।। चहाच्या पलीकडे...।।
"व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।" अर्थात महर्षी व्यास यांनी सर्व जग म्हणजे जगातील सर्व विषय उष्टे ( हाताळलेले ) आहेत. थोडं उलटं जाऊन आपण असं म्हणू या की साऱ्या जगाने चहा उष्टावलेला आहे. तो आवडणारे आहेत, नावडणारे आहेत , त्याबद्दल तटस्थ आहेत. पण चहा माहीत नाही असा जगी कोणीही नाही.
चहाबद्दल लिहायचे तर कोणी त्याच्या इतिहासाबद्दल, भूगोलाबद्दल लिहिल. ज्यात तो सर्वात आधी कोण प्यायलं, कसा प्यायलं, मग त्याचा प्रचार व प्रसार कसा झाला. त्याचे प्रकार किती, त्यांची माहिती कशी, त्याला लागणारं हवामान, तो कुठे उगवतो, कसा तयार होतो, कसा पाठवला जातो वगैरे वगैरे. कोणी त्याची वैज्ञानिक बाजू सांगेल की त्यात कोणती रसायनं असतात, ती आपल्या शरीरावर कसं काम करतात, त्याचे परिणाम काय, कधी घ्यावा , कधी घेऊ नये, काय काळजी घ्यावी इत्यादी. कोणी त्याचे अर्थशास्त्रीय गणित समजावून सांगेल की किती हेक्टरमधे किती किलो तयार होतो, कितीला विकता येतो, फायदा किती होतो. कोणता देश किती निर्यात करतो, आयात करतो, परकीय चलन किती मिळते असं काहीतरी. कोणी त्याच्यावर कविता, शेर रचेल व त्या रचना चहाच्या चित्रांवर चिकटवून लोकांना पाठवेल.
मला 'चहा' या पेयामागील मानसशास्त्राविषयी उत्सुकता असते. आपण चहा पिण्या / पाजण्याआधी खूप काही घडत असतं, ते जाणणं महत्वाचं असते. चहा पिऊन संपल्यावरही जिभेवर रेंगाळणाऱ्या त्याच्या चवीशिवायही काही टिकून राहतं, ते जपून ठेवायचं असते. दुधाचा असो वा कोरा, साखरेचा वा बिन साखरेचा, आल्याचा वा मसाल्याचा वा साधा, धड्या कानाच्या वा तुटलेल्या कपातून, कप नवीन किंवा जुना, कडक वा सौम्य, बशीतून फुर्रफुर्र आवाज करत किंवा श्रीमंती थाटात चहालासुद्धा न कळता अलगद प्राशन करणे असो, टपरीतला ऋण तारांकित ते हॉटेलातला वाढता धन तारांकित, कटिंग किंवा फुल्ल, गरमागरम किंवा गारेगार असो, ह्या सगळ्या चहात काहीतरी सामाईक असतेच, त्याची ओढ असते.
म्हणजे असं की समजा तुम्ही सगळे कुटुंबिय किंवा मित्रमैत्रिणी गप्पाटप्पा हाणत, आवडता सिनेमा बघत, पत्ते खेळत बसलेला आहात आणि अचानक कोणीतरी चहाची टूम काढतो. "कोण कोण चहा घेणार? " हा प्रश्न ऐकून जे सुख हृदयीं उन्मळतं, जी आस इंद्रियांना लागते तिचं वर्णन कसं बरं करावं? मग चहा कोण करणार, किती वेळ लागतोय यावर यच्चयावत भंकस सुरू होते.
स्वयंपाकघरात भांड्यांचेआवाज, पाणी भरताना ओतताना होणारे मंजुळ रव, मधेच भककन् गॅस पेटल्याची खूण पटते, साखर व चहा डब्यांची झाकणं उघडून उकळत्या पाण्यात एकजीव व्हायला, दुधाला कषाय करून सोडायला उतावीळ, अधीर झालेले असतात. पातेलं हळूहळू आगीच्या ठेक्यात आपला ताल मिसळू लागतं. एका समेवर साखर व दुसरीवर चहा आत उडी मारतात. मग सुगंधाचं साम्राज्य पसरतं, आपल्याला अंकीत करून आपलं लक्ष खेळातून, गप्पांमधून हिसकावून घेतलं जातं. शरीरातील सगळ्या अवयवांना सूचना मिळते. एव्हाना मज्जासंस्था विविध ग्रंथींना त्यांच्या टाक्या रित्या करायला सांगते. तोवर कपबश्यांसोबत बांगड्यांचे व ट्रे यांचं फ्युजन कानांना तृप्त करू लागतं.
( स्त्रिया असतील बांगड्यांचा, पुरुष असतील तर बरेच अनावश्यक आवाज ( तुटल्याफुटल्याचे सोडून), हे कुठे आहे, ते कुठे आहे असले केविलवाणे प्रश्न ऐकू येऊ शकतात.) एकीकडे दूधही चहात मिसळण्यासाठी आतूर होऊन पातेल्याबाहेर येऊ पाहतं. रंगांची देवाणघेवाण होते. काही क्षणांतच ते जादुई पेय आपल्या समोर येतं. तोपर्यंत तृप्तीची लाट हेलकावे खाऊ लागलेली असते.
उरतो तो फक्त सोपस्कार चहा गट्टम करत करत स्वतःला त्या लाटेत सोपवून देण्याचा.
थोडक्यात काय तर " चहा घेऊन जा ना", " चहा टाकलाय, झालाच. दोन मिनिटांत आणते/तो", " चहा घेतल्याशिवाय बरे जाल आणि गेलात तर परत कसे याल?", " चल रे, चहा घेऊ आणि मग पिता पिता बोलू." यांसारख्या वाक्यातून समोरच्याचा जिव्हाळा, आपुलकी, प्रेम,ममता असं काय काय जाणवतं. गाडीतून प्रवास करताना बसून बसून आलेला शीण एका कपात पळून जातो. गाडीच्या वेगाबरोबर जीवनाचा वेगही जरा मंदावतो. धावणारे क्षणही कपाच्या अवतीभोवती फेर धरतात. आपला लगाम थोडा सैल करतात. थोडं ते जगतात थोडं आपल्याला जगू देतात.
चहा व माणुसकी यांचा परस्परांशी घनदाट संबंध आहे. कपभर चहा माणसाचं हृदय मूठभर आहे का आकाशापेक्षा मोठं आहे, हे मोजू शकतो. तो जरी कपात मावला तरी तो देण्यामागची भावना निश्चितच अनेक पटींनी मोठी असते. कोणाला कधी चहा हवाय हे कळणं व तो न सांगता / मागता समोर नेऊन ठेवणं ( पण आदळआपट, त्रास असता कामा नये. शरीरातही व मनातही ) ,असं जमणाऱ्याला पद्मश्री का बरं देऊ नये?
मनाने मनापासून केलेल्या चहाला आलेली गोडी 'चहा' या शब्दप्रयोगापलीकडे असते. दिसायला तो जरी चहा असला तरी ते माणसातील इतरांना समाधान देणे या उच्चतम भावनाविष्काराचे मूर्त स्वरूप असते. चहा हे निमित्त असतं हो, आपल्याला तर समोरच्याला आपल्या मनातला चांगुलपणाच द्यायचा असतो, शुभेच्छारुपीच म्हणा ना. प्रत्यक्ष 'चहा देणं' यापेक्षा नुसतं 'विचारणं' हे ही आपल्या पदरी बराच मान देऊन जातं जे एरव्ही दुनियेत जरा अवघडच आहे.
ग्रामीण भागातील एका शाळेत दहावीच्या निरोप समारंभाला जायचा योग आला. दणदणून भाषण ठोकलं. नंतर चहापानाकरता एका खोलीत गेलो. शाळेतल्या मुलींनी बनवलेला कोरा चहा घेऊन काही मुली आल्या. मला कोऱ्या चहाची सवय नाही. मी माझ्या चेहऱ्यावरचे भाव लपवायचे असफल प्रयत्न करत होतो. एक गुरुजी म्हणाले," इकडे कोराच चहा असतो की.." त्या निरागस मुलींपासून माझा अपराधी चेहरा झाकत झाकत एक कप हाती घेतला व पहिला घोट घेतला. खरोखरच अप्रतिम झाला होता. गुरुजींना सांगून अजून एक कप मागवला. तो संपवला व मुलींना जाऊन सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्या चहाच्या पलीकडचे होते.
जूनच्या सुरूवातीला शाळा सुरू व्हायच्या आधी शाळेतल्या शिपाई बायका शाळेतील खोल्या साफ करत होत्या. बराच वेळ होऊन गेला. माझे दहावीचे ज्यादा क्लास सुरू होते. मी मधेच खिडकीतून बाहेर बघत होतो. त्यांची कामं थट्टामस्करीशी तोंडी लावत चालली होती. पण आता त्यांच्यातली चहाची साद मनाला भिडू लागली. गेटवरच्या शिपायाला सांगून बाहेरून चहा व बिस्किटं मागवली; त्यांना दिली. पाण्याचे पाईप, झाडू बाजूला सारून, ओलसर बेंचवरती तश्याच सगळ्याजणी बसल्या. घामेजलेले श्रांत चेहरे लगामातून मोकळे होऊन हसू लागले होते. त्यांना खेळायला सोडून काळाचे रखवालदार मैदानात पसरले व तेही खेळू लागले. एकीने विचारले, " सर, तुमाला वो कसं कळलं की आमाला 'चा' हवाय." मी लगेचच म्हणालो ," त्याने - चहानेच येऊन सांगितलं." त्यावर त्या सगळ्यांनी काहीही न सांगता जे सर्व काही सांगितलं ते त्या चहाच्या पलीकडचेच होते. आपण फक्त निमित्त असतो हो, दुसऱ्यांकरता 'चहा' होण्याचे.
कटुगोड अनुभवांच्या धगीने जरा आपल्यातल्या त्रिगुणांना उकळू द्यावं, मायेची साखर, कर्मांची पूड घालून स्वस्थ बसावं सगळं मिसळेस्तोवर. निरपेक्षतेचं आलं असेल तर वाईच तेही घालावं. मनाच्या तळाशी थोडं सहृदयतेचं दूध शिल्लक असतंच ,घ्यावं की जरा हुडकून .
बदलू द्यावा थोडा रंग स्वतःचा, इतरांच्या आयुष्यासाठी. वर्ज्य भाग दूर करण्यासाठी स्वतःला अंमळ गाळून घ्यावं. जसे असू तसे लोकांना घोट घोट पिऊ द्यावं. शक्य असेल तर आपण चहा व्हावं आणि 'चहा' च्या पलीकडे जावं.
- अभिजीत श्रीहरी जोगळेकर.
प्रतिक्रिया
17 Nov 2020 - 9:37 pm | तुषार काळभोर
चहा इतकाच सुरेख लेख, रेंगाळत राहील हे नक्की!
18 Nov 2020 - 12:11 am | अर्धवटराव
खुपच मस्त. अगदी फस्क्लास चहा सारखं.
19 Nov 2020 - 9:04 am | विजुभाऊ
मस्त फर्मांस लेख
19 Nov 2020 - 11:48 am | कुमार१
सुरेख लेख
19 Nov 2020 - 5:19 pm | विजुभाऊ
http://misalpav.com/node/26977
19 Nov 2020 - 5:46 pm | चौथा कोनाडा
क्या बात हैं !
👌
19 Nov 2020 - 9:13 pm | सिरुसेरि
अमॄततुल्य अनुभव देणारा छान लेख .
19 Nov 2020 - 9:24 pm | सिरुसेरि
https://www.misalpav.com/comment/945304#comment-945304