खंड पहिला
भाग – २.
तिने सकाळी उठून अंगणात सडा सारवण केले. आंघोळ उरकून तुळशीला पाणी घातले. अजून सगळे घर शांत झोपेत होते. लवकरच म्हशीचे दूध काढायला गडी येईल. नंतर हरकाम्या नोकर, स्वयंपाकाची बाई, एकेक राबता सुरू होईल. बाईने सगळ्यांचा चहा, ताजे दूध शेगडीवर चढवले की मग ती जागे होणाऱ्या मुलाबाळांकडे लक्ष पुरवायला मोकळी. भरलेले सुखी घर होते ते. दोन भाऊ, या दोघी जावा, लहान मोठे मिळून नऊ बाळगोपाल शिवाय त्यांचे आजी आजोबा. ती मोठी जाऊ म्हणून घरातली मुख्य जबाबदारी तिच्यावरच होती. सगळ्यांना तिच्या प्रेमळ अधिकाराची इतकी सवय झाली होती, की तिच्याशिवाय घरातले पान हलत नव्हते. धाकटी जाऊ सगळी मदत करायची. जरी नोकरचाकर होते, तरी त्यांना कामे सांगणे, लक्ष ठेवणे ही सगळी व्यवस्था मोठी जाऊ म्हणून तीच बघायची. पहाटे उठल्यापासून ते रात्री बाई ओटा स्वच्छ करून गेली की मगच सगळी पिल्ले शांत झोपली आहे हे पाहिल्यावरच ती अंग आडवे करायची. तीच वेळ होती की भरल्या घरात नवऱ्याच्या वाट्याला बायको यायची. त्याला खुश केले की मग तिला समाधानाने शांत झोपायची.
घरात सगळे सणवार, उपासतापास व्यवस्थित पार पडत. सणासुदीला पाहुणे देखील असायचे. सगळ्या मोठ्या खटल्याची उस्तवार ती लग्न झाल्यापासून आनंदाने पार पाडत आली होती. घरची कर्ती पुरुषमंडळी त्यांच्या कामधंद्यात यशस्वी होती. भावाभावांचा भागीदारीत व्यवसाय असून देखील कधी त्यावरून कुरबुरी किंवा घरात मुलांवरून अथवा इतर कौटुंबिक कारणांनी कधीच भांड्याला भांडे लागले नाही. स्त्री स्वातंत्र्य वगैरे शब्दही त्या घराने कधी ऐकले नव्हते. पैसे कमावून आणणे हे पुरूषांचे काम होते. आहे त्या कमाईत गुण्यागोविंदाने घर चालवणे व मुलांवर संस्कार घडविणे हे मुख्यत्वे घरातल्या स्त्रियांचे काम होते. वेगगळ्या कारणांनी घराचे पुरुष आणि स्त्रिया सगळ्यांनाच ताणतणाव सोसावे लागत. एक माणूस चिडून काही बोलत असेल तेव्हा समोरच्याने शांत राहून सोसावे, नंतर केव्हातरी त्याला त्याची चूक आपल्या मोठ्या मनाच्या वागणुकीतून समजेल असे करावे. नाहीच समजली तरी केवळ घर अभंग राहावे, चारचौघात बदनामी होऊ नये म्हणून पडते घ्यावे असे बाळकडूच स्त्रियांना लहानपणापासून पाजले असायचे. यातून स्त्रियांवर अर्थातच अन्याय होत असत. "सुखी" संसाराची अशी किंमत मोजावीच लागते ही शिकवण खोलवर रुजलेली होती.
दुसऱ्या बाजूने पहिले तर, कोणीच कोणाचे गुलाम नव्हते. सगळेच आपापल्या क्षेत्राचे मालक-मालकीण होते. घरातल्या एकमेकांना संभाळून घेत, गुणांचे कौतुक आणि अवगुण सुधारण्याचा प्रयत्न करीत, वेळप्रसंगी मोठ्या मनाने एकमेकांना माफ करीत एकत्र कुटुंबे समाजाचा आदर्श बनत होते.
ही अलिखित आणि मनापासून स्विकारलेली व्यवस्था होती. नवलाची बाब ही, की अशी लाखों कुटुंबे त्यावेळेस देशादेशांमधून होती.
क्रमश:
******