सोनचाफा आवडतो मला; विशेषतः त्याचा सुगंध. सगळ्यांनाच आवडत असणार. बर्याच वर्षांपूर्वी दादर स्टेशन बाहेर पहिल्यांदा बघितला आणि घेण्याआधी वास घेऊन बघत होतो तर फुलवाल्या आजी म्हणाल्या, "बाळा, वास घेऊ नये. देवाला वाहतात फुलं!"
आज थंडी वाढली आहे तशी, संध्याकाळी बाहेर जाताना अंधार पडल्यावर गाडीच्या काचा बंद करून हीटर मोड वर चालू होता एसी. एका सिग्नलला गाडी थांबली आणि बहुतांशी रस्त्यावर राहणारी माणसं काहीबाही विकायला घेऊन आली.
कुठेतरी वाचलेले आठवते की अशा लोकांना पैसे देऊन उत्तेजन देऊ नका. पळवून नेलेली मुलं घेऊन भीक मागतात. किंवा विनाकारण काही वस्तू गळ्यात मारतात वगैरे.
मलाच अलीकडे शिवाजी पार्कच्या बाहेर अनुभव आला. दोन्ही मुलींना सोबत घेऊन डोनटचा बॉक्स हातात घेऊन चाललो होतो, तर फूटपाथवर एक कुटुंब होत त्यातला ७-८ वर्षाचा मुलगा आणि छोटी मुलगी तो खाऊ जणू आपल्या हक्काचा आहे अशा अविर्भावात उड्या मारून ते हिसकावून घ्यायचा प्रयत्न करत होते. मुली घाबरल्या. हटकल्यावर १० रूपये द्याच म्हणू लागला.
त्यामुळे अशा मुलांबाबत वाईट वाटत असलं तरी काही सांगता येत नाही.
तर सिग्नलवर सोनचाफ्याच्या फुलांचा गजरा घेऊन एक लहान मुलगी दिसली. फुलं थोडी कोमेजलेल्या सारखी वाटत होती. निदान त्या मुलीला मदत म्हणून घ्यावी अशी इच्छा झाली होती पण covid मुळे घेता आली नाहीत याच वाईट वाटल. आपला पांढरपेशी विचार; हात sanitize नसेल त्यांचा वगैरे.
आश्चर्य म्हणजे, त्या मुलीने उगाच काचेवर टकटक न करता बाजूला फूटपाथ वर गेली आणि माझे लक्ष गेले की तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे.
जेमतेम 12-13 वर्षाची असेल.
अशा गोष्टींकडे आपण जरा शंकेनेच बघतो की मुद्दाम लहान मुलांना पुढे करतात किंवा व्यंग्य आहे अस भासवतात, त्यामुळे नीट बघितले आणि दिसले की हातात काचेच्या बांगड्या, पायात जोडवी. त्यामुळे निश्चित लग्न झालेले होते.
एवढ्या लहान वयात लग्न... उडालोच मी. कुठे आहे आपला बालविवाह प्रतिबंधक कायदा!
कट्ट्यावर बसून तिच्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठ्या मुलासोबत बोलत बसली. माझी नजरानजर झाली आणि तिचे डोळे बघून सुन्न झालो. कारण त्या निष्पाप मुलीच्या डोळ्यात ना कुठले स्वप्न, ना कुठली चिंता. निर्विकार वाटली आणि ती नजर कुठेतरी ओरखडा उठवून गेली. वाटले, गजरा घ्या म्हणून मागे लागली असती आणि आपण आपल्या परिघात राहून लांब जा म्हणून हटकले असते तर एवढे विचार आलेच नसते. किती पळवाटा काढतो ना आपण.
परत येताना दुसर्या सिग्नलला तिच्यापेक्षा एखाद्या वर्षाने मोठ्या असणार्या मुलीने गळ्यात झोळी बांधली होती आणि तान्हे बाळ होते.
खरच सोनचाफा कोमेजून गेला होता!
प्रतिक्रिया
7 Dec 2020 - 8:49 am | सौंदाळा
वास्तवदर्शी लेख आवडला.
7 Dec 2020 - 9:05 am | उपयोजक
आवडले!
कायदे फक्त बनवून उपयोग नाही ते सक्तीनेचराबवले पाहिजेत हे ही खरेच!
7 Dec 2020 - 9:32 am | कुमार१
छान लिहीले आहे !
7 Dec 2020 - 10:31 am | टर्मीनेटर
खूप छान.
लेखन आवडले 👍
7 Dec 2020 - 12:08 pm | ज्ञानोबाचे पैजार
खरतर लेख वाचताना ह्या वाक्याला ठेचकाळलो
मुंबईत हिटर मोड वर एसी म्हणजे "काटाकिर्र" मधे श्रीखंड पुरी खाण्या सारखे वाटले,
पैजारबुवा,
7 Dec 2020 - 4:13 pm | लई भारी
@सौंदाळा कुमार१ टर्मीनेटर : उत्तेजना बद्दल धन्यवाद!
@उपयोजक. हो ना. अशा लोकांच्या बाबतीत कायदा अंमलबजावणी कशी करायची हा प्रश्नच असावा.
@पैजार बुवा, मला लिहिताना शंका आलीच होती. दादर/शिवाजी पार्क चा उल्लेख केला म्हणजे कालचा प्रसंग मुंबई मध्ये घडला असेच वाटणार :)
नेमके आधीचे दोन्ही प्रसंग मुंबईतले आहेत पण कालचा प्रसंग पुण्यातला आहे. संचेती चौक.
7 Dec 2020 - 4:37 pm | लई भारी
किंबहुना, हीटर चा उल्लेख करण्यामागे तेच कारण होत की विरोधाभास जाणवून द्यावा! आपण किती सुरक्षित आयुष्य जगतो आणि थोडासा जरी बदल झाला तर लगेच आपण तक्रार करतो वगैरे.
7 Dec 2020 - 4:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन आवडले. सोनचाफा मलाही आवडतो. झाडाखाली पडलेला दिसला की उचलण्याचा मोह होतोच. आठवणींशी निगडीत असल्यामुळे मनात चाफा फूलतो.
बाय द वे, ''हात sanitize नसेल त्यांचा वगैरे'' या विचाराचा मलाही थोडाफार त्रास होतो. कोणाकडून काही घेतलं तरी याला करोनाचा संसर्ग झाला तर नसेल ना, गाडीला टकटक केलं तरी, करोना गाडीच्या काचाला चिकटला तर नसेल ना. घ्या काचा सॅनिटाइज करुन. अवघड आहे, सर्व. :)
-दिलीप बिरुटे
7 Dec 2020 - 5:01 pm | स्मिता.
रस्त्यावर दिसणारे असे अनेक चेहरे पाहून आपण सुखवस्तू असल्याची (अनावश्यक) खंत वाटायला लागते.
सुमारे ११-१२ वर्षांपूर्वी एका मॉलच्या बाहेर एक भिकारीण दिसली होती, जास्तीत जास्त १६-१७ वर्षाची मुलगी असेल. तिच्या बाजूला दोन-अडीच वर्षाचं पोर, मांडीवर एक बाळ आणि एक पोटात दिसत होतं. ती मुलगी अगदी निर्विकार नजरेने आल्या-गेल्याला भीक मागत होती. आपल्याकडे भिकारी दिसणे नवीन नाही तरी हे दृष्य पुढचे दोन दिवस सतत मनाला भेडसावत होते.
मनात नाही नाही ते विचार... ही मुलं तिच्या पदरात टाकून, तिला भिकेला लावून नवरा दारू पिऊन गटारात पडला असेल की तिच्यावर अनेक वेळा अत्याचार झाले असतील आणि त्यातून एका मागे एक मुलं होत असतील. कारण काहीही असलं तरी एवढ्या वर्षांनीसुद्धा ते आठवून मन खिन्न झालं.
9 Dec 2020 - 6:37 am | लई भारी
@बिरुटे सर, अगदी सेम विचार :-) लवकरच ही सर्व अनिश्चितता संपावी अशी आशा करूया.
@स्मिता, आपण म्हणताय तशी खंत निश्चित जाणवते आणि टोचणी लावून जाते.
12 Dec 2020 - 12:09 am | दुर्गविहारी
सुन्न करणारा लेख. बाकी आपल्या देशात कायदे वगैरे पाळणाऱ्यांसाठीच असतात.
लिहिते झालात याचा आंनद आहे. :-)