चेहरे मुखवट्याआडचे
पद, पैसा, प्रतिष्ठेला अवास्तव महत्त्व आलं की, माणसं चाकोरीतलं, चाकोरीबाहेरचं सगळंकाही करायला तयार असतात. अर्थात, यामागे सोस अन् कोणत्यातरी आसक्ती असतात. माणूस स्वतःला विचारांनी कितीही समृद्ध वगैरे म्हणवून घेत असला, तरी स्वार्थाची कुंपणे ओलांडून पलीकडच्या परगण्यात पोहचता नाही येत हेच खरं. अंतरी असणारे अहं आसक्तीपासून विलग नाही होऊ देत त्याला. आयुष्य देखणं वगैरे असावं. जगणं सुंदर असावं असं वाटण्यात वावगं काहीच नाही. पण ते नाही म्हणून झुरत राहणं विपरीत आहे. जगण्याच्या परिघात काहीतरी कमतरता राहिली की, मनात अस्वस्थता दाटत जाते. ही अस्वस्थताच आयुष्याच्या सुघड वाटा अवघड करते.