समस्त लोकप्रतिनिधींनो,
सत्ताधार्यांनो आणि विरोधकांनो... पांढरी दाढीवाल्यांनो आणि काळी मिशीवाल्यांनो
चंदन टिळावाल्यांनो आणि काजळ सूरमावाल्यांनो.... जाणत्या राजांनो आणि प्रधान सेवकांनो
तुमच्या संधीसाधूपणाची, हीन विचारांची आणि बेशरमपणाची आता आम्हाला किळस यायला लागली आहे |
'आमचं असंच ठरलं होतं' वाल्यांनो आणि 'असं काहीच ठरलं नव्हतं' वाल्यांनो
'लोकशाहीला कटिबद्द आहोत' वाल्यांनो आणि 'जातीयवादाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काहीही करायला तयार' असणार्यांनो
तुमचा निर्लज्ज दांभिकपणा आमच्या लक्षात येत नाही असं वाटतंय तुम्हाला???
फेटावाल्यांनो आणि गोल टोपी वाल्यांनो..... भगवी वस्त्रधार्यांनो आणि पांढरा झगा घालणार्यांनो
निळ्या, हिरव्या, केशरी रंगांत आम्हाला रंगवणार्यांनो... आमच्या महापुरुषांची वाटणी करणार्यांनो
आमच्यात जाती-धर्म, प्रांत-भाषा, गरीब श्रीमंतीची फूट पाडून स्वतःची पोळी भाजण्याचा तुमचा हलकटपणा आम्हाला कधीच कळला आहे |
फॉर्च्युनरवाल्या नगरसेवकांनो, मर्सिडीसवाल्या आमदारांनो आणि रोल्स रॉइसवाल्या खासदारांनो
कैक हेक्टर शेतजमीन गिळंकृत करणार्यांने... नियम धाब्यावर बसवून टोलेजंग इमारती, मॉल्स उभारणार्यांनो
तुमच्या 'गरुड भरारीच्या' पंखांतलं बळ कुठून येतं हे आम्हाला दिसत नाही?
उन्मत्त सत्ताधार्यांनो आणि हपापलेल्या विरोधकांनो... तुमचा सत्तेसाठीचा बेशरम नंगा नाच जनता उघड्या डोळ्यानी बघते आहे ह्याचं भान ठेवा. आम्ही सगळेच आपापल्या लढाया लढत आहोत... रोजीरोटीच्या, नोकरी-धंद्याच्या, पोरांना चांगलं शिक्षण देण्याच्या....पण जर ह्या एका महासंग्रामासाठी आम्ही एकत्र आलो तर तुमची धडगत नाही. तेव्हा कामाला लागा... ज्या कामांसाठी तुम्हाला "आम्ही" तुम्हाला निवडलंय त्या कामाला.
नाहीतर मग पुन्हा तुम्ही आहात आणि "आम्ही" आहोत |
जे.पी.
प्रतिक्रिया
1 Nov 2019 - 11:02 pm | अनन्त अवधुत
जे.पी. च हे म्हणु शकतात.