pm | चामुंडराय
"सकाळचा चहा" ह्या पुढील जिल्बी वर विशेष प्रताधिकार लागू करण्यात आला आहे याची नोंद घ्यावी तेव्हा हा विषय कोणासही घेता येणार नाही.
मात्र एक पतियाळा मिळाला तर हक्क सोडण्यास तयार आहे :))
28 Aug 2019 - 11:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संध्याकाळची हुरहुर पोहोचली आहे. ;) श्रावणात असे त्रासदायक विषय घेऊ नये हो. लेखन आवडले हे सांगणे न लगे.
खा कर ठोकर ज़माने की, फिर लौट आये मयखाने में,
मुझे देख कर मेरे ग़म बोले, बड़ी देर लगा दी आने में..!!
-दिलीप बिरुटे
1 Sep 2019 - 11:18 pm | kunal lade
शायरी मात्र छान आहे हो.
28 Aug 2019 - 11:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे असे नको ते छंद लावून घेतल्यामुळेच तुमची हवाई सफर मागे पडली आहे वाटते... की रोज संध्याकाळी पतियाळामार्गे Hawaii ला जाऊन येत आहात ? :)
झोप येण्यापूर्वी, काय ते एकदा स्पष्ट करा बुवा. ;)
28 Aug 2019 - 11:34 pm | फुटूवाला
थोरले हैत ओ तुम्ही तर...
पण श्रावणात असं काही नको. :)
लेख एकदम भारी आहे.
"म्हणजे डायरेक्ट ढोसायची नाही रे. उगीच जरा ओठ ओले करायचे. सकाळपासून कामं चालली आहेत न! तुला तर माहीत आहेच माझी सवय."
हे बऱ्याचदा बोलून झालंय.29 Aug 2019 - 12:02 am | जॉनविक्क
29 Aug 2019 - 12:05 am | जालिम लोशन
वनस यु कॅच क्लस्टर हेडएक, यु विल नेव्हर टच प्याला. बॅड बाॅय.
29 Aug 2019 - 8:25 pm | चामुंडराय
नो वरिज जालिम लोशन
अँड थँक्स फॉर युअर कन्सर्न
जर अर्धशिशी झाली तर माझ्याकडे एक जालीम लोशन आहे !
29 Aug 2019 - 2:32 am | फेरफटका
दुपारच्या झोपेचं विडंबन मसत जमलय!
29 Aug 2019 - 2:33 am | फेरफटका
मस्त .. मसत नाही. :)
29 Aug 2019 - 8:42 am | ज्ञानोबाचे पैजार
हा प्रतिसाद वाचेपर्यंत हे लक्षातच आले नव्हते की हे आजीबाईंच्या लेखाचे विडंबन आहे ते.
सायंकाळच्या पेग बद्दल जणूकाही माझ्याच मनातल्या विचारांचे प्रतिबिंब लेखकाने इथे हूबेहूब उतरवले असे वाटून मी खुश झालो होतो, की चला एक समविचारी मनुष्य सापडला म्हणून.
छ्या.. हा प्रतिसाद देउन तुम्ही माझा अगदी भ्रमनिरास केलात.
पैजारबुवा,
29 Aug 2019 - 10:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे देवा. तसंही हे स्वतंत्र मनकी बाते.
अनेकांची मनकी बाते होती असे वाटले.
-दिलीप बिरुटे
29 Aug 2019 - 4:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
काय हे पैजारबुवा, आमचा,
झोप येण्यापूर्वी, काय ते एकदा स्पष्ट करा बुवा. ;)
हा बार एकदम फुसका ठरला की हो ! ;)30 Aug 2019 - 10:54 am | ज्ञानोबाचे पैजार
पण हा डबल बार निघाला,
मग म्हटलं, चला आपणही रांगेत बार लावून बसूया.
तसेही थोरामोठ्यांच्या रांगेत बार लावून बसायला क्वचितच मिळते.
मग आलेली संधी का सोडा?
पैजारबुवा,
29 Aug 2019 - 11:49 am | साबु
मला पण लेखाच्या शेवटी शेवटी कळाल..नाहीतर मलापण समविचारी भेटल्याचा आनन्द झालेला. मला आवडेल रोज एक पेग प्यायला..पण आपण दारुडे होउ कि काय अशी भिती वाटते...आणि पतियाला म्हणजे किती? ९०?
3 Sep 2019 - 5:16 am | चामुंडराय
९० कि १०० ते माहित नाही.
माझा नेहेमीचा काचेचा गिल्लास ठरलेला आहे. तर्जनी आणि करंगळी च्या उंचीतला फरक म्हणजे माझा पतियाळा !
तो ९० आहे कि १०० ते मोजायच्या फंदात कधी पडलो नाही.
29 Aug 2019 - 3:10 pm | जगप्रवासी
एकदम आवडेश